Breaking News

चला, मराठी ‘म्हण’ जपू या! मराठीचे ‘धन’ जपू या!

मराठी भाषा गौरव दिनी ज्येष्ठ नाटककार एलकुंचवार, भाषा अभ्यासक डॉ. कल्याण काळे, भाषासंवर्धक डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांचा सन्मान

 मुंबई : प्रतिनिधी

२७ फेब्रुवारी, हा ज्ञानपीठ पुरस्कार विजेते श्रेष्ठ कवी कुसुमाग्रज यांचा जन्मदिन दरवर्षी मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा केला जातो. याही वर्षी महाराष्ट्र शासनातर्फे भव्य आणि विविधांगी कार्यक्रमांच्या माध्यमातून मराठी भाषा गौरव दिन साजरा होणार आहे. बुधवारी २७ फेब्रुवारी, २०१९ रोजी सायंकाळी ६.०० वाजता मुंबईतील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृह येथे साहित्य व भाषाविषयक पुरस्कार प्रदान सोहळा योजण्यात आला आहे. या कार्यक्रमात मराठी भाषा विभागाचे सर्वोच्च पुरस्कार प्रदान करण्याबरोबरच, मराठी भाषा हे मध्यवर्ती सूत्र असलेला ‘मऱ्हाटी भाषासुंदरी’ हा सांगितिक कार्यक्रमही सादर होणार आहे. तसेच विविध साहित्य प्रकारांतील राज्य वाङ्मय पुरस्कार प्रदान केले जाणार आहेत. याच कार्यक्रमात गेल्या वर्षभरातील साहित्य अकादमी पुरस्कार विजेत्या मराठी साहित्यिकांचा विशेष सन्मानही केला जाणार आहे, अशी माहिती मराठी भाषा मंत्री विनोद तावडे यांनी आज एका पत्रकाद्वारे दिली.

या वर्षीचा कविवर्य विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार यांना प्रदान करण्यात येणार आहे. रु. ५ लक्ष रोख, सन्मानचिन्ह व मानपत्र असे विंदा करंदीकर जीवनगौरव पुरस्काराचे स्वरुप आहे. तसेच, श्री.पु. भागवत स्मृती उत्कृष्ट प्रकाशन पुरस्कार नागपूर येथील साहित्य प्रसार केंद्र या प्रकाशन संस्थेला प्रदान करण्यात येणार असून, रु. ३ लक्ष रोख, सन्मानचिन्ह व मानपत्र असे ह्या पुरस्काराचे स्वरुप आहे. या वर्षीचा, डॉ. अशोक केळकर भाषा अभ्यासक पुरस्कार डॉ. कल्याण काळे यांना आणि कविवर्य मंगेश पाडगांवकर भाषासंवर्धक पुरस्कार डॉ. हरिश्चंद्र बोरकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. रु. २ लक्ष रोख, सन्मानचिन्ह व मानपत्र असे केळकर व पाडगांवकर ह्या दोन्ही पुरस्कारांचे स्वरुप आहे.

पुरस्कार सोहळ्यादरम्यान ऋषीकेश रानडे, प्रथमेश लघाटे, शमिका भिडे, कमलेश भडकमकर यांच्यासह अनेक दर्जेदार कलाकार ‘मऱ्हाटी भाषासुंदरी’ हा मराठी भाषेची वैशिष्ट्ये सांगणारा कार्यक्रम सादर करणार आहेत. तसेच या कार्यक्रमात भाषा संचालनालयाच्या ५ परिभाषा कोशांचे आणि महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती महामंडळाच्या ९  नव्या पुस्तकांचे प्रकाशनही होत आहे.

मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने, यंदा मध्यवर्ती संकल्पना म्हणून ‘मराठी म्हणी’ या विषयाला प्राधान्य देण्यात येणार आहे.

चला, मराठी ‘म्हण’ जपू या! मराठीचे ‘धन’ जपू या! चला, मराठी ‘म्हण’ जपू या! मराठीचे ‘मन’ जपू या!…  

…हा संकल्प करून, महाराष्ट्रातील सर्व शाळा, महाविद्यालये, ग्रंथालये, सांस्कृतिक व साहित्यिक संस्था यांनी ‘मराठी म्हणी’ या विषयाशी संबंधित उपक्रमांचे आयोजन करून मराठी भाषेच्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहनही त्यांनी केले.

कुसुमाग्रजांचा जन्मदिन आणि सुविख्यात साहित्यिक पु. ल. देशपांडे, शब्दप्रभू ग. दि. माडगुळकर व श्रेष्ठ संगीतकार सुधीर फडके या महात्रयीची जन्मशताब्दी यांचे औचित्य साधून विधानभवन परिसरात २७ फेब्रुवारी, २०१९ रोजी सकाळी कुसुमाग्रजांच्या प्रतिमेस आदरांजली अर्पण करण्यात येणार असून, त्याठिकाणी पुलं-गदिमा-बाबुजी यांच्या प्रतिमाही  ठेवण्यात येणार आहेत, अशी माहिती श्री. तावडे यांनी दिली. मराठी भाषा आणि संस्कृतीच्या संवर्धनात अमूल्य योगदान देणार्‍या या त्रिमूर्तीचे विविध संस्थांनी यथोचित स्मरण करावे, असे आवाहनही त्यांनी केले.

भारतातील पहिल्या पुस्तकांच्या गावातही (भिलार, ता. महाबळेश्वर, जि. सातारा ) येथेही मराठी भाषा गौरव दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जाणार आहे. यंदा पुस्तकांच्या गावात खुल्या प्रेक्षागृहात दुपारी ४ वाजता “इये मराठीचिये नगरी” हा मराठी भाषेतील वैविध्याचे आणि समृद्धीचे स्मरण करून देणारा कार्यक्रम सादर होणार आहे. यात मंदार परळीकर यांच्यासह अनेक दर्जेदार कलाकार सहभागी होत आहेत. या कार्यक्रमास भिलार, पाचगणी, वाई, महाबळेश्वर, सातारा, पुणे  परिसरातील रसिकांनी उपस्थित राहून आनंद घ्यावा, असे आग्रही आवाहनही त्यांनी केले.

मराठी भाषा गौरव दिनी पुरस्कार सोहळ्यापूर्वी, महाराष्ट्राचे राज्यपाल. सी. विद्यासागर राव, राजभवन येथे पुरस्कार विजेत्या साहित्यिकांशी अनौपचारिक संवाद साधणार आहेत आणि भाषा गौरव दिनाच्या उत्सवात आपला सहभाग नोंदवणार आहेत, अशीही माहितीही त्यांनी दिली.

Check Also

एक स्वप्न नव्या भारत जोडो न्याय यात्रेचे ; शिखराच्या पायथ्याशी असलेल्या युतीचे

केवळ राजकारण करून भाजपा-आरएसएसचा पराभव करू शकत नाही. त्यात राजकारण आणि विचारधारा असणे आवश्यक आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *