Breaking News

मुख्यमंत्र्यांकडे रूजू होण्यासाठी ३ हजार तर उपमुख्यमंत्र्यांकडे ६० अर्ज अर्ज तपासणी करायची कशी प्रशासन विभागाला प्रश्न

मुंबईः विशेष प्रतिनिधी
राज्यात सत्तांतर झाल्यानंतर प्रत्येक मंत्र्यांकडे खाजगी सचिव आणि विशेष कार्य अधिकारी अर्थात ओएसडी पदावर काम करण्यसाठी अनेक अतिरिक्त आणि उपजिल्हाधिकाऱ्यांनी लॉबींग सुरु केले आहे. त्यातच मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे काम करण्यासाठी तब्बल ३ हजार अधिकाऱ्यांनी तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडील तीन जागांसाठी ६० जणांनी अर्ज केल्याची माहिती मंत्रालयातील विश्वसनीय सूत्रांनी दिली.
माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारच्या काळात खाजगी सचिव, ओएसडी पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्यांना पुन्हा भाजपा सरकारच्या काळात घ्यायचे नाही असा निर्णय घेतला होता. त्यामुळे आघाडी सरकारच्या काळात या दोन्ही पदावर कार्यरत राहीलेल्या अधिकाऱ्यांना आपल्या मुळ विभागात जावे लागल्याने त्यांच्यावर पाच वर्षे मंत्रालयापासून दूर राहण्याची वेळ आली. आता सरकार बदलल्याने या अधिकाऱ्यांनी पुन्हा मंत्रालयात अर्थात मंत्र्यांकडे रूजू होण्यासाठी मोठ्या प्रमाणात लॉबींग सुरु केल्याचे त्यांनी सांगितले.
मंत्रिमंडळातील सर्वच मंत्र्यांकडे आपापल्या परीने प्रत्येक अतिरिक्त जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी प्रयत्न करत आहे. मात्र राज्यातील संसदीय राजकारणात मुख्यमंत्री उध्दव ठाकरे हे नविन असल्याने त्यांच्याकडे खाजगी सचिव आणि ओएसडी म्हणून रूजू होण्यासाठी आतापर्यंत ३ हजार अधिकाऱ्यांनी अर्ज केले आहेत. आतापर्यंतच्या काळातील सर्वात जास्त अर्जांचा आकडा असल्याचेही त्यांनी सांगितले.
त्यानंतर या अधिकाऱ्यांकडून दुसरी पसंती ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिली आहे. उपमुख्यमंत्र्यांकडे तीन अधिकाऱ्यांच्या जागा असून या तीन जागांसाठी ६० जणांनी अर्ज केल्याचे त्यांनी सांगितले.
इतक्या मोठ्या प्रमाणावर या दोन्ही मंत्र्यांकडे अर्ज केल्याने या सर्व अर्जांची छाणणी करायची कधी आणि कशी असा सवाल सामान्य प्रशासन विभागाला पडल्याचे सामान्य प्रशासन विभागातील एका अधिकाऱ्याने सांगितले.

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *