Breaking News

केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी केली मोठी घोषणा; ७५ दिवस मोफत लस अमृत महोत्सवी वर्षानंतर ७५ दिवस मोफत लस मिळणार

मागील दिड ते दोन वर्षे कोरोनाला रोखण्यासाठी लसीची पहिली मात्रा व दुसरी मात्र आवश्यक करण्यात आली. नागरिकांच्या सजगतेमुळे आणि प्रशासनाच्या योग्य खबरदारीमुळे कोरोनाला नियंत्रित करण्यात बऱ्यापैकी यश आल्यानंतर आता तिसरी लस अर्थात बुस्टर लस घेण्यासाठी नागरिकांकडून फारसा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे केंद्र सरकारकडून मोठी घोषणा करण्यात आली आहे. यापार्श्वभूमीवर देश स्वातंत्र्यांच्या ७५ व्या वर्षाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारकडून राबविण्यात येत असलेल्या आझादी का अमृत महोत्सव अभियानंतर्गत १५ जुलै पासून पुढील ७५ दिवस मोफत लस मात्रा देण्यात येणार असून नागरिकांनी लसीची तिसरी मात्रा अर्थात बुस्टर लस केंद्रांवर जाऊन मोफत घ्यावी असे आवाहन केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी आज केले.

विशेष म्हणजे १८ वर्षावरील सर्व नागरिकांना ही बुस्टर लस सर्वोना मोफत देण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

सध्या देशभरात कोरोना लसीकरणाच्या मोहिमेत केवळ पहिला आणि दुसरा डोसच सर्वांना मोफत देण्यात येतोय. बुस्टर डोस केवळ ६० वर्षांवरील वयोवृद्ध व आरोग्य कर्मचाऱ्यांनाच मोफत आहे. इतर नागरिकांना खासगी लसीकरण केंद्रावर शुल्क भरून बुस्टर डोस घ्यावा लागत आहे.

कोरोना विषाणूंच्या नवनव्या व्हेरिएंटचा धोका पाहता वैद्यकीय तज्ज्ञ बुस्टर डोसचा सल्ला देत आहेत. मात्र, बुस्टर डोस घेण्याचं प्रमाण कमी आहे. अशास्थितीत केंद्र सरकारने हा निर्णय घेतल्याने देशातील बुस्टर डोस मोहिमेला गती मिळणार आहे. विशेष म्हणजे १८-५९ वयोगटातील नागरिकांनाही सरकारी लसीकरण केंद्रावर मोफत बुस्टर डोस मिळणार असल्याने बुस्टर डोस घेणाऱ्यांच्या संख्येत मोठी वाढ होईल.

केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने ६ जुलै २०२२ रोजी कोरोना लसीचा दुसरा डोस आणि बुस्टर डोस यांच्यामधील कालावधीत कपात केली आहे. आधी दुसऱ्या डोसनंतर बुस्टर डोससाठी ९ महिने किंवा ३९ आठवडे थांबावं लागत होतं. मात्र, या नव्या निर्णयानुसार दुसऱ्या डोसनंतर ६ महिन्यात किंवा २६ आठवड्यात लसीचा बुस्टर डोस घेता येणार आहे. केंद्र सरकारची सल्लागार समिती नॅशनल टेक्निकल अॅडव्हायजरी ग्रुप ऑफ इम्युनायझेशनने (NTAGI) केलेल्या शिफारशीनुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.

केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भुषण यांनी सर्व राज्यांच्या सचिवांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं, १८ ते ५९ वयोगटातील सर्व लाभार्थ्यांना कोरोना लसीच्या दुसऱ्या डोसनंतर ६ महिन्यांनी किंवा २६ आठवड्याने खासगी लसीकरण केंद्रावर बुस्टर डोस देता येईल. ६० वर्षांवरील लाभार्थ्यांना आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना सरकारी लसीकरण केंद्रावर मोफत बुस्टर डोस देण्यात येईल.सरकारी आकडेवारीनुसार, आतापर्यंत भारतात ४ कोटी ७५ लाख बुस्टर डोस देण्यात आले आहेत. यात ५७ लाख ७५ हजार आरोग्य कर्मचारी, १ कोटी ५ लाख फ्रंटलाईन वर्कर्स आणि २ कोटी ५० लाख ६० वर्षांवरील वयोगटाच्या ज्येष्ठ नागरिकांचा समावेश आहे.

भारतात १० जानेवारी २०२२ रोजी बुस्टर डोस देण्यास सुरुवात झाली. यात गंभीर असणाऱ्या ६० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांसह आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाईन वर्करचा समावेश होता. यावेळी केंद्र सरकारने बुस्टर डोस घेण्यासाठी दुसऱ्या डोसनंतर किमान ९ महिन्यांच्या अंतराची अट ठेवली. १० एप्रिल २०२२ रोजी १८ वर्षांवरील सर्वांसाठी बुस्टर डोस देण्याची घोषणा करण्यात आली. त्यासाठी नागरिकांना शुल्कही आकारण्यात आलं. या काळात १८ ते ४४ वयोगटातील ३३ लाख ९९ हजार नागरिकांनी, तर ४५ ते ५९ वयोगटातील २७ लाख ७६ हजार नागरिकांनी बुस्टर डोस घेतले.

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *