Breaking News

अजित पवारांच्या शपथविधीचा कार्यक्रम फक्त ‘त्या’ तिघांना माहित ? ‘या’ प्रमुखांनाही नव्हता छगन भुजबळांसह शिंदे गटाच्या आमदारांनाही नव्हती कल्पना

नुकतेच राज्यात राजकिय उलथापालथ होत महाविकास आघाडीचा भाग असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसमधील ९ आमदारांनी बंडाचे निशाण फडकावित राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. त्यानंतर इतक्या मोठ्या शपथविधीची माहिती कोणालाच कशी नव्हती अशी चर्चा अनेक प्रसारमाध्यांच्या प्रतिनिधी आणि राजकिय वर्तुळातील बड्या नेत्यांमध्ये सुरु झाली आहे. परंतु या शपथविधीची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक यांच्यासह कोणालाच शिंदे आणि भाजपातील एकाही आमदारला नव्हती. विशेष म्हणजे या शपथविधी सोहळ्याची माहिती फक्त तीघानांच होती अशी माहिती राज्यपाल भवनातील विश्वसनीय सूत्रांनी मराठी ई-बातम्या.कॉम या संकेतस्थळाची बोलताना दिली.

देशातील अनेक राज्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्या राजकारणाची युएसपी असलेल्या धक्कातंत्र, भय, भ्रम निर्माण करण्याच्या हातोटीचा उपयोग इथेही करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.

अजित पवार यांच्यासह काही जण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला. राष्ट्रवादीच्या फुटीरांचा निर्णय झाल्यानंतर अजित पवार यांनी तसा निरोप उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळविला. त्यावर शनिवारी रात्री उशीरा राज्यपाल रमेश बैस आणि संबधित यंत्रणांना तसे निरोप फोनद्वारे कळविण्यात आले. तसेच दिल्लीतील भाजपाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना याची कल्पना देण्यात आली.

या दोघांकडून ग्रीन दिला गेल्यानंतर आता जर अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांचा शपथविधी सोहळ्याची घोषणा केल्यास सध्या सत्तेत असलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सरकारला पाठिंबा देणाऱ्या ५० आमदारांमध्ये खळबळ माजू शकते. याचा विचार करून अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राज्यपाल रमेश बैस यांनाच या शपथविधी सोहळ्याची माहिती होती. या तिघांनी कमालीची गुप्तता पाळली. तसेच दस्तुरखुद्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही दुसऱ्या दिवशी सकाळी १० च्या सुमारात फक्त शपथविधीचा कार्यक्रम आज करण्यात येणार असल्याचा निरोप देवेंद्र फडणवीस यांनी कळविला.

विशेष म्हणजे यासाठी राजभवनातील कर्मचाऱ्यांनाही याचा थांगपत्ता नव्हता. तसेच राजभवनाकडून कर्मचारी अधिकाऱ्यांना फक्त निरोप देण्यात आला की, देशाच्या महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु या नागपूरच्या दौऱ्यावर येणार आहेत. त्या अनुषंगाने तयारी करण्यासाठी बोलविण्यात आले. त्यानुसार राजभवनातील अनेक अधिकारी हे रविवार असल्याने अगदी निवांत आणि कॅज्युअल कपड्यांच्या अवतारात राजभवनावर सकाळी १० वाजता पोहचले.

१० वाजता राजभवनातील अधिकारी जरी पोहचले तरी राजभवनाच्या वरिष्ठांकडून बैठकीबाबत कोणतीच माहिती सूचना दिली जात नव्हती. अखेर सकाळी ११ वाजल्यानंतर शपथविधी सोहळ्याची अल्पशी माहिती उपस्थित कर्मचाऱ्यांना देण्यात आली. मात्र कोणाचा शपथविधी होणार आहे, कोण राज्य मंत्रिमंडळात सहभागी होणार याबाबतचा एकप्रकारचा भ्रम राजभवनावरील अधिकाऱ्यांमध्ये आणि शिंदे गटाच्या आमदारांमध्ये निर्माण करण्यात आला. तर शिंदे गटाच्या अनेक आमदारांमध्ये जे मंत्रीपदासाठी इच्छुक होते त्यांची मंत्री पदी वर्णी लागणार असल्याचीच चर्चा राजभवनात पोहचलेल्या राजकिय नेत्यांमध्ये होती.

इतकेच नव्हे तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनाही अजित पवार वगळता शपथविधी कोणाचा होणार याची कोणतीही माहिती नव्हती.
अखेर १२ वाजल्यानंतर प्रत्यक्ष शपथविधीच्या कार्यक्रमासाठी सुरुवात होण्याच्या अगदी काही मिनिटांआधी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होत असताना आणि इतक्या महत्वपूर्व समारंभाला राज्याचे मुख्य सचिव मनोज सौनिक हेच हजर नसल्याची बाब राजभवनवरील एका अधिकाऱ्याने प्रशासनाच्या लक्षात आणून दिली. त्यावेळी राज्याच्या मुख्य सचिवांना फोन करून शपथविधी सोहळ्याला पाचारण करण्यात आले. त्यापूर्वी अजित पवार हे राज्यपाल रमेश बैस यांच्या भेटीसाठी त्यांच्या दालनात गेले तेथे भेट झाल्यानंतर काही जुजबी चर्चा झाली. त्या दरम्यानच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे ही राजभवनावर पोहचले. तर देवेंद्र फडणवीस हे सर्वात आधीच पोहोचले होते.

त्यानंतर अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे काही आमदार अजित पवार यांच्यासह राजभवनातील दरबार हॉलमध्ये आले. त्यानंतर राज्यपाल आले आणि प्रत्यक्ष शपथविधी सोहळ्याला सुरुवात झाली. त्यावेळी काही बड्या नेत्यांना डायसवर बसण्याची विनंती करण्यात आली. त्यावेळी सदर नेत्याने सांगितले की नेमका कोणाचा शपथविधी होणार याची माहिती आम्हालाच नाही. त्यामुळे जे पुकारले जाईल त्यावेळी ते डायसवर येतील असे सांगत एका आमदाराने डायसवर बसण्यास नकार दिला.

याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही नेत्यांना याबाबत विचारणा मराठी ई-बातम्या.कॉम या संकेतस्थाने केली असता त्यांनीही यास दुजोरा दिला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही संभाव्य शपथविधीतील नावांची माहिती नव्हती. मात्र त्यांच्यासमोरच राष्ट्रवादीच्या नेत्यांची नावे पुकारत राहिल्याने ऐन आयत्यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनाही तोंड दाबून बुक्याच्या मार सहन करण्याची पाळी आल्याच माहितीही शिंदे गटातील एका आमदाराने सांगितले.

Check Also

भ्रष्टाचारप्रकरणी अब्जाधीश महिलेला व्हिएतनाममध्ये थेट फाशीची शिक्षा

व्हिएतनामी रिअल इस्टेट उद्योजिका ट्रुओंग माय लॅन याला देशाच्या सर्वात मोठ्या फसवणूक प्रकरणाच्या संदर्भात हो …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *