Breaking News

नारायण राणेंचे अटक नाट्य, नेमका फायदा शिवसेना की भाजपाला? भाजपा फसणार की शिवसेनेवर कुरघोडी करणार

राज्याच्या राजकारणात पूर्वाश्रमीचे शिवसैनिक आणि आताचे भाजपाचे नेते तथा केंद्रीय मंत्री नारायण राणे हे एक आक्रमक नेते म्हणून ओळखले जातात. शिवसेना सोडल्यापासून काँग्रेसमधला काही काळ वगळता नारायण राणे यांच्याकडून सातत्याने शिवसेनेपेक्षा शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यावर टीका केली जाते. या टीकेचा त्यांना राजकिय फायदा झाला की नाही यापेक्षा केवळ उध्दव ठाकरेंचे विरोधक म्हणूनच त्यांचे राज्याच्या राजकारणातील स्थान आता निश्चित झाले.

या संपूर्ण दिड आठवड्याच्या कालावधीत शिवसेनेविरोधात भाजपाला आपली प्रतिमा सुधारण्याची संधी असतानाही त्यांनी स्वत:ची प्रतिमा पुन्हा महाराष्ट्र आणि शिवसेना विरोधीच अशी कायम ठेवण्यात यशस्वी झाल्याचे दिसत असून राणे यांच्या अटक नाट्याच्या निमित्ताने शिवसेनेला आम्हीही भाजपा विरोधात जशास तसे आक्रमक उत्तर देवू शकतो असा संदेश देण्याचा होता. मात्र भाजपा शिवसेना आणि नारायण राणे यांना या नाट्यानंतर आपले नेमके स्थान काय असेल याचा अंदाजच न आल्याने शिवसेना वगळता सर्वांनी आपल्या आहे त्याच जागा राखण्यासाठी प्रयत्न केल्याचे दिसून येत आहे.

राज्यातील मुंबईसह १३ महापालिकेच्या आगामी महापालिका निवडणूका आणि देशातील काही राज्यांमध्ये होवू घातलेल्या विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्रिमंडळात फेरबदल होत पहिल्यांदाच जातीपातीच्या पलिकडे न पाहणाऱ्या भाजपाने जातनिहाय व्यक्तींचा समावेश मंत्रिमंडळात केला. त्याचा मोठा प्रचारही व्यवस्थितरित्या भाजपाने केला. या प्रचाराचा भाग म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी नवनियुक्त मंत्र्यांना त्यांच्या भागात जन आर्शिवाद यात्रा करायला सांगून निवडणूकीच्या प्रचाराची पुढील रणनीतीचा अंदाज सगळ्यांच्या नजरेस आणून दिला. महाराष्ट्रात कोणीही असो पण मुंबईत शिवसेनाच हवी हे उघड सत्य भाजपा वगळता सर्वपक्षियांनी मान्य केले आहे. तरीही भाजपा शिवसेनेकडून मुंबईची सत्ता हस्तगत करण्याच्या उद्देशाने नारायण राणे यांच्या निमित्ताने म्हणजे शिवसेना अर्थात विद्यमान मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या विरोधात प्रचार करणारा एकमेव सक्षम नेत्याला पुढे करत त्यांच्या जन आर्शिवाद यात्रेची सुरुवात मुद्दाम मुंबईतून सुरु केली.

वास्तविक पाहता शिवसेनेनेही आतापर्यत नारायण राणे यांच्या एखाद्या टीकेला प्रत्तितुर देवून तो वाद तिथेच संपवित आले आहेत. यात्रेच्या निमित्ताने राणे यांनी मुंबईत पाऊल ठेवल्यानंतर शिवसेनेला डिवचण्याची एकही संधी सोडली नाही. मात्र यावेळी राणे यांनी पाली येथे मुख्यमंत्री ठाकरे यांच्या विषयी अवमान कारक वक्तव्य केले. त्या वक्तव्याची फारशी दखलही प्रसारमाध्यमांनी घेतली नव्हती. तरीही शिवसेनेने ते वाक्य फारच मनावर घेत महाड आणि नाशिक येथे शिवसैनिकांमार्फत गुन्हे दाखल केले.

आतापर्यत नारायण राणे यांनी जेव्हा जेव्हा शिवसेनेला आव्हान दिले तेव्हा त्याचा फायदा राणे यांना होण्याऐवजी तो शिवसेनेलाच झाला आहे. यापूर्वीही राणे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर कोकणात शिवसेनेला आव्हान देत काँग्रेसचे उमेदवार निवडूण आणण्यासाठी मोठी ताकद उभी केली. मात्र त्यावेळी राणेंच्या पारड्यात फारसे काही पडले नाही. मात्र त्यांच्या विरोधात दस्तुरखुद्द शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे हे प्रचारासाठी कोकणात आले होते. तरीही राणे त्यावेळच्या विधानसभा निवडणूकीत पराभूत होवू शकले नाहीत.

पुढील वर्षी मुंबई महापालिकेची निवडणूक होणार असून या निवडणूकीत शिवसेनेकडून काहीही करून मुंबई महापालिका हिसकावून घ्यायचीच म्हणून भाजपाने आतापासूनच ताकद लावली आहे. त्याचाच भाग म्हणून राणे यांचा दौरा मुंबईतून सुरु करण्यात आला. राणेंच्या वक्तव्यांनी शिवसेनेबद्दल विशेषत: मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याबद्दल सकारात्मक वातावरण निर्माण होत असतानाच त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करून स्वत:ला मिळत असलेली सहानूभुतीची लाट भाजपाकडे परत वळण्याचा धोका शिवसेनेने स्विकारत राणे यांच्या अटकेचे नाट्य तयार केले.

या अटक नाट्यानंतर पुन्हा भाजपाने आक्रमक भूमिका घेण्यास सुरुवात करत चुकीची राजकिय पावले टाकण्यास सुरुवात केली. राणे यांच्या विरोधात शिवसेनेने पोलिसात गुन्हे दाखल केले म्हणून गंगा नदीत मृतदेह सोडल्यावरून आधीच बदनाम झालेले उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल तीन वर्षापूर्वी उध्दव ठाकरे यांनी केलेल्या वक्तव्याच्या अनुषंगाने यवतमाळ, नाशिक आणि उत्तर प्रदेशात तक्रार दाखल करण्यास सुरुवात केली. मात्र राज्यातील जनतेत योगींबद्दल ममत्व असण्याचे काही कारण नसल्याने भाजपाच्या कृतीकडे महाराष्ट्रातील नागरीकांनी सूडबुध्दीचे राजकारण म्हणून पाहण्यास सुरुवात केली. यापूर्वीही बिहारमधील निवडणूका नजकेसमोर ठेवून बॉलिवूड अभिनेता सुशांतसिंग राजपूत याच्या आत्महत्याप्रकरणावरून महाराष्ट्राबद्दल अशी नकारात्मक प्रतिमा स्थापित करण्याचा प्रयत्न भाजपा नेत्यांकडून झाला होता. तोच प्रयत्न उध्दव ठाकरेंच्या विरूध्द तक्रार प्रकरणात भाजपाने केला. परिणामी भाजपाला राणेंच्या निमित्ताने खराब झालेली राजकिय प्रतिमा सुधारण्याची संधी हातातून वाया घालवली.

या अटक नाट्यांवरून अखेर भाजपाने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत थोडीची प्रतिमा सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र न्यायालयानेही राणे यांच्यावर तातडीने कोणतीही कारवाई नको असे तात्पुरते आदेश देत काही काळापुरता भाजपाला आपली प्रतिमा सावरण्याची संधी दिली. कदाचित त्याचाच भाग म्हणून भाजपाने इतरांची नावे पुढे करण्यापेक्षा नारायण राणे यांनाच टीका करा पण जरा भान ठेवून असा सल्ला दिला असावा. त्यानंतरच राणे यांनीही आपल्या टीकेचा रोख थेट न ठेवता तो नेहमी आडवळणाने शिवसेना आणि उध्दव ठाकरे यांच्यावरील टीका कायम सुरु ठेवली.

भाजपा आणि शिवसेने दरम्यान ताणले गेलेले राजकिय संबधाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील प्रतिमा सुधारण्याची संधी भाजपाला वेगळ्या पध्दतीने आणखी सुधारण्याची संधी हाती होती. मात्र आता नारायण राणेंची जन आर्शिवाद यात्रा संपताच ज्या तातडीने राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीची नोटीस मिळाली त्यावरून शेवटची उरली सुरली संधीही भाजपाने वाया घालविल्याचे दिसून येत आहे.

वास्तविक पाहता महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसला खरी भीती ही देवेंद्र फडणवीस यांची आहे. नारायण राणे यांच्या अटक नाट्यानंतर खरे तर महाविकास आघाडीने एकप्रकारे राज्यातील भाजपाचे नेतृत्व नारायण राणे यांच्या हाती जाण्याची खेळी केली होती. त्यामुळेच त्या कालावधीत देवेंद्र फडणवीस हे कोणत्याही जन आर्शिवाद यात्रेत सहभागी नसल्याने सगळ्या प्रसार माध्यमांचा फोकस हा नारायण राणे यांच्यावर एकवटला होता. तसेच राणे आक्रमक आणि लढवय्ये नेतेही आहेत अशी नवी ओळख निर्माण होण्यास मदत होत होती. तशा चर्चेला कोकणात सुरुवातही झाली. परंतु शिवसेना आणि उध्दव ठाकरे यांच्या आकंठ विरोधात बुडालेल्या नारायण राणे यांना कदाचित ही संधी नजरेस पडली नसावी. त्यामुळे या सर्व घटनांमध्ये फक्त राणे विरूध्द ठाकरे असेच चित्र राहीले.

तसेच राज्याच्या भाजपा नेतृत्वाची संधी राणे यांच्याकडून पुन्हा एकदा फडणवीस यांच्या हाती परत तशीच राहीली. तर दुसऱ्याबाजूला काही दिवसांपूर्वी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अनिल परब यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्याची कार्यवाही सुरु असल्याचे सांगलीतील जाहिर संभेत सांगितले होते. त्यानंतर काही तासातच ईडीने अनिल परब यांना नोटीस बजाविल्याने भाजपाकडचा सहानुभूतीचा लंबक आता पुन्हा शिवसेनेकडे सरकणार असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राणेंच्या आडून देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाना साधणाऱ्या महाविकास आघाडीतील नेत्यांना आता शिवसेना मोठा होताना पहावे लागणार आहे. तर केंद्रातील सरकारच्या जोरावर फडणवीसांची जरबही आता सोसावी लागणार आहे.

लेखन- गिरिराज सावंत

Check Also

देशाच्या १५ व्या राष्ट्रपती म्हणून द्रौपदी मुर्म यांनी शपथ घेतल्यानंतर म्हणाल्या… सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश एन.व्ही.रमण्णा यांनी दिली शपथ

राष्ट्रपती पदाच्या निवडणूकीत ६४ टक्के मते मिळवित विजयी झालेल्या द्रौपदी मुर्मु यांना आज देशाच्या १५ …

Leave a Reply

Your email address will not be published.