Breaking News

लता मंगेशकर यांच्या निधनानिमित्त सोमवारी सार्वजनिक सुट्टी राष्ट्रीय दुखवटा जाहीर केल्याने राज्यात सुट्टी जाहीर

मराठी ई-बातम्या टीम

भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनानिमित्त दोन दिवसाचा राष्ट्रीय दुखवटा केंद्र सरकारने जाहीर केला आहे. लता मंगेशकर या मुंबई आणि महाराष्ट्रात लहानाच्या मोठ्या झालेल्या आहेत. तसेच त्या भारतरत्न सन्मानित असल्याने त्यांच्या निधनानिमित्त शोक म्हणून सोमवारी सार्वजनिक सुट्टी जाहीर करणण्यात येत असल्याची माहिती मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या आदेशान्वये मुख्यमंत्री कार्यालयाने दिली.

यासंदर्भात काढण्यात आलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, आज रविवार दि ६ फेब्रुवारी २०२२ रोजी भारतरत्न लता मंगेशकर यांचे दुःखद निधन झाले असून त्यांच्या निधनामुळे संगीत आणि कला विश्वाची अपरिमित हानी झाली आहे. या महान गायिकेला श्रद्धांजली वाहण्यासाठी, परक्राम्य संलेख अधिनियम, १८८१( सन १९८१चाअधिनियम २६ ) च्या कलम २५ खाली महाराष्ट्र शासनास सोपविण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून सोमवारी ७ फेब्रुवारी रोजी राज्यात  दुखवटा म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येत आहे.

लता मंगेशकर यांना आतापर्यत राज्य सरकारबरोबरच केंद्र सरकारकडून विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात येत आलेले आहे. तसेच त्यांच्या नावाने कला क्षेत्रातील योगदानाबद्दल लता मंगेशकर पुरस्कारही देण्यात येतो. लता मंगेशकर यांना केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कार, पद्मविभूषण या पुरस्काराशिवाय सर्वोच्च असा भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. त्यामुळे त्यांच्या निधनानिमित्त शोक म्हणून ही सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

लता मंगेशकर यांना ८ जानेवारी २०२२ रोजी कोविडची लागण झाली होती म्हणून उपचारार्थ ब्रीच कॅण्डी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु त्यांच्या प्रकृतीत सुरवातीला सुधारणा झाल्यानंतर त्यांना देण्यात आलेला लाईफ सपोर्ट काढण्यात आलेला होता. परंतु काल ५ जानेवारीला पुन्हा त्यांची प्रकृती खालावल्याने पुन्हा एकदा त्यांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. दिवसभरात त्यांच्या प्रकृतीत दोन वेळा सुधारणा होवून दोन वेळा खालावली अखेर आज सकाळी ८ वाजून १२ मिनिटांनी त्यांची प्राणज्योत मालवली.

त्यांच्या निधनाचे वृत्त कळताच राज्याबरोबरच देशभरातील अनेक राजकीय नेत्यांकडून त्यांना आदरांजली वाहण्यात आली तर हिंदी आणि मराठी चित्रपटक्षेत्रातील अनेक कलावंतानी त्यांना श्रध्दांजली वाहीली.

Check Also

श्रद्धा कपूरने खरेदी केली ही महागडी गाडी , किंमत ऐकून बसेल धक्का श्रद्धाने खरेदी केली इतक्या कोटीची महागडी गाडी; होतोय शुभेच्छाच वर्षाव

अभिनेत्री श्रद्धा कपूरचे जगभरात लाखो चाहते आहेत. इतर अभिनेत्रींपेक्षा ती नेहमीच वेगळी असते आणि तिचा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *