Breaking News

किरीट सोमय्यांच्या तक्रारीवरून शिवसेनेच्या या कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल पुणे येथील धक्काबुक्कीप्रकरणी केली तक्रार

मराठी ई-बातम्या टीम

शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पार्टनरने खोटी कागदपत्रे दाखवून जम्बो कोविड सेंटरचे कंत्राट मिळविल्याप्रकरणी भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या हे पुणे येथील शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवून पुणे महापालिका आयुक्तांना भेटून तक्रार दाखल करण्यासाठी पालिका इमारतीत पोहचले असता शिवसैनिकांनी त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांना निवेदन देण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी सोमय्या यांचे सुरक्षा रक्षक आणि शिवसैनिक यांच्यात झालेल्या झटापटीत सोमय्या हे इमारतीच्या पायऱ्यावर पडले. याप्रकरणी सोमय्या यांनी पुणे शिवसेनच्या शहराध्यक्षाबरोबर आठ जणांच्या विरोधात पोलिसात तक्रार दाखल केल्याची माहिती ट्विटरवरून दिली.

तसेच या आठ जणांना अटक होणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी देत मला मारहाण केल्याप्रकरणी पुणे अध्यक्ष संजय मोरे यांच्यासह ८ शिवसेना नेत्यांना पोलीस अटक करणार आहेत. FIR एफआयआर क्रमांक ००१२ आयपीसी कलम १४३, १४७, १४९, ३४१, ३३६, ३३७, ३२३, ५०४, ३७(१), १३५ आदी गुन्हे त्यांच्या विरोधात दाखल करण्यात आले आहेत. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये एफआयआरची कॉपी देखील पोस्ट केलीय. यात शिवसेनेच्या ८ स्थानिक नेत्यांच्या नावांचाही उल्लेख आहे.

एफआयआरमधील ८ शिवसेना नेत्यांची नावं खालीलप्रमाणे,

१. संजय मोरे (शिवसेना पुणे शहराध्यक्ष)
२. चंदन साळुंके (पदाधिकारी)
३. किरण साळी
४. सुरज लोखंडे
५. आकाश शिंदे
६. रुपेश पवार
७. राजेंद्र शिंदे
८. सनि गवते

किरीट सोमय्या शनिवारी (५ फेब्रुवारी) आधी शिवाजीनगर पोलीस स्टेशनमध्ये गेले. तिथे त्यांनी पुणे जम्बो कोविड सेंटरमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप करत तक्रार दाखल केली. यानंतर सोमय्या तेथून पुणे महानगरपालिकेत आयुक्तांना भेटण्यासाठी आले. त्यावेळी शिवसैनिकांनी किरीट सोमय्या यांना निवेदन स्विकारण्याची मागणी केली. मात्र, सोमय्यांनी हे निवेदन स्विकारलं नाही. यावर आक्रमक शिवसेना कार्यकर्त्यांनी धक्काबुक्की केल्याचे सांगण्यात येत आहे.

किरीट सोमय्या यांच्या तक्रारीनंतर पोलिसांकडून शिवसैनिकांना अटक केली जाते की त्यांना चौकशीला बोलावून सोडून दिले जाते याचे उत्तर आगामी काळातच मिळेल. परंतु या निमित्ताने किरीट सोमय्या यांना शिवसेनेच्या विरोधात आयताच मुद्दा मिळाल्याचे दिसून येत आहे.

 

Check Also

मुख्य निवडणूक अधिकाऱ्याची स्पष्टोक्ती, राज्यातील मतदानाच्या टक्केवारीत वाढ नाही

लोकसभा निवडणूकीसाठी २६ तारखेला दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पाडल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने पहिल्या आणि दुसऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *