Breaking News

संजय राऊत यांचा बंडखोरांवर निशाणा; ५० खोके पचणार नाहीत, कशाला कारणे देताय… शांत बसा आणि ठरवा नेमकी शिवसेना कशासाठी सोडली उगीच मानसकि गोंधळ करू नका

राज्यात शिवसेनेतील बंडाळीनंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या मदतीने सरकार स्थापन केले. मात्र ११-१२ जुलै रोजी सर्वोच्च न्यायालयात या बंडखोरीवर निर्णय होणार असल्याने या बंडखोरीवरून शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, प्रवक्ते संजय राऊत यांच्याकडून बंडखोरांवर सातत्याने टीका करण्यात येत आहे. सध्या नाशिक दौऱ्यावर असलेले शिवसेना नेते तथा प्रवक्ते संजय राऊत यांनी बंडखोरांवर निशाणा साधताना म्हणाले, शिवसेना ही आमच्याच बापाची असून ५० खोके पचणार नाहीत असा खोचक टोला लगावला.

एकनाथ शिंदे यांच्यासह ४० आमदारांनी शिवसेनेतून फुटून राज्यात सरकार स्थापन केल्यानंतर शिवसेनेच्या पुर्नबांधणीसाठी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, आदित्य ठाकरे, प्रवक्ते संजय राऊत यांनी सध्या राज्यातील विविध भागात दौरे सुरु केले. याच अनुषंगाने नाशिकच्या दौऱ्यावर आज संजय राऊत हे आले असून आजच्या सभेला व्यासपीठावर शिवसेनेचे सर्व नगरसेवक, जिल्हा परिषद सदस्य, प्रत्येक शिवसैनिक आणि पदाधिकारी हजर आहे.

यावेळी बोलताना ते म्हणाले की, शिवसैनिकाला तर कुणीही पळवून नेऊ शकत नाही. ४० आमदार म्हणजे शिवसेना नाही. दोन-पाच खासदार इकडे तिकडे गेले म्हणजे शिवसेना हलली असं होत नाही. अजूनही १०० आमदार आणि २५ खासदार निवडून आणण्याची ताकद आमच्या धनुष्यबाणात आहे. शिवसेना आमच्याच बापाची आहे. बंडखोर आमदारांना ५० खोके पचणार नाहीत असेही ते म्हणाले.

आता काय सांगता आमची शिवसेना खरी तुमची शिवसेना खोटी. हा वाद खऱ्या-खोट्यामधील नाही, हा वाद इमान आणि बेईमानीमधील आहे. आता गेलात ना.. तर सुखाने राहा ना…कशाला शिवसेनेचं नाव घेता… सांगा ना आम्ही शिवसेना सोडली… उद्धव ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला. आता कशाला कारणं देताय असे आव्हानही त्यांनी बंडखोरांना दिले.

त्यानंतर ते पुढे म्हणाले की, बंडखोरी झाल्यानंतर पहिल्या दिवशी बंडखोर आमदारांनी दावा केला की, आम्ही हिंदुत्वासाठी बाहेर पडलो. दुसऱ्या दिवशी सांगितलं की, राष्ट्रवादीची लोक आम्हाला निधी देत नव्हते, म्हणून बाहेर पडलो. तिसऱ्या दिवशी सांगितलं उद्धव ठाकरे आम्हाला भेटण्यासाठी वेळ देत नव्हते, म्हणून बाहेर पडलो. चौथ्या दिवशी सांगितलं आदित्य ठाकरे कामात ढवळाढवळ करत होते, म्हणून बाहेर पडलो. पाचव्या दिवशी सांगितलं विठ्ठलाभोवती बडवे जास्त झाले, म्हणून बाहेर पडलो. सहाव्या दिवशी सांगितलं संजय राऊतांमुळे बाहेर पडलो. सातव्या दिवशी सांगितलं शरद पवारांना शिवसेना संपवायची आहे, म्हणून बाहेर पडलो. त्यामुळे मी त्यांनी म्हणतो, सर्वांनी एकत्र येऊन शांत बसा, असा मानसिक गोंधळ करू नका, मग ठरवा शिवसेनेतून बाहेर का पडलो, महाराष्ट्रात काय झाडी, डोंगर, हाटील नाहीयेत का? असा उपरोधिक सवालही त्यांनी यावेळी केला.

Check Also

नाना पटोले यांची टीका, मुस्लिमांशी नाते घट्ट म्हणणाऱ्या नरेंद्र मोदींचे पुन्हा मुस्लीम द्वेषावरच भाषण

मोदी सरकारने कधीच कोणाला धर्म विचारला नाही व धर्माच्या नावावर योजनाही राबवल्या नाहीत. मुस्लीमांशी आपले …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *