Breaking News

मुख्यमंत्री ठाकरेंच्या या भूमिकेचे लेखक भालचंद्र नेमाडे यांच्यासह १०४ व्यक्तींनी केले स्वागत राज्यपाल कोश्यारींना दिलेल्या प्रतित्तुरासह धर्मनिरपेक्षतेच्या बाजूने उभे राहील्याबद्दल केले अभिनंदन

मुंबई : प्रतिनिधी

राज्यातील मंदीरे उघडण्याबाबत भाजपासह वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या आंदोलनामुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यावर दबाव आणत त्यांना चक्क धार्मिक भूमिका घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांवर दबाव आणला. मात्र तरीही मुख्यमंत्री ठाकरे यांनी धार्मिक भूमिका घेण्याऐवजी धर्मनिरपेक्ष अर्थात सेक्युलेरिझमच्या बाजूने उभे राहिल्याने मुख्यमंत्र्यांच्या या भूमिकेचे प्रसिध्द लेखक तथा हिंदू-जगण्याची एक समृध्द अडगळ या पुस्तकाचे लेखक भालचंद्र नेमाडे यांच्यासह पुरोगामी विचारसरणीचे १०४ हून अधिक जणांनी स्वागत करत त्यांचे अभिनंदन केले.

यासंदर्भात या सर्व लेखक, पत्रकार मंडळींनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना पत्र लिहित उध्द ठाकरे यांचे अभिनंदन केले. तसेच राज्यपाल कोश्यारींच्या भूमिकेबाबत अप्रत्यक्ष नाराजी व्यक्त केली.

या सर्वांनी लिहिलेले पत्र त्यांच्याच भाषेत……

 

मा. मुख्यमंत्री

महाराष्ट्र शासन

प्रिय श्री. उद्धवजी ,

आज कोरोनाच्या संकटामुळे साऱ्या देशाप्रमाणेच महाराष्ट्र देखील मोठ्या कठीण परिस्थितीतून जात आहे. राज्याचा आर्थिक गाडा पूर्वपदावर आणण्यासाठी लोकांचे आर्थिक व्यवहार पुन्हा नेहमीसारखे सुरु होतील यासाठी आवश्यक असे नियमांचे शिथिलकरण करत असतानाच दुसरीकडे त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात न येऊ देणे ही तारेवरची कठीण कसरत आपल्या सरकारला करावी लागतेय. अर्थात ही दुविधा सर्वच राज्यातील सरकारांपुढे आहे. पण आपल्यासमोर यात आणखीन एक भर पडली. तो म्हणजे मंदिरे उघडण्यासाठी राज्यपालांनी आपल्यावर आणलेला दबाव आणि ‘सेक्युलारीझम ला दाखवलेला उघड विरोध.

आपल्या शासनासमोर दोन पर्याय आहेत. एकतर लोकांच्या आरोग्याचा विचार करायचा आणि दुसरा पर्याय म्हणजे लोकांच्या श्रद्धांचा विचार करायचा. सेक्युलारिझमचे तत्व असे कि शासनाचे कर्तव्य लोकांच्या ऐहिक  (सेक्युलर) हिताच्या आड त्यांच्या श्रद्धा येत असतील तर शासनाने ठामपणे सेक्युलॅरिझमच्या बाजूने उभे रहावे. पण राज्यपालांची भूमिका तुम्ही लोकांच्या श्रद्धांच्या बाजूने उभे राहावे अशी आहे.

लोकांच्या श्रद्धांचा  राजकारणासाठी असा उपयोग आम्हाला अतिशय आक्षेपार्ह वाटतो. कारण असे श्रद्धांचा उपयोग करून केलेले राजकरण यशस्वी झाले आणि देवळे उघडली गेली तर ते भाविकांच्यासाठीच धोक्याचे ठरू शकते.

हिंदू धर्मातील भागवत परंपरा ही कर्मकांड नाकारणारी, देव फक्त मंदिरात असतो हे नाकारणारी परंपरा आहे. हे पत्र लिहिणारे  आम्ही सर्व ही परंपरा मानणारे लोक आहोत. मंदिरात जाऊन देवदर्शन घेण्यात  आनंद असतो पण

‘देव देव्हाऱ्यात नाही , देव मूर्तीत ना मावे , तीर्थक्षेत्रात ना गावे , देव आपणात आहे , शीर झुकवोनिया पाहे ‘ अशी माणसाच्या श्रद्धेला व्यापक करणारी परंपरा आम्ही मानतो. ही परंपरा स्वाभाविकपणेच कर्मकांडाला नकार देणारी असल्याने लोकांच्या श्रद्धेचे होणारे सवंग राजकारण नाकारणारी आहे.

जेंव्हा प्रश्न श्रद्धांचा असतो तेंव्हा अशी ठाम भूमिका राजकीय दृष्ट्या कठीण असले तरी ती आपण ठामपणे घेतली आणि सेक्युलरिझमच्या बाजूने उभे राहिलात आणि त्याची  राज्यपालांना देखील  स्पष्ट शब्दात जाणीव  करून दिलीत याबद्दल आम्ही आपले मनःपूर्वक अभिनंदन करतो.

आपले ,

सेक्युलर मूल्य मानणार्‍या महाराष्ट्र-नागरिकांचे मुख्यमंत्र्यांना पत्र.

 

Check Also

एक स्वप्न नव्या भारत जोडो न्याय यात्रेचे ; शिखराच्या पायथ्याशी असलेल्या युतीचे

केवळ राजकारण करून भाजपा-आरएसएसचा पराभव करू शकत नाही. त्यात राजकारण आणि विचारधारा असणे आवश्यक आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *