Breaking News

राज्याच्या राजकारणात भाजपाच्या चार ‘भ’ चा पुन्हा एक बळीः अजित पवारांची बंडखोरी शिवसेनेपाठोपाठ आता अजित पवारांसह राष्ट्रवादीतील बडे नेतेही भाजपाच्या वळचणीला

२०१४ साली महाराष्ट्रासह देशात भाजपाप्रणित सरकार सत्तेत आले. त्यानंतर वर्षभरातच निवृत्त होणाऱ्या एका सनदी अधिकाऱ्याने त्यावेळच्या राजकिय परिस्थितीवर भाष्य करताना म्हणाले होते की, देशात आणि राज्यात सत्तेवर असलेले भाजपा सरकार म्हणजे भाषण, भ्रम, भ्रमंती आणि भय या चार भ च्या आधारे चालणारे सरकार असून यांच्या काळात चार भ शिवाय काहीही होणार नसल्याचा दावा केला होता. त्या दाव्यातील तथ्य राज्यातील राजकारणात एकनाथ शिंदे यांच्यापाठोपाठ आज राष्ट्रवादीतील बडे नेते अजित पवार यांच्यासह अनेक नेत्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस या स्वपक्षाच्या विरोधात बंडखोरी करत भाजपाच्या चार भ चे बळी असल्याचे दाखवून दिले.

काही दिवसांपूर्वी मागील एक महिन्यापासून देशाचा अविभाज्य भाग असलेल्या ईशान्य भारतातील मणिपूर राज्यात हिंसाचार सुरु आहे. मात्र त्यावर अद्याप केंद्र सरकार आणि स्थानिक भाजपा सरकारला तोडगा काढण्यात अपयश आलं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवतही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मणिपूरवर भाष्य करण्याऐवजी अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले. तेथील त्यांच्या भाषणातील आणि इतर गोष्टींमधील अनेक कच्चे दुव्वे उघडकीस आले. त्यातच देशातील प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस आणि माजी खासदार राहुल गांधी प्रश्नांनी भाजपा आणि पंतप्रधान मोदी यांना उत्तर देणे अवघड झाले आहे.

या सगळ्या घडामोडीत लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूकीला आता एक वर्षाचा कालावधी शिल्लक राहिला आहे. तसेच मागील चार वर्षात मोदी सरकारच्या कारभाराबाबत असंतुष्टतता एकप्रकारे निर्माण झाली. त्यामुळे २०२४ च्या सार्वत्रिक निवडणूकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचा पराभव होईल अशी अटकळ सध्या बांधण्यात येत होती.

तत्पूर्वीच २५ वर्षाच्या अखंड युतीतून शिवसेना बाहेर पडून काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सोबत जात भाजपाबरोबर राजकिय दुश्मनी घेतली. त्यामुळे भाजपाकडूनही विद्यमान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत शिवसेनेच्या अन्य आमदार आणि खासदारांना नोटीस रूपी भय दाखवून शिवसेनेत बंडखोरी घडवून आणली. आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्याकडून जे दावे करण्यात येत होते. त्याच दाव्याच्या अनुषंगाने भाजपाने बंडखोर एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदावर बसविले. मात्र राज्य सरकारची सारी सुत्रे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हाती ठेवली.

त्यानंतर महाविकास आघाडीतील अनेक मंत्र्यांच्या विरोधात केंद्रीय तपास यंत्रणा कामाला लागल्या. या तपास यंत्रणाच्या धाडी आणि नोटीसांमुळे राष्ट्रवादीचे अनिल देशमुख, नवाब मलिक आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना तुरुंगाची हवा खावी लागली. यापैकी अनिल देशमुख आणि संजय राऊत हे दोघे जामीनावर बाहेर आले. तर दुसऱ्याबाजूला नवाब मलिक हे ही जामीनावर कधीही बाहेर येण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

परंतु सद्यपरिस्थितीत शिवसेनेतील बंडखोरीच्या विरोधात सर्वोच्च न्यायालयाने निकाल देत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह शिवसेनेच्या १६ लोकांच्या अपात्रेचा निर्णय राज्याच्या विधानसभा अध्यक्षांच्या हाती सोपविला आहे. मात्र न्यायालयाच्या निकालाचा मतितार्थ पाहिला तर मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह १६ आमदार अपात्र ठरणार असल्याचे जवळपास निश्चित होत आहे.

त्यामुळे राज्यातील भाजपाप्रणित शिंदे गट निष्क्रीय होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे शिंदे गटाला पर्याय म्हणून राष्ट्रवादीतील बडे नेते अजित पवार, प्रफुल पटेल, छगन भुजबळ यांच्यासह जवळपास ३० ते ३५ आमदारांच्या गटाला भाजपाने फोडले. तत्पूर्वी शरद पवार, अजित पवार आणि त्यांच्या बहिणीच्या घरावर आयकर विभागाच्या, ईडीच्या धाडी टाकण्यात आल्या होत्या. त्यामुळे अजित पवार हे भाजपाच्या रडारवर असल्याचे याआधीच स्पष्ट झाले होते. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सध्याचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनाही नोटीसा बजाविण्यात आला. तसेच ईडीने दोन वेळा चौकशीसाठी बोलावले. त्यामुळे त्यांच्यावर ईडीची अर्थात भाजपाची नजर असल्याचे दाखवून देत एकप्रकारे भीतीचे वातावरण राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्माण करण्यात भाजपाला यश आले.

या भयाचा परिपाक कधी आणि केव्हा करायचा याचे टाईमिंग काही केल्या जुळून येत नव्हता. अखेर त्याचा योग काल संध्याकाळी जुळून आल्यानंतर रात्रीत नव्या मंत्र्याचा शपथविधी राजभवन येथे होणार असल्याचे संदेश संबिधत राज्य सरकारच्या यंत्रणेला देण्यात आले.
मात्र या शपथविधी सोहळ्यात नेमके कोण शपथ घेणार याची कोणतीच माहिती विद्यमान शिंदे-फडणवीस सरकारने जाहिर केली नाही. उलट आज दुपारी अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेसचा गट शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सहभागी होत मंत्रिपदाची शपथ घेणार हे स्पष्ट झाले.

त्यामुळे राजकिय धुरिणांमध्ये आणि प्रशासकिय अधिकाऱ्यांमध्ये भाजपाच्या भाषण, भ्रम, भय आणि भ्रमंतीचा परिपाक असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली.

दरम्यान, राष्ट्रवादीत संभाव्य गटबाजी कधी तरी उसळून येणार याचा अंदाज असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पक्षाच्या निर्णय प्रक्रियेची प्रमुख धुरा सुप्रिया सुळे यांच्याकडे सोपवित पक्षाचे प्रमुख आपणच असल्याचे दाखवून दिले. मात्र अजित पवार आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांमुळे पुन्हा एकदा शरद पवार यांच्या प्रमुख नेते पदावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

इंस्टाग्राम मध्ये व्हाट्सअप सारखेच फिचर!

व्हॉट्सअॅप, इन्स्टाग्राम आणि फेसबुकची मेन कंपनी मेटा आपल्या वापरकर्त्यांना नेहमी नीन अपडेट देत असते. आता …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *