Breaking News

शरद पवारांकडून पहिल्यांदाच भक्तांच्या आयटी सेलचा उल्लेख व्हॉट्सअँपच्या माध्यमातून गैरसमज निर्माण करण्याचे आयोजन आहे का?

मुंबई: प्रतिनिधी

आज सर्व सामाजिक स्तरावर, जात, धर्म या सर्वांनी एकजुटीने राहण्याची आवश्यकता आहे. कुठल्याही परिस्थितीत कटूता वाढेल, गैरसमज होतील, संशय वाढेल ही स्थिती येवू देता कामा नये. टेलिव्हिजनवर बघतो, त्याहीपेक्षा व्हॉटसअप वरुन जे काही मेसेज येतात ते मेसेज थोडेसे काळजी करणारे आहेत. काही मेसेजची तपासणी केल्यानंतर एक गोष्ट लक्षात आली ती म्हणजे ५ मेसेज आले तर त्यापैकी ४ मेसेज खोटे असतात. हे खोटे मेसेज देवून लोकांच्या मनात संभ्रम निर्माण करण्याची काळजी घेतली जात आहे. आणि काही वास्तव चित्र पुढे आले त्याबद्दलची पुन्हा पुन्हा मांडणी करून गैरसमज निर्माण करण्याचे कुणाचे आयोजन आहे का?  अशी शंका राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी उपस्थित करत कथित भक्तांच्या आयटी सेलकडून राबविण्यात येत असलेल्या खोट्या प्रचाराकडे त्यांनी अंगुली निर्देश केला.

शरद पवारांनी आज पुन्हा एकदा सोशल मिडियाच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला, दिल्लीतील निजामुद्दीनचा झालेला प्रकार. ते संमेलन होते. खरंतर अशाप्रकारचे संमेलन घ्यायलाच नको होते. या संमेलनाला ज्यांनी कुणी परवानगी दिली असेल ती परवानगी देण्याची अजिबात आवश्यकता नव्हती. महाराष्ट्रात काही ठिकाणी अशाप्रकारचे संमेलन घेण्याबाबतची विनंती धार्मिक संघटनेच्यावतीने करण्यात आली होती. परंतु राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री यांनी विचार करून परवानगी नाकारली. त्यामुळे अशी खबरदारी दिल्लीत घेतली असती तर अशी खंत व्यक्त करत एखाद्या समाजाचं चित्र वेगळया पध्दतीने मांडण्याचे प्रयत्न करुन त्यातून सांप्रदायिक ज्वर वाढेल की काय अशा प्रकारची परिस्थिती निर्माण केली जातेय, ती करण्याची संधी मिळाली नसती अशी खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली.

सोलापूर जिल्हयातील एका गावात बैल आणि घोड्याच्या शर्यती ठेवण्यात आल्या होत्या. हजारो लोक यावेळी जमणार होते. मात्र पोलिसांनी तात्काळ त्यांच्यावर गुन्हे दाखल केले. आज सोलापुरात जी तत्परता दाखवली गेली. त्यामुळे तिथले प्रकार तिथेच थांबले तसे आज तशी तत्परता जर दिल्लीत दाखवली असती तर आज जे काही घडतंय ते घडलं नसतं. आणखी एक गोष्ट जे दिल्लीत घडलं ते रोज टेलिव्हिजनवर दाखवायची गरज आहे का?  असा सवाल उपस्थित करत रोज रोज दाखवून कोणती परिस्थिती निर्माण करू पहातो आहोत असा सवालही त्यांनी दूरचित्रवाहीन्यांना विचारला.

आज खरी गरज काळजी घेण्याची आहे, आणि त्यानंतर दोन स्टेजेस फार महत्वाचे आहेत. एक संपूर्ण देशाच्या अर्थकारणावर होणारा विपरीत परिणाम व समाजाच्या आरोग्यावर होणारा विपरीत परिणाम. या दोन गोष्टींमुळे काही गोष्टी घडतील असे दिसतंय. जाणकारांनी सांगितल्याप्रमाणे बरेच दिवस उद्योग व व्यवसाय बंद राहिले. या सर्वांचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होईल आणि हे निव्वळ देशाच्याच नाही तर प्रत्येक व्यक्तीच्या अर्थकारणावर परिणाम करणार आहे असे सांगतानाच रिझर्व्हं बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी या परिस्थितीनंतर जी संकटं येणार आहेत त्यामध्ये सर्वाधिक मोठं संकट हे रोजगार कमी होवून रोजगार बुडण्याचे भाकित वर्तविले. दरम्यान या बुडणाऱ्या रोजगाराला तोंड कसं द्यायचं याचा विचार जाणकारांनी केला पाहिजे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विनंती केली आहे की, अर्थकारणाला कसं तोंड द्यायचं याचा विचार करण्यासाठी काही जाणकार लोकांना आपण बोलवुया. ज्यांनी या सर्व क्षेत्रात काम केले आहे अशा लोकांचा सल्ला घेवूया आणि पुढचे सहा महिने, वर्षभर महाराष्ट्रात कशापध्दतीने पाऊल टाकून कोरोनामुळे अर्थकारणावर जे काही विपरीत परिणाम आहेत. जे बेरोजगारी व तत्सम प्रश्न निर्माण होतील यातून बाहेर कसं पडायचं याची काळजी घेण्यासाठी एकप्रकारचा ‘टास्कफोर्स’ नेमणं उपयुक्त असल्याचे त्यांनी सांगितले.

केंद्र सरकारकडेही काही गोष्टींची अपेक्षा निश्चितपणे केली पाहिजे असे सांगतानाच केंद्र सरकारने या सर्व राज्यांना या अर्थकारणातून बाहेर काढण्यासाठी एक आर्थिक पॅकेज देण्याची मागणी शरद पवार यांनी केली. याशिवाय देशातील शेती व्यवसायालासुध्दा एकप्रकारचे मार्गदर्शन करण्याची अपेक्षा शरद पवार यांनी केंद्र सरकारकडून केली.

आपल्या देशात गव्हाचे प्रमाण उत्तर हिंदुस्थानात जास्त आहे तर तांदळाचे दक्षिणेकडे जास्त आहे. रब्बी हंगाम संपत आला आहे. गहू, तांदूळ अशी पीकं वर आली आहेत. मात्र ही पीकं अजूनही शेतातच आहे. त्यात हरभरा, गहू आहे ही सर्व पीकं वेळीच काढली नाही तर त्याचा परिणाम शेती अर्थव्यवस्थेवर होईल अशी भीती व्यक्त करतानाच पुढच्या दहा बारा दिवसात हा रब्बी हंगाम कशा पध्दतीने घ्यायचा याप्रकारचे मार्गदर्शन केंद्र सरकारच्या कृषी विभागाच्यावतीने सर्व भाषेत सर्व राज्यात टेलिव्हिजन व अन्य मार्गाने करण्याचा कार्यक्रम आखण्याची आवश्यकता आहे याचा विचार निश्चितपणे केला जाईल असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला.

११ एप्रिलला महात्मा फुले यांची जयंती आहे. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांनी आपल्याला ज्ञानाचा व एकतेचा संदेश दिला. त्यामुळे महात्मा फुले जयंतीच्या दिवशी ज्ञानाचा दिवा लावून ‘एक दिवा ज्ञानाचा’ याप्रकारचा संदेश या माध्यमातून देण्यासाठी हा अतिशय योग्य दिवस आहे. तर १४ एप्रिलला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती आहे. बाबासाहेबांची जयंती जवळपास महिनाभर या ना त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून साजरी केली जाते. मात्र यावेळची बाबासाहेबांची जयंती आपण’ एक दिवा संविधानासाठी’ लावून साजरी करुया मात्र याला उत्सवाचं स्वरूप येता कामा नये असे आवाहनही त्यांनी केले.

आज जगातील चित्र आपल्या पेक्षा भयावह आहे. दिवसेंदिवस माहिती मिळतेय त्यानुसार कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय असे चित्र आहे. जी काही माहिती केंद्र सरकारच्या आरोग्य विभागाने बाहेर जाहीर केली त्यानुसार आपल्या देशात आज रोजी ४ हजार ६७ केसेस कोरोनाच्या आहेत. यामध्ये ३ हजार ६६६ या केसेस अॅक्टीव्ह आहेत. त्याची काळजी आपल्याला घ्यायची आहे. वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर्स, नर्सेस व त्यांचे सहकारी काळजी प्रामाणिकपणे व कष्टाने घेत आहेत. आतापर्यंतची माहिती मिळते त्यामध्ये ११८ जणांचे देशात मृत्यू झाले आहेत एकंदर कोरोनामुळे आजारी असलेले ३२८ रुग्ण बरे होवून घरी गेले आहेत. त्यामुळे ज्या काही सूचना देण्यात आल्या त्या पाळण्यासाठी कटाक्षाने पाळण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

एक स्वप्न नव्या भारत जोडो न्याय यात्रेचे ; शिखराच्या पायथ्याशी असलेल्या युतीचे

केवळ राजकारण करून भाजपा-आरएसएसचा पराभव करू शकत नाही. त्यात राजकारण आणि विचारधारा असणे आवश्यक आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *