Breaking News

गृहनिर्माण मंत्री आणि अध्यक्षांच्या संघर्षातून म्हाडा कर्मचाऱ्यांची सुटका म्हाडा अध्यक्षाची नियुक्ती मुख्यमंत्री ठाकरे यांच्याकडून अखेर रद्द

मुंबईः विशेष प्रतिनिधी
राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखालील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार स्थानापन्न होवून दोन महिने झाले तरी सरकारमधील मंत्र्यांमध्ये अद्याप एकदिलाचे सुर अद्याप जुळले नाही. म्हाडा कर्मचाऱ्यांच्या वार्षिक क्रिडा आणि स्नेहसंमेलनाच्या कार्यक्रमाला उपस्थिती लावण्याच्या कारणावरून म्हाडा अध्यक्ष आणि नवे गृहनिर्माण मंत्री यांच्यात निर्माण झालेला संघर्षातून मुख्यमंत्र्यांच्या आदेशामुळे म्हाडाच्या कर्मचाऱ्यांची सुटका झाल्याची धक्कादायक बाब पुढे आली.
भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकारने म्हाडाच्या अध्यक्ष पदी शिवसेनेचे आमदार उदय सामंत यांची नियुक्ती केली होती. मात्र राज्यात पुन्हा भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकार न येता शिवसेनेच्या नेतृत्वाखालील काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसचे महाविकास आघाडीचे सरकार स्थानापन्न झाले. त्यामुळे भाजपा सरकारने केलेल्या महामंडळ, प्राधिकरणावरील राजकिय नियुक्त्या रद्द करण्याचा निर्णय विद्यमान मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी घेतला. विशेष म्हणजे या नव्या सरकारमध्ये उदय सामंत यांना उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे मंत्रीपद मिळाले. मात्र तरीही त्यांच्याकडून म्हाडा कारभारावर नियंत्रण ठेवण्यात येत असल्याची माहिती म्हाडातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
याच नियंत्रणाचा भाग म्हणून मंत्री उदय सामंत यांनी पुढाकार घेत म्हाडा कर्मचाऱ्यांच्या वार्षिक क्रिडा आणि स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम रत्नागिरीत आयोजित करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी म्हाडाच्या अखत्यारीत असलेल्या कोंकण गृहनिर्माण मंडळाला आयोजक म्हणून काम करण्यास सांगितले. त्यानुसार या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमाचे उद्घाटन उद्या रविवारी रत्नागिरीत होत आहे. या कार्यक्रमास गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांचा ठाम विरोध असून या कार्यक्रमाला गेल्यास कारवाई करण्याचा इशाराही म्हाडाला देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
त्यामुळे या कार्यक्रमास उपस्थित रहायचे की गैरहसर राहायचे असा प्रश्न म्हाडा कर्मचाऱ्यांसमोर निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडून गत सरकारकडून नियुक्त करण्यात आलेल्यांची नियुक्ती रद्द केल्याचे आदेश अद्याप राज्य सरकारकडून निघाले नव्हते. त्यादृष्टीने गृहनिर्माण विभागानेही यासंदर्भातील फाईल मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठविली होती. त्यावर दोनच दिवसापूर्वी सही झाल्याने मंत्री उदय सामंत यांचे म्हाडाचे अध्यक्ष संपुष्टात आले. विशेष म्हणजे त्याविषयीचे परिपत्रक कालच गृहनिर्माण विभागाकडून जारी करण्यात आल्याने मुख्यमंत्र्यांच्या सहीने गृहनिर्माण मंत्री आव्हाड आणि अध्यक्ष सामंत यांच्यातील संभावित संघर्षातून सुटका झाल्याची भावना म्हाडा कर्मचाऱ्यांमध्ये निर्माण झाली.
यासह म्हाडाच्या मुंबई मंडळ, पुणे मंडळ, नागपूर मंडळासह सर्व गृहनिर्माण मंडळावरील राजकिय नियुक्त्या रद्द करण्यात आल्याचे आदेशही गृहनिर्माण विभागाने जारी केले.

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *