Breaking News

अखेर आमदार परिचारक यांना विधान परिषदेत येण्यास प्रवेशबंदी शिवसेनेसह विरोधकांच्या आक्रमक पवित्र्याला यश

मुंबई: प्रतिनिधी

सैनिकांच्या पत्नींच्या संदर्भात अपशब्द काढणारे अपक्ष आमदार प्रशांत परिचारक यांचे निलंबन मागे घेण्याची कारवाई रद्द करण्याच्या मागणीवरून विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात आक्रमक पवित्रा घेणाऱ्या शिवसेनेसह काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रयत्नाला यश आले असून परिचारक यांना तूर्तास विधान परिषदेच्या सभागृहात येण्यास बंदी घालण्यात आल्याची घोषणा सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी मंगळवारी विधान परिषदेत याची घोषणा केली.

कामकाजाला सुरूवात होताच सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी शिवसेनेचे गटनेते अनिल परब यांना बोलण्याची परवानगी दिली. अनिल परब यांनी आमदार प्रशांत परिचारक यांना बडतर्फ करण्याचा प्रस्ताव सादर केला. गदारोळात परिचारक यांचे निलंबन मागे घेतले गेल्याने आमचा नैसर्गिक न्याय नाकारला गेल्याचा आरोप त्यांनी केला. परिचारक यांच्या बडतर्फीसाठी सुधारीत प्रस्ताव सादर करत असल्याचे ते म्हणाले. नियमांचा वापर करून आवाज दाबण्याचा प्रयत्न होऊ नये. परिचारक मोठे की भारतीत सैन्य याचा निर्णय आज सभागृहानं करायला हवा. बडतर्फीच्या प्रस्तावावर चर्चा होत नाही तोवर परिचारक यांना सभागृहात प्रवेश देऊ नये, अशी मागणीही परब यांनी केली. सभागृहातील सदस्य म्हणून आम्ही कायद्याचा मानसन्मान करतो. पण, परिचारक जर सभागृहात येणार असतील तर त्यांना रोखण्याचे काम शिवसेना करेल, असा इशाराही त्यांनी दिला.
सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी बडतर्फीच्या प्रस्तावावर निर्णय जाहीर केला. एखाद्या सदस्याच्या निलंबनाचा प्रस्ताव हा सत्ताधारी बाजूने मांडला जातो. विरोधकांकडून असा प्रस्ताव मांडला गेल्याचा इतिहास नसल्याचे सभापतींनी सांगितले. शिवाय, सभागृहात एखादा प्रस्ताव मतास टाकल्यानंतर वर्षभर तोच विषय किंवा त्यासंदर्भातील अन्य प्रस्ताव मांडता येत नाही. त्यामुळे अनिल परब यांनी मांडलेला पहिला प्रस्ताव नाकारत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यांच्या दुसऱ्या प्रस्तावावर लवकरच निर्णय जाहीर करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. मात्र, तोपर्यंत सभागृहातील सदस्यांची भावना लक्षात घेत आमदार प्रशांत परिचारक यांना सभागृहात येता येणार नसल्याचे सभापतींनी स्पष्ट केले.

यावर, सभापती आणि सभागृहाच्या निर्णयानुसार कारवाई करण्यात येईल असे आश्वासन संसदीय कामकाज मंत्री गिरीष बापट यांनी दिले. यावेळी झालेल्या चर्चेत भाई जगताप, हेमंत टकले आणि जयवंत जाधव यांनीही आपल्या भावना व्यक्त केल्या.

दरम्यान, विधान परिषदेतील भाजपेतर पक्षाच्या सदस्यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यावर बसून परिचारक यांना बडतर्फ करण्याच्या मागणीवर ठिय्या आंदोलन केले.

Check Also

नरेंद्र मोदी यांचा आरोप, … लूट करण्याचा कट उधळल्याने काँग्रेस हादरली

जनतेची संपत्ती हिसकावून त्यांच्या विशेष लोकांमध्ये वाटून घेण्याचा काँग्रेसचा कट उघड केल्यामुळे संपूर्ण काँग्रेसमध्ये खळबळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *