Breaking News

श्रीलंका: नागरिकांचा राष्ट्रपती निवासात ‘राज’पक्षे गोताबाया समुद्रात देशवासियांनी घेतला राष्ट्रपती निवासाचा ताबा

मागील काही महिन्यांपासून श्रीलंकेत पेट्रोल, वीज, रोजगार, औषधे यासह अन्य जीवनाश्वक गोष्टीं संपत आलेल्या आहेत. तसेच महागाईनेही मोठा उच्चांक गाठल्याने सर्वसामान्य नागरिकांना जगणे असह्य झाले आहे. त्यामुळे तेथील नागरिकांच्या भावनांचा आज उद्रेक होत हजारो, लाखो नागरीकांनी राष्ट्रपती निवासावर मोर्चा काढत निवासाचा ताबा घेतला. विशेष म्हणजे राष्ट्रपती गोताबाया राजपक्षे यांना याची माहिती आधीच तेथील गुप्तचर विभागाने दिल्याने देशवासिय तेथे पोहचण्याआधीच त्यांनी राष्ट्रपती निवासातून पळ काढत नौदलाच्या जहाजात आश्रय घेत दूर समुद्रात निघून गेल्याचे सांगण्यात येत आहे.

विशेष म्हणजे वाढत्या महागाई आणि बेरोजगारीच्या पार्श्वभूमीवर यापूर्वीच नागरीकांनी राष्ट्रपती गोताबाया राजपक्षे आणि पंतप्रधान महिंदा राजपक्षे या बंधूच्या विरोधात रस्त्यावर उतरले होते. पंतप्रधान राजपक्षे यांनी पळ काढल्यानंतर त्यांच्या ठिकाणी रानील विक्रमसिंगे यांनी पंतप्रधान पदाची सुत्रे हाती घेतली. नागरिकांनी राष्ट्रपती निवासाचा ताबा घेतल्यानंतर विक्रमसिंगे यांनी तातडीने मंत्रिमंडळाची बैठक बोलावत विद्यमान परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी चर्चा सुरु केली.

हजारो आंदोलकांना पळवून लावण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्यानंतर ही घटना घडली. हजारो आंदोलक त्यानंतर राष्ट्रपती भवनात घुसले.

श्रीलंकेतील आर्थिक परिस्थितीमुळे त्रस्त झालेल्या आंदोलकांनी शनिवारी राष्ट्रपती गोताबाया राजपक्षे यांच्या निवासस्थानावर ताबा मिळवला. त्याचवेळी आंदोलकांनी खासदार रजिता सेनारत्ने यांच्या घरावरही हल्ला केला आहे. श्रीलंकेच्या संसदेतील पोदुजाना पेरामुना (SLPP) च्या सोळा सदस्यांनी राष्ट्रपतींना त्वरित राजीनामा देण्याची विनंती केली.

याआधी ११ मे रोजी तत्कालीन पंतप्रधान महिंदा राजपक्षे संपूर्ण कुटुंबासह पळून गेले होते. संतप्त जमावाने राजपक्षे यांच्या कोलंबो येथील शासकीय निवासस्थानाला वेढा घातला होता.

आंदोलक राष्ट्रपती राजपक्षे यांच्या राजीनाम्याची मागणी करत राष्ट्रपती भवनात घुसले. आंदोलक राष्ट्रपती भवनात घुसल्याने सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत मोठ्या प्रमाणात लोक जखमी झाले आहेत. आंदोलकांना रोखण्यासाठी आणि पांगवण्यासाठी पोलिसांनी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या आणि हवेत गोळीबार केला.

काही आंदोलकांनी भिंत ओलांडली तर काहींनी मुख्य गेटमधून राष्ट्रपती भवनात प्रवेश केला. सरकारविरोधी घोषणा देत आंदोलक त्वरीत किल्ल्यासारख्या इमारतीत घुसले. पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांनी राजीनामा देऊन देशाच्या पूर्वेकडील त्रिंकोमाली येथील लष्कराच्या छावणीत आश्रय घेतल्याच्या एका महिन्यानंतर ही घटना घडली आहे. श्रीलंकेच्या बिकट आर्थिक स्थितीसाठी राजपक्षे बंधूंना दोषी ठरविले जात आहे.

श्रीलंकेतील सर्वोच्च वकील संघ, मानवाधिकार गट आणि राजकीय पक्षांच्या वाढत्या दबावानंतर, पोलिसांनी शनिवारी सरकारविरोधी आंदोलनापूर्वी कर्फ्यू हटवला होता. सरकारविरोधी निदर्शने रोखण्यासाठी कोलंबोसह देशाच्या पश्चिम प्रांतातील सात विभागांमध्ये संचारबंदी लागू करण्यात आली होती.

कोलंबोतील राष्ट्रपतींच्या निवासस्थानाला दुपारी आंदोलकांनी घेराव घातल्याचे सांगण्यात येत आहे. यानंतर आंदोलकांनी राजपक्षे यांच्या अधिकृत निवासस्थानावर ताबा मिळवला. श्रीलंकेतील बिघडलेल्या आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी राष्ट्रपती गोताबाया राजपक्षे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सरकारी निषेध रॅली काढण्यात आली आहे. दुसरीकडे, रॅलीदरम्यान श्रीलंकेतील ​​पोलीस आणि आंदोलकांमध्ये हिंसक चकमक झाली. या हिंसक चकमकीत आंदोलक जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.

Check Also

भ्रष्टाचारप्रकरणी अब्जाधीश महिलेला व्हिएतनाममध्ये थेट फाशीची शिक्षा

व्हिएतनामी रिअल इस्टेट उद्योजिका ट्रुओंग माय लॅन याला देशाच्या सर्वात मोठ्या फसवणूक प्रकरणाच्या संदर्भात हो …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *