Breaking News

लतादिदींची अनपेक्षित भेट…आणि त्यांच्या हातची बिर्याणी भारतरत्न, गानसम्राज्ञी, गानकोकिळा, लतादिदी मंगेशकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली...

मराठी ई-बातम्या टीम

दिदीला पाहण्याचा आणि भेटण्याचा एक दुर्मीळ असा योग माझ्या आयुष्यात आला, तो मी या माध्यमातून आपल्याशी शेअर करत आहे. ही एक अविस्मरणीय अशी भेट आहे. १९९४ ची घटना. अर्थार्जन करण्यासाठी काहीतरी करण्याची माझी धडपड सुरू होती. नाटक, ऑर्केस्ट्रा यांचे शो औरंगाबाद, बीड येथे आयोजित करायचे असा विचार मनात आला. पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचा भाव सरगम हा कार्यक्रम बऱ्याचदा त्या भागात हाऊसफुल झालेला होता. त्यामुळे उषाताई मंगेशकर यांचा “रंग उषेचे” हा कार्यक्रम घ्यावा असा मनात असलेला विचार मित्रांच्या सल्यांनी पक्का झाला. त्याकाळी मोबाईल नव्हते. त्यामुळे लँडलाईन अर्थातच महानगर टेलिफोनच्या मदतीने उषाताईंशी संपर्क साधण्यात यश मिळाले आणि मुंबई येथे त्यांची भेट घेतली. बीडसाठी एक व औरंगाबादसाठी दोन असे एकूण तीन कार्यक्रम निश्चित झाले. उषाताई सोबत आदिनाथ मंगेशकर असा कार्यक्रम ठरला.

पहिला प्रयोग औरंगाबाद, दुसऱ्या दिवशी बीड आणि परत तिसऱ्या दिवशी औरंगाबाद असे कार्यक्रम ठरले. त्या दृष्टीने तयारी सुरू केली. औरंगाबाद येथील कार्यक्रम मी स्वतः घेतले आणि बीड येथील कार्यक्रम माझा मित्र रमेश हसेगावकरला दिला

कार्यक्रमाची अँडव्हान्स रक्कम देण्यासाठी मी उषाताईंना फोन केला असता त्यांनी पुण्यास येण्यास सांगितले. त्यानुसार औरंगाबादहून निघून मी पुणे येथे साधारणतः सायंकाळी उषाताईंनी दिलेल्या पत्त्यावर पोहोचलो. खाली वॉचमनला माझे नाव सांगितले होते. त्यामुळे मी नाव सांगताच तो मला वर घेऊन गेला. मी हॉलमध्ये बसलो. आतून उषाताईंनी आवाज दिला पाटोदकर आत या. मी आत गेलो आणि काही क्षण स्तब्ध झालो. साक्षात लतादिदी समोर डायनिंग टेबलवर बसलेल्या बाजूला उषाताई आणि त्या बाजूला आता नीट आठवत नाहीत पण मीनाताई असाव्यात. बसा दिदी बोलल्या. प्राथमिक चौकशीनंतर उषाताईंनी विचारले जेवणार का? मी थोडे आढेवेढे घेत असताना उषाताई म्हणाल्या, आज स्पेशल बिर्याणी आहे आणि दिदींनी स्वतः बनवली आहे. क्षणाचाही विचार न करता मी हो म्हणालो आणि त्यादिवशी दिदींसमवेत त्यांच्यासमोर बसून त्यांनी बनवलेली बिर्याणी खाल्ली. ती अप्रतिम…..

अतिशयोक्ती नाही पण त्यास दिदींचा लाभलेला स्पर्श.. स्वादिष्ट ..  त्याचे वर्णन शब्दात करणे अशक्यच.. दरम्यान बोलताना दिदींनी त्या दरम्यान लातूर येथील झालेल्या भूकंपाबाबत चर्चा केली. तसेच सर्वांनी सावध राहावे अशा सूचना केल्या. त्यानंतर मी अॅडव्हान्सची प्रक्रिया पूर्ण करून निघालो. आजच्यासारखे त्याकाळी मोबाईल नव्हते. त्यामुळे हा स्वर्णिम सुखाचा क्षण टिपता आला नाही याची आजही खंत आहे.

आत्मानुभव डॉ.राजू पाटोदकर

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *