Breaking News

कोरोनाचा जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन प्रकल्प खालापूरला स्थलांतरीत करणार आराखडा सादर करण्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे निर्देश

मुंबई : प्रतिनिधी

गोवंडी येथील नागरिकांसह अनेक मुंबईकरांची गोवंडी येथील जैववैद्यकीय कचरा व्यवस्थापन प्रकल्प मुंबईबाहेर नेण्याची मागणी आहे. याअनुषंगाने तसेच परिसरातील प्रदुषण समस्यांबाबत चर्चा करण्यासाठी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृह येथे बैठक संपन्न झाली. आमदार अबु असीम आझमी यांच्या पुढाकाराने बैठकीचे आयोजन करण्यात आले.

बैठकीस आमदार अबु असीम आझमी, प्रदुषण नियंत्रण मंडळाचे सदस्य सचिव अशोक शिनगारे, मुंबई महापालिकेचे अधिकारी यांच्यासह एसएमएस एन्व्होक्लिन कंपनीचे संचालक आदी मान्यवर उपस्थित होते.

शहरातील जैववैद्यकीय कचऱ्यावर प्रक्रिया केल्यानंतर निघणाऱ्या धुरामुळे देवनार – गोवंडी परिसरात प्रदुषणाची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. सध्या कोरोनामुळे जैववैद्यकीय कचरा वाढल्याने ही समस्या अधिक वाढली आहे. त्यामुळे यावर मार्ग काढण्याच्या अनुषंगाने बैठकीत चर्चा झाली. या प्लांटचे खालापूर येथे स्थलांतर करण्याबाबत प्रस्तावित करण्यात आल्याची माहिती यावेळी देण्यात आली.

जैववैद्यकीय कचऱ्यावर योग्य अशा वैज्ञानिक पद्धतीने प्रक्रिया होणे गरजेचे आहे. पण त्यातून निर्माण होणाऱ्या प्रदुषणाचा सामना लोकांना करायला नको. यासाठी प्लँटचे स्थलांतर करणे, त्यासाठी महापालिका, पर्यावरण विभाग आदींच्या परवानग्या मिळवणे आदींबाबत कार्यवाही करण्यात यावी. यासंदर्भात एक सुनिश्चित आराखडा तातडीने तयार करण्यात यावा. त्यावर येत्या दहा दिवसात पाठपुराव्यासाठी पुन्हा बैठक घेण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.

आमदार अबु असीम आझमी यांनी प्रदुषणामुळे परिसरात निर्माण झालेल्या लोकांच्या आरोग्याच्या गंभीर समस्येची माहिती दिली. हा प्रकल्प येथून स्थलांतरीत करण्याची गेल्या अनेक दिवसांपासून असलेली मागणी तातडीने पूर्ण करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.

Check Also

निवडणूक आयोगाकडून राज्यात ४२१ कोटींचा मुद्देमाल जप्त

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात १६ मार्चपासून आदर्श आचारसंहिता लागू आहे. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार केंद्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *