Breaking News

शब्द प्रभू रामाजी हिंगे संवेदनशील नाट्य-टिव्ही अभिनेता अकुर विठ्ठलराव वाढवे यांची वास्तववादी कल्पनाधारीत कथा

मोठा बेलोरा हे पुसद तालुक्यात येणारे गाव. आता गावं म्हटलं की व्यक्ती तेथे प्रवृत्ती आल्याच. बेलोऱ्यात बारावी पर्यंत शाळा आहे. पण सगळीच मुलं शाळेत जायची असं नाही. शाळेत न जाणारी आणि काम न करणारी तरूण मुलं (खरं तर सगळ्यांनाच कामं असायची असं पण नाही) हे सगळे समाज मंदीरावर बसून पत्त्याचा डाव मांडून बसलेली. डाव चांगलाच जोरात आला, तेवढ्यात मळकट काही ठिकाणी फाटलेल धोतर, तिरप्या पट्याची त्रिकोणी गळा आणि बिना बाह्याची बणियन, डोक्यात मळलेली गांधी टोपी, मिशीचा तलवार कट आणि खुंटाडलेली दाढी असलेला रामाजी हिंगे तिथे येवून बसला. आपल्या चंचीमधून चिलीम काढली आणि त्यात तंबाखू भरत बोलू लागला, ‘कोणाचा डाव लागला का?‘ पोलीसाची धाड पडावी त्याप्रमाणे सगळ्या पोरांच्या टपाटप माना वळल्या त्यातला नितिन लगेच बोलला, ‘अरं तुया मायचा… बापू! तू हायेस का? पोलीसा सारखं आला रे!‘ आपला पसारा घेवून पळून जाण्याच्या तयारीत असलेले सगळे परत बसले. रामाजी हिंगे चकमकने चिलीम पेटवता पेटवता बोलू लागला, ‘पोलीसा सारखा येणारच न, माह्य अंगात रगत पोलीसाच हाये बापू.‘

बुगाजी पत्ते वाटतावाटता बोलंला, ‘म्हंजे?‘

रामाजी, ‘अबे माह्या बाप पहिला पोलिस होता, त्याचं कसं झालं, मव्हा बाप डायरेक सरकारकडं गेला, अन मनला मलं पोलिस बनवा. बनवलं पोलिस!‘

यावर नितीन बोलला,‘बापू तुवा मथारा त मासूळ्य इकायचा न?‘

रामाजी हिंगे त्याला चिडून बोलला, ‘तुलं कोनं सांगीतले बे?‘

नितीन, ‘मव्हा बाप कालच मासूळी खातानी बोलंला का, मासूळी अन् खेकडे पकडाव त रामाजी हिंगेच्या बापानंच!‘

आजूबाजूला बसलेले हसतात रामाजी हिंगेचं तोंड पडलेलं, आणि त्यातचं तो नितीनला शिव्या पण घालत आहे. तेवढ्यात नितीनच्या शेजारी राहणारा त्याचा चुलत छोटा भाऊ पक्या पळत पळत घापा टाकत समाज मंदिरावर आला आणि बोलू लागला, ‘ओय नित्या, काकीलं पान लागलं‘ पान (सापाने दंश केलाचा पर्यायी शब्द.) ऐकल्याबरोबर समाज मंदिरावर बसलेले सगळे नितीनच्या घराच्या दिशेने धावत सुटले.

नितिनच्या घरी त्याच्या आईच्या आजूबाजूला सगळी लोकं जमलेली होती, त्या गर्दी मधून रस्ता काढत नितीन आणि रामाजी हिंगे आत घुसले. नितीनची आई घामाघूम झालेली, खटेवर पडून होती. गावात डॉक्टर नसल्यामुळे गावातला वैदू बाबा नितीनच्या आई शेजारी बसून दवा पाणी करत होते. जमलेल्या पैकी वयस्कर आणि अनुभवी म्हणून रामाजी मध्येच बोलंला ‘साप कोणता होता?‘ जमलेल्या सगळया लोकांच्या माना खटा खट वळल्या, रामाजी परत बोलंला, ‘नाही मंजे दिसायलं कसा होता?‘ गर्दीतली एक बाई बोलंली, ‘काय माहीत पन पाहेस्तोर निंगुन गेलता‘

रामाजी आता जबाबदाराच्या औऱ्याल अवतरला आणि बोलंला, ‘कोनाच्या शेतात गेलत्या?‘

तिच बाई उत्तरली, ‘बाबूशा मार्कडच्या गावखरीत‘ रामाजी काहीही न बोलता चिलीम ओढत ओढत निघून गेला.

काही वेळ गेल्यानंतर रामाजी परत आला आणि वैदूच्या कानात काही तरी बोलंला आणि काही वेळात नितीनची आई बरी झाली. जमलेले लोकं रामाजीला विचारू लागले काय सांगीतलं? त्यावर रामाजी बोलंला, ‘मी गेलो बाबूशाच्या शेतात सारं शेत हिंडून हिंडून सापालं धुंडल एक दिसला त्यालं धरलं! त्यालं इचारलं, ‘तू नित्याच्या मायलं काउन डसला?‘ त तो मने का, ‘बापू मी नाही मव्हा चुलत भाऊ होता.‘ मंग त्यालं मनल, ‘तो भेटंल कोठं?’ त मने, ‘फिरायलं गेला आता येईलच‘ तेवढ्यात एक मोठं जहाज (साप) आलं! ह्या मानवर हात हात केसं होते. पहिले भेलो मी पन मनलं नित्याच्या आईच्या जीवाचा प्रश्न आहे, चंचीतून चिलम काढली, पेटवली अन हलक्यात त्यालं इचारलं, ‘बाबू तुय नाव काय हाये?‘ काही बोलेचना फक्त फुस फुस करू लागला. मलं बी आला राग असे त्याच्या मानवरचे केसं धरले अन मनल, ‘मलं जसं रामाजी हिंगे मनतात तसं तुलं काय मनतात?‘ मंग बोलंला ‘मलं डोम्या नाग मनतात‘ मग त्यालं इचारलं का बा, ‘आमच्या नित्याच्या आईलं काउन डसला?‘ त मने ‘जोरात नाही डसलो बारीकसाच डसलो वैदूलं काळी आफुमारी द्यायलं सांग, पानातून मी इकडं मव्ह इष ओढून घेतो.‘ तवा कोठं त्यालं सोडलं अन् तडक इकडं आलो. मायच्यान मी होतो मनून नित्याची माय वाचली नही त काही खरं नव्हतं.‘

या प्रकरणानंतर मात्र रामाजी कधी नव्हे ते टेचीत चालायला लागला होता. निवडणुका जवळ आल्या होत्या. त्यामुळे प्रचार आणि राजकीय लोकांची आवक जावक वाढायला लागली. बड्या नेत्याची सभा आयोजित केली गेली होती. बडा नेता म्हटल्यावर तो हेलीकॅप्टरने आला, गावात जणू जत्रा की काय असावं तसं वातावरण तयार झालेलं. पोलिसाचा ताफा, कडक सुरक्षा होती. नेता आला भाषण दिलं त्या भषणात रामाजीचं आणि त्याच्या धाडसीपणाचं कैतुक तालुक्याच्या एका युवा नेत्याने केलं. नेतेमंडळी निघून गेली. गावात मात्र हेलीकॅप्टर आणि रामाजीच्या नावाची चर्चा सूरू होती. ग्रामपंचायतच्या इलेक्शनमध्ये रामाजीवर नेत्याने केलेल्या कौतुकामूळे लोकांनी त्याला बिनविरोध निवडून दिले. सरपंच झालेल्या रामाजीने आपल्या पहिल्या ग्रामसभेत आपल्या आजोबाच्या चंचीची गोष्ट सांगून आपल्या धाडसी स्वभावाचं दर्शन घडवून दिलं.

रामाजी सरपंच झाला खरा पण अपूरं शिक्षण आणि अपुरा अनुभव असल्यामुळे गावातल्या तरूण आणि शिकलेल्या पोरांना त्याचा कारभार खटकत होता. पण रामाजीची गावातल्या प्रसिध्दीपुढे त्यांच काही चालत नव्हते. पण एक दिवस मात्र रामाजीवर संकट आलं गावातली सुप्रिया बी.ए. ला शिकणारी मुलगी दिसायला सुंदर आणि गावातल्या पोलिस पाटील शामरावचा एकुलता एक बेरोजगार पोरगा संतोष यांच्यात वाद झाला तो गावातला वाद म्हणून गावातल्या पंचायती पुढे आला. पाच पंचापैकी सरपंच या नात्याने मुख्य पंचाची जबाबदारी रामाजी कडे आली, बाकी चार मधे स्वतः पोलीस पाटील शामराव, माझी सरपंच धोंडबाराव, पोलिस पाटलाचा भाऊ सुभाषराव असे होते. पोलिस पाटील गावातला प्रतिष्ठीत व्यक्ती असल्यामुळे निकाल हा पोलिस पाटलाचा पोरगा संतोषच्या बाजूनेच लागावा यासाठी सर्व पंच प्रयत्न करत होते. शामरावाच्या घरी गुप्त मिटिंगा झाल्या आणि सगळं ठरलं.

ठरल्याप्रमाणे पंचायतीचा दिवस आला पंचायत भरली रविवारचा दिवस बघुनच ही पंचायत ठरली. गावातले सगळे लोक जमले ही पंचायत महत्वाची यासाठी होती की, गावातली एकमेव सुशिक्षित मुलगी आणि पोलिस पाटलाचा पोरगा यांची ती पंचायत. पंचायतीमध्ये एवढी गर्दी बघून रामाजी पहिले घामाघूम झाला पण शमरावच्या इशाऱ्यामुळे तो जरा शांत झाला. पंचायतीमध्ये आरोप प्रत्याआरोप सुरू झाले. सुप्रिया सुशिक्षित असल्यामुळे ती आपली बाजू ठामपणे मांडत होती. त्यामुळे सुप्रियाकडून हा निकाल लागणार ही चिंता सगळया पंचाना लागत होती. दिवसाच्या खेरीस गावातली भांडखोर बाई म्हणून ख्याती प्राप्त असलेली कुसूमबाई ही उभी राहिली आणि सुप्रिया किती अग्गाउ आणि चारित्र्यहिन मुलगी आहे यावर बोलायतला सुरूवात केली. कुसुमच्या अशा बोलण्यामुळे सुप्रिया चिडली आणि कुसुम आणि सुप्रिया मध्ये खडाजंगी सुरू झाली. दिवस संपायला आला पण निकाल काय लागत नव्हता, म्हणून पंचापैकी रामाजी उठला आणि बोलु लागला, ‘हे पहा ह्यो विषय लय महत्वाचा आहे मनून आमी पंचानी असं ठरवलं का बा याचा निकाल आपण पुढच्या आइत्वारी (रविवारी) लावू तवरोक आमची दोन्ही पार्टीलं सांगतो का? पुढच्या आइत्वार पर्यत तुम्ही लोकं एकमेकालं बोलू नोका का भांनगड करू नका.‘ असं म्हणून पंचानी ह्या प्रकरणाचा निर्णन पुढच्या रविवार पर्यंत राखून ठेवला.

दिवसां मागून दिवस जात होते. गावात ‘दोघापैकी सुप्रियाच्या बाजूने निकाल लागणार! पण ह्या भांडणात कुसूम बाईला बोलायची काही गरज नव्हती.‘ ही चर्चा सुरू झाली. या आठवड्यात पंचायतीसाठी अनेक भांडणं आणि तक्रारी आल्या कोणच्या घर फोडिवच्या, दारू पिऊन बायकोला आणि मुलांना मारहाण करून घराबाहेर काढल्याच्या, पण गावातला महत्वाचा मुद्दा सुप्रिया आणि संतोष आणि कुसुमबाईचा आहे, म्हणून रामाजीने आणि पंचायतीने सगळे मुद्दे नंतर पाहू म्हणून सगळं लक्ष यावर केंद्रित केले. रविवार आला. गावा मागच्या दृष्टिने आज जमाव जास्त होता. या गर्दीत एक व्यक्ती नविन आणि गावाबाहेरील रामाजीला दिसली. रामाजीने ग्रामपंचातचा सदस्य शेषरावला बोलावून विचारलं, ‘त्यो मानूस कोण आहे रे?‘

शेषराव, ‘त्यो सुप्रियाचा होणारा नवरा आहे मनते बा.‘

रामाजी, ‘त्यालं पंचायतीमधी बसता येणार नाही सांग त्यालं‘

शेषराव, ‘सांगितलं तो बोलंला मलं आधिकार आहे, वकिल आहे मनते‘

रामाजी जरा चाचपडला आणि त्याने बाकी पंचाला हे सांगितलं त्यावर धोंडबाराव बोलंला, ‘बसू द्या न हो काय फरक पडायला! आपली कुसूमबाई आहे न आज बसं त मंग‘ आणि पंचायतीला सुरूवात झाली. सुरूवात कुसुमबाईच्या बोलण्यापासूनच झाली. त्यावर सुप्रियाच्या होणाऱ्या नवऱ्याच्या सांगण्यावरून सुप्रिया बोलंली,‘पंच भांडण माझं आणि पोलिस पाटलाच्या संतोषचं आहे. यात कुसूमबाईच्या बोलण्याचा काय संबंध?‘ या प्रश्नावरून रामाजी मात्र चिडला आणि गावात प्रकरण कोणाचही असो त्याची सगळी माहीती कुसुमबाईकडं रायते.‘ आणि परत कुसूमबाई अविरत आणि निरर्थक बडबड करत सुटली.

पंचायत नेमकी रंगात आली आणि तेवढ्यात गावातला मासे विकणारा डोला तिथे आला आणि बोलू लागला, ‘ऐ शंकऱ्या तुया पोरीवर सुरशानं हात टाकला‘ ही बातमी ऐकताच गावातली सगळी लोकं उठून उभी राहीली त्यावर रामाजी लगेच बोलंला, ‘शंकऱ्या तुया पोरीलं घरी घेउन जाय अन् धोंडबाराव, तुम्ही जरा तुमच्या सुरेशलं घरी बोलवता का? अन हो ही गोष्ट गावाच्या बाहेर जाता कामा नये.‘ गावातली ही गोष्ट बाहेर जावू नये यासाठी धोंडबाराव, पोलिस पाटील आणि रामाजी शिताफीने प्रयत्न करत होते पण ही गोष्ट लपली नाही. तालुक्याला असलेला त्या मुलीचा मामा पाच सहा लोकाना घेवून गावाकडे येत आहे, हे पाहून गावातल्या धोंडबाराव आणि रामाजीच्या हिताच्या लोकांनी त्याला गावाच्याबाहेर अडवल आणि गावात येण्या पासून अडवलं पण काही दिवसातच ही बातमी बघता बघता जिल्हाभर पोचली आणि शंकरच्या मुलीला भेटायला येणाऱ्या लोकांची रीघ लागली.

– अंकुर विट्ठलराव वाढवे.

Check Also

शेतकरी पोराच्या लग्नाची गोष्ट… सर्जनशील लेखक सुदेश जाधव यांची वास्तवाधारीत काल्पनिक कथा

केशव रत्नाकरची वाट बघत होता. दिवे लागणीची वेळ होत आली तरी सकाळी गेलेला माणूस अजून कसा आला नाही याची काळजी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *