Breaking News

साहित्यिक, सामाजिकक्षेत्रात खळबळ माजविणाऱ्या “झुलवा” काराचे निधन मुख्यमंत्री ठाकरे, उपमुख्यमंत्री पवार यांनी वाहिली श्रध्दांजली

मुंबई: प्रतिनिधी
राज्याच्या साहित्यिक क्षेत्रात दलित साहित्यातील नामवंतानंतर देवदासी प्रथेतील जुलमी धार्मिक रूढीच्या विरोधात आवाज उठविणारे प्रसिध्द झुलवा पुस्तकाचे लेखक उत्तम बंडू तुपे यांचे आज सकाळी निधन झाले. त्यांच्या कांदबरीने आणि त्यावरील नाटकाने साहित्य, नाट्यक्षेत्रात एकच खळबळ उडवून दिली होती. त्यांच्या पश्चात पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे.
गेले काही महिने ते सतत आजारी होते. त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील एनकूळ या गावी झाला. त्यांनी कळा, कळाशी, नाक्षारी, भस्प, चिपाड, इंजाल, झावळ, माती आणि माणसं, शेवंती, खुळी, खाई आदी कादंबऱ्या आणि लघुकथासंग्रह गाजले. त्यांच्या आंदण या कथासंग्रहाला राज्य शासनाचा साहित्य परिषदेला तर काट्यावरती पोट या आत्मकथेला उत्कृष्ट वाड:मय पुरस्कार मिळाला.

माती आणि माणसं यांच्याशी नाळ जुळलेला कसदार साहित्यिक राज्याने गमावला- उद्धव ठाकरे
ज्येष्ठ साहित्यिक झुलवाकार उत्तम बंडू तुपे यांच्या निधनाने माती आणि माणसं यांच्याशी नाळ जुळलेला कसदार साहित्यिक आज महाराष्ट्राने गमावला आहे अशा शब्दात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपली शोकभावना व्यक्त केली आहे
कादंबरी, लघुकथा, नाटक, आत्मकथन यासारख्या साहित्य प्रकारात त्यांनी लिलया वावर केला. उपेक्षित वंचित समाजाच्या वेदना आणि व्यथा यांना त्यांनी आपल्या लेखणीतून वाचा फोडली. लेखनीवर मनापासून प्रेम करणाऱ्या तुपे यांना अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते. त्यांचे झुलवा, भस्म, आंदण, पिंड, माती आणि माणसं , काट्यावरची पोटं, लांबलेल्या सावल्या, शेवंती या पुस्तकांनी वाचकांच्या मनावर गारुड निर्माण केलं.
त्यांच्या लेखणीतून चित्रित झालेली सामाजिक वास्तविकता आणि सचोटी जीवनातील संघर्षावर परखडपणे भाष्य करत असल्याने ती वाचकांना अंतर्मुख करत असे असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले.

अण्णाभाऊंचा वारसा पुढे नेणारा सिद्धहस्त, संवेदनशील साहित्यिक हरपला-उपमुख्यमंत्री
समाजातील उपेक्षित, वंचित वर्गाच्या वेदनांना साहित्याच्या माध्यमातून वाचा फोडण्याचे काम ‘झुलवाकार’ उत्तम बंडू तुपे यांनी आयुष्यभर प्रामाणिकपणे केले. त्यांच्या निधनाने साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंचा साहित्यिक वारसा पुढे नेणारा महान साहित्यिक हरपला आहे, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उत्तम तुपे यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली.
अल्पशिक्षित असूनही उत्तम बंडू तुपे यांनी मराठीमध्ये विपुल लेखन केले. कादंबरी, लघुकथा, नाटक, आत्मकथन अशा अनेक माध्यमातून त्यांनी मराठी साहित्य समृद्ध केले. समाजातील दुर्बल, वंचित, उपेक्षित वर्गाच्या व्यथा-वेदना, जीवन त्यांनी प्रामाणिकपणे मांडलं. ‘काट्यावरची पोटं’ हे त्यांचं आत्मचरित्र समाजातल्या वंचित उपेक्षित घटकांचे प्रतिनिधित्व करणारं आहे. त्यात कमालीचा प्रामाणिकपणा आहे. उपेक्षित, वंचित समाजाच्या दाहक वेदना-व्यथा चित्रित आहेत. त्या चित्रणात वास्तवता, सचोटीची अनुभूती आहे. जीवनसंघर्षाचे वर्णन आहे. ‘झुलवा’ कादंबरीने त्यांना स्वतंत्र ओळख दिली. आज उत्तम तुपे यांच्या निधनाने सिध्दहस्त, संवेदनशील साहित्यिकाला आपण मुकलो आहोत.

Check Also

एक स्वप्न नव्या भारत जोडो न्याय यात्रेचे ; शिखराच्या पायथ्याशी असलेल्या युतीचे

केवळ राजकारण करून भाजपा-आरएसएसचा पराभव करू शकत नाही. त्यात राजकारण आणि विचारधारा असणे आवश्यक आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *