Breaking News

तृतीयपंथीयांनाही मिळणार सरकारी घर, शैक्षणिक, वैद्यकीय सुविधांचा लाभ

कल्याण आणि हक्कांचे करणार संरक्षण करणार असल्याची मंत्री बडोले यांची ग्वाही 

मुंबई : प्रतिनिधी

तृतीयपंथीय कल्याण मंडळाच्यावतीने तृतीयपंथीय नागरिकांना ओळखपत्र वितरीत केली जातील. त्यांना शिक्षणात सहाय्य होईल, अशी मॅट्रीकोत्तर शिष्यवृती देण्यात येईल, पात्र असूनही ज्यांना वसतिगृहात प्रवेश मिळाला नाही, अशा तृतीयपंथीय विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ देण्यात येईल. या योजनेंतर्गत वार्षिक ४८ हजार ते ६० हजार रूपयांपर्यंत त्यांना शिष्यवृत्ती मिळेल. सुशिक्षित तृतीयपंथीयांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी मंडळाच्या माध्यमातून कौशल्यविकासाच्या योजना राबवल्या जातील. अशा भक्कम उपाययोजना राबवल्यामुळे जगण्यासाठी तृतीयपंथीय घटकाला समाजापुढे हात पसरण्याची वेळ येणार नसल्याची माहिती सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी दिली.

तसेच त्यांच्या हक्कासाठी राज्यात तृतीयपंथीय कल्याण मंडळाची स्थापना करण्यात आली असून यामाध्यमातून तृतीयपंथीय नागरिकांचे कल्याण व त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. यासंबंधी बडोले यांच्या अध्यक्षतेखाली गुरूवारी मंत्रालयात पार पडलेल्या बैठकीनंतर त्यांनी आपल्या दालनात पत्रकारांना सविस्तर माहिती दिली.

तृतीयपंथीय अर्थात ट्रान्सजेंडर हा समाजातील दुर्लक्षित घटक असून त्यांच्याप्रति असलेल्या गैरसमजातून त्यांना समाजाकडून सापत्न आणि भेदभावाची वागणूक दिली जाते. त्यामुळे उद्विग्न अवस्थेत जीवन कंठणारा हा घटक कायम विकासाच्या प्रक्रियेपासून दुर्लक्षित राहिलेला आहे. त्यामुळे समाजिक घटकांचे पालकत्व स्विकारलेल्या शासनाने तृतीयपंथीय घटकांच्या हक्कांच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्या कल्याणासाठी उपाययोजना करणाऱ्या तृतीयपंथीय कल्याण मंडळाची स्थापना केली आहे. त्यामुळे येत्या काळात तृतीयपंथीय नागरिकांना सन्मानाने जगण्याचा आणि विकासाच्या मुख्य प्रवाहात सहभागी होण्याच मार्ग मोकळा होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

समाजात सन्मानाने वास्तव्य करता यावे यासाठी तृतीयपंथीय घटकांकरीता आवास योजना राबवण्यात येईल. आरोग्यविषयक जागृतीसाठी आणि इलाजासाठी कँप राबवण्यात येतील त्यामुळे स्वतःच्या आरोग्यविषयक असलेल्या उदासीनतेपासून त्यांना परावृत्त करता येईल, याशिवाय व्यसनाधिनतेपासून रोखण्यासाठी व्यसनमुक्तीची मोहीमही राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मंत्र्याच्या अध्यक्षतेखाली स्थापित या कल्याण मंडळाचे सह अध्यक्ष सामाजिक न्याय राज्यमंत्री असून विभागाचे प्रधान सचिव उपाध्यक्ष आहेत. तृतीयपंथीय समुदायातील विख्यात एक व्यक्ती सहउपाध्यक्ष तर विधान परिषद, विधानसभेचा प्रत्येकी एक सदस्यासह विधी, वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातील प्रत्येकी एक व्यक्ती सदस्य असणार आहे. याशिवाय विविध १४ विभागाचे सह सचिव/ उपसचिव दर्जाचा एक प्रतिनिधी सदस्य, तर बार्टी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता प्रतिष्ठान, एड्स कंट्रोल सोसायटीचा प्रत्येकी एक सदस्य तर आयुक्त समाजकल्याण हे मंडळाचे सदस्य सचिव व समन्वयक असलेली राज्यस्तरीय समिती गठीत करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

एक स्वप्न नव्या भारत जोडो न्याय यात्रेचे ; शिखराच्या पायथ्याशी असलेल्या युतीचे

केवळ राजकारण करून भाजपा-आरएसएसचा पराभव करू शकत नाही. त्यात राजकारण आणि विचारधारा असणे आवश्यक आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *