Breaking News

अखेर मनसेकडून राज ठाकरेंना “हिंदू जननायक” उपाधी पुण्यात केले हनुमान चालीसाचे पठण

राज्यातील मस्जिदीवरील भोंग्याला हनुमान चालिसाने प्रत्युत्तर देण्याचा जाहीर घोषणा केल्यानंतर आधीच जाहीर केल्याप्रमाणे आज पुण्यात हनुमान चालिसाचे पठण मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केले. विशेष म्हणजे पुण्यातील मनसेच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांना हिंदूजननायक अशी उपाधी दिली. याशिवाय राज ठाकरे यांनीही आरतीच्या वेळी स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्याप्रमाणे भगवी शाल पांघरल्याचे दिसून आले. पुण्यातील खालकर चौकातील हनुमान मंदीरात राज ठाकरे यांनी हनुमान चालिसा पठण करत महाआरती केली.

यावेळी मोठ्या संख्येने मनसैनिक चौकात उपस्थित होते. यावेळी त्यांच्या मनसे नेते बाळा नांदगांवर यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते. महाआरतीला आल्यानंतर राज ठाकरे यांना भगवी शाल आणि गदा देवून सत्कार करण्यात आला. २००५ साली न्यायालयाने अजाणवेळी भोंग्याचा वापर न करण्यासंदर्भात एक निकाल दिला होता. या निकालास जवळपास २० वर्षे उलटून गेली. या निकालाच्या अनुषंगाने हा सामाजिक विषय असल्याचे सांगत मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मस्जिदीवरील भोंगे हटवा अन्यथा त्यापेक्षा मोठे भोंगे समोर लावून हनुमान चालिसा लावण्याचे आदेश त्यांनी मनसैनिकांना दिले. त्यानंतर राज्यात राज ठाकरे यांच्यावर भाजपा वगळता जवळपास सर्वच पक्षांनी टीकेची झोड उठविली.

त्या टीकेला उत्तर देण्यासाठी अखेर राज ठाकरे यांना पुन्हा एकदा ठाणे शहरात उत्तर सभा घ्यावी लागली. त्यावेळीही त्यांनी आपल्या भूमिकेचा पुर्नरूच्चार करत राज्य सरकारला आणि मुस्लिम समुदायांना ३ मे पर्यतचा अल्टीमेटम दिला.

दरम्यान कुमठेकर रोडवरील खालकर चौकात असलेल्या हनुमान मंदीरात राज ठाकरे यांनी हनुमान चालिसा म्हणत हनुमान जयंती निमित्त महा आरती केली. यावेळी संपूर्ण परिसरात ढोल-ताशांचा गरज सुरु होता.या महाआरतीनंतर राज ठाकरे हे पुन्हा मुंबईला परतणार होते. मात्र आता त्यांनी पुन्हा पुण्यात आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी उद्या प्रसारमाध्यमांशी बोलणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

Check Also

रा.स्व.संघाच्या प्रचारकाचा ‘तो’ व्हिडिओ शेअर करत काँग्रेसने केली ‘ही’ मागणी आरोप देश विरोधात कट रचणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी

रा.स्व. संघाचे १९९५ सालापासून यशवंत शिंदे हे प्रचारक म्हणून काम करत आहेत. शिंदे यांचा एक …

Leave a Reply

Your email address will not be published.