Breaking News

मुंबई महापालिका निवडणूकीत राष्ट्रवादी पूर्ण ताकदीनिशी; शरद पवार यांचे निर्देश सोबत कोणी येईल याचा विचार करू नका कामाला लागा

राज्यातील शिवसेनेतील सत्ता संघर्षामुळे महाविकास आघाडीला सत्तेतून पाय उतार व्हावे लागले. त्यातच आता मुंबईसह १४ महापालिकांच्या निवडणूकांचे बिगुल केव्हाही वाजण्याची शक्यता आहे. तसेच सध्याच्या या बदलेल्या राजकिय परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उध्दव ठाकरे यांची शिवसेना महाविकास आघाडी सोबत येण्याची शक्यता कमी आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस मुंबईत पूर्ण ताकदीने उतरण्याचा निर्णय घेतला असून कोणी सोबत येईल, नाही येईल याची वाट न बघता तयारीला लागण्याचे निर्देश राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी कार्यकर्त्यांना दिले.

सत्तांतरानंतर बंडखोरांच्या पाठिशी शिवसेनेतील नगरसेवक जाणार नाहीत असे सांगितले जात असतानाच मुंबई ठाणेसह अनेत भागातील माजी नगरसेवक तसेच अनेक शिवसैनिक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणजेच बंडखोर गटात सामील होत आहेत. त्यामुळे उध्दव ठाकरे हे एकाबाजूला पक्षाची बांधणी करत असताना दुसऱ्याबाजूला त्यांच्यासोबत आहेत असे वाटणारेही आता शिंदे गटाची वाट धरत आहेत. यापार्श्वभूमीवर मुंबई महापालिका निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेसोबत आघाडी होण्याची शक्यता सध्या तरी दिसून येत नाही. त्यामुळेच शरद पवार यांनी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लक्षात घेऊन आपल्या कार्यकर्त्यांना कोणी सोबत येईल किंवा नाही, याबाबत विचार करु नका, तयारी करा, असे निर्देश दिले.

आज सकाळी अकरा वाजता शऱद पवार आणि मुंबईतील पदाधिकारी यांच्यात बैठक झाली. या बैठकीत पवार यांनी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लक्षात कार्यकर्त्यांना संबोधित केले. त्यावेळी ते बोलत होते.

मुंबई महानगरपालिकेची निवडणूक लक्षात घेता शरद पवार यांनी सूत्रं हातात घेतली आहेत. या निवडणुकीसाठी शरद पवार वॉर्ड प्रमुखांकडून वीस दिवसानंतर आढावा घेणार आहेत. त्यानंतरच पुढील रणनीती ठरणार आहे. शरद पवार स्वत: वॉर्डांमध्ये जाऊन प्रचारासाठी कार्यकर्त्यांना भेटण्याचीही शक्यता आहे. आढावा घेतल्यानंतर कोणकोणत्या वॉर्डांमधून राष्ट्रवादीचे उमेदवार उभे करायचे? यावर निर्णय होऊ शकतो.

शिवसेनेतील ४० आमदारांच्या बंडखोरीचा परिणाम मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीवरही होणार आहे. मागील कित्येक वर्षांपासून मुंबई पालिकेवर शिवसेनेची सत्ता आहे. मात्र या बंडखोरीमुळे शिवसेना तसेच उद्धव ठाकरे यांना मुंबईवरील आपली पकड कायम ठेवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करावे लागतील, असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे. तसेच शरद पवार यांनीही राष्ट्रवादीचे जास्तीत जास्त उमेदवार उभे करण्यासंदर्भात सूतोवाच केल्यामुळे आगामी काळात मुंबई पालिका निवडणुकीत काय होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

दरम्यान, मुंबई महापालिकेच्या निवडणूकीत आता तिरंगी लढत होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून एकाबाजूला भाजपा आणि शिंदे गटाकडून युती म्हणून तर दुसऱ्याबाजूला काँग्रेस-राष्ट्रवादी तर तिसऱ्याबाजूला उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना अशी तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे. मात्र ज्या ठिकाणी काँग्रेस-राष्ट्रवादी कमकुवत आहे, त्या ठिकाणी उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या उमेदवाराला मदत करण्याचे धोरण निश्चित स्विकारण्यात येत आहे.

Check Also

प्रज्वल रेवन्ना याच्या परदेशी पळून जाण्याप्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा

परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, लैंगिक शोषणाच्या आरोपांप्रकरणी चौकशीला सामोरे जात असलेले कर्नाटकचे खासदार प्रज्वल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *