Breaking News

सत्ता स्थापनेच्या चर्चेमागे महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याचा घाट वबआचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांचा आरोप

मुंबईः प्रतिनिधी
विधानसभा निवडणूकीचे निकाल जाहीर झाल्यापासून राज्यात सत्ता स्थापनेसाठी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये चर्चेच्या फेरीचे नाट्य घडवून आणले जात आहे. मात्र या चर्चेच्या मागे महाराष्ट्राचे तीन तुकडे करण्याचा घाट घालण्यात येत असल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख अॅड.प्रकाश आंबेडकर यांनी केला.
गेल्या महिनाभराच्या कालावधीत महाराष्ट्रातील जनता सरकार स्थापनेच नाट्य उघड्या डोळ्यांनी बघत आहे. या नाट्यामागच राजकीय षड्यंत्र मात्र अनेकांच्या लक्षात येत नाही, किंबहुना ते लक्षात येवू नये म्हणून रोज घडीला प्रादेशीक राजकीय तसेच भावनात्मक चर्चा विवाद सर्वत्र चालविला जात आहे. जेणे करून जनतेच महत्वाच्या मुद्यांवर जावूच नये असा दावाही त्यांनी केला.
जम्मू आणि काश्मीरचे ज्याप्रमाणे तीन राज्यात विभाजन करण्यात आले. अगदी त्याच धर्तीवर महाराष्ट्राचेही तीन राज्यात विभाजन करण्याचा घाट घालण्यात येत असल्याचा आरोपही त्यांनी केला.
तसेच राज्याची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला केंद्रशासित प्रदेश करून उरलेल्या महाराष्ट्रातून विदर्भ वेगळा करण्याचा ठाव असून या गोष्टीकडे दुर्लक्ष करता येणार नाही. जम्मू आणि काश्मीरच्या विभाजनासाठी घटनेच्या अनुच्छेद 370 कलमाचा वापर करायचा होता. त्यामुळे जम्मू काश्मीरमधील विधानसभेतील युती तोडून डळमळीत केली व जम्मू काश्मीर मध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला.
घटनेच्या अनुच्छेद 370 प्रमाणे राज्यांचे विभाजन करण्या करता राज्यातील जनमताचा कौल आवश्यक असतो असा कौल पक्षीय विधानसभा अस्तित्वात असण्यापेक्षा राष्ट्रपती राजवटीत राज्यपालांच्या माध्यमातून घडवून आणणे सोपे असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले.
ज्याअर्थी ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली, त्यावरून उपरोक्त विभाजनाचा संशय येण्यास प्रबळ कारण उपलब्ध आहे. त्याशिवाय खालील काही मुद्दे गतकालीन इतिहास बघता कुठल्याही सुज्ञ नागरिकास नाकारता येणार नसल्याचा दावाही त्यांनी केला. यावेळी त्यांनी काही मुद्यांकडे लक्ष वेधले. ते मुद्दे खालीलप्रमाणे
अ-मुंबईला भारताची आर्थिक राजधानी म्हणून काही बलाढ्य पुंजीपती व भांडवलदार यांच्या ताब्यात द्यावयाची आहे.
आ-बृहन्मुंबई महानगरपालिकेला शिवसेनेच्या कब्ज्यातून सोडवून घेतल्याशिवाय मुंबई केंद्रशासीत करणे सोप्पे होणार नाही.
इ-ज्याप्रमाणे भारतातल्या आंध्रप्रदेश, युपी व बिहार इत्यादी राज्यांमधले स्थानिक पक्ष संपविण्याचे प्रयत्न झाले, त्याचप्रमाणे महाराष्ट्रातून शिवसेनेला अश्या रीतीने नामशेष करण्यात येईल कि शिवसैनिकाला कुठलाही राजकीय पक्ष थारा देणार नाही.
ई-राष्ट्रवादी व कॉंग्रेस पक्ष या अघोरी खेळामध्ये आपआपला अथवा परस्पर हिताचा कार्यभाग साधून घेतील.
आज महाराष्ट्रातल्या जनतेला यावर विचार करण्याची गरज आहे. कारण एकाहून एक गंभीर प्रश्न जनतेला भेडसावत असताना राजकीय नाट्य मात्र चरमसीमेवर आहे तेंव्हा अश्या प्रकारच्या पडद्या मागील राजकीय षड्यंत्राचा विचार जनतेने करावा असे आवाहनही त्यांनी केले.

Check Also

शरद पवार यांचा इशारा, सत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना सरळ करायला एक ते दोन…

लोकसभा निवडणूकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान आता काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. यापार्श्वभूमीवर विविध राजकिय पक्षांच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *