Breaking News

बनावट शैक्षणिक प्रमाणपत्रे रोखण्यासाठी कौशल्य विकास मंडळाचा पुढाकार कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांची माहिती

मुंबई : प्रतिनिधी

बनावट शैक्षणिक प्रमाणपत्रे रोखण्यासाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळाने पुढाकार घेतला असून यासाठी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाच्या आधारे मंडळाकडील एकूण ८ शैक्षणिक वर्षातील सुमारे १० लाख डिजिटल डिप्लोमा प्रमाणपत्रे जारी करण्यात येत आहेत. यामुळे बनावट शैक्षणिक प्रमाणपत्रांना पायबंद घातला जाणार असून उद्योगांना उमेदवारांच्या प्रमाणपत्रांची सत्यता पडताळणी करणे सुलभ होणार आहे. शिवाय यामुळे योग्य उमेदवारांचीही होणारी गैरसोय रोखली जाणार आहे, अशी माहिती कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री नवाब मलिक यांनी दिली.

यासाठी क्रॉसफोर्स सोल्यूशन्स प्रायव्हेट लिमिटेडद्वारा विकसित लेजीटडॉक हे इथरियम ब्लॉकचेन तंत्रज्ञान वापरण्यात येणार असून या प्रणालीच्या मदतीने  बनावटरहीत डिजिटल कागदपत्रे १० सेकंदात जगभरातून कोठूनही ऑनलाईन पडताळणी करता येऊ शकतील. महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीमार्फत घेण्यात आलेल्या स्टार्टअप मेळाव्यातून ही संकल्पना पुढे आली असून महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळामार्फत याची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या तंत्रज्ञानाच्या वापरामुळे प्रमाणपत्रांच्या हाताळणीकामी वापरले जाणारे मंडळाचे मनुष्यबळ आणि त्यांच्या वेळेचीही बचत होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या उपक्रमाची नुकतीच जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात सुरुवात करण्यात आली. यावेळी कौशल्य विकास विभागाच्या प्रधान सचिव मनिषा वर्मा, कौशल्य विकास आयुक्त दीपेंद्रसिंह कुशवाह, कौशल्य विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. अनिल जाधव, मंडळाचे सचिव कृष्णा शिंदे, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालक दिगंबर दळवी, सहसंचालक योगेश पाटील, लेजीटडॉक स्टार्टअपचे सहसंस्थापक फ्रान्सिस, श्री. नील, विष्णू आदी मान्यवर उपस्थित होते.

बनावटमुक्त शैक्षणिक प्रमाणपत्रांसाठी जगातील सर्वात मोठी ब्लॉकचेन तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य झाले आहे. यामुळे सुमारे १० लाख टँपरप्रूफ, डिजिटल डिप्लोमा प्रमाणपत्रे ऑनलाईन पडताळणीसाठी त्वरित उपलब्ध करून देण्यात येत आहेत. ब्लॉकचेन तंत्रज्ञानावर आधारित शैक्षणिक दस्तऐवज नोंदणीची आतापर्यंत माल्टा, सिंगापूर आणि बहरैन या तीनच देशामध्ये पूर्ण अंमलबजावणी झाली आहे. त्यांच्यात सामील होऊन महाराष्ट्र शासनाचे कौशल्य विकास मंडळ हे जगातील सर्वात मोठे चौथे सरकारी संस्था बनले आहे. शैक्षणिक प्रमाणपत्रांकरिता ब्लॉकचेन तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले असल्याचे त्यांनी सांगितले.

शाळा अर्धवट सोडलेल्या विद्यार्थ्यांसाठी मंडळाचे अभ्यासक्रम वरदान

अर्धवट शिक्षण सोडलेल्या विद्यार्थ्यांसाठी तसेच विशिष्ट शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र राज्य कौशल्य विकास मंडळामार्फत कमी कालावधीचे व्यवसाय अभ्यासक्रम (ॲड ऑन कोर्सेस) चालविण्यात येतात. सध्या मंडळांतर्गत विविध २८ गटातील शैक्षणिक अर्हतेनुसार, तसेच सहा महिने कालावधीचे १५६, एक वर्ष कालावधीचे १०० आणि दोन वर्ष कालावधीचे ४५ अर्धवेळ (२३४) व पूर्णवेळ (६७) असे एकुण ३०१ अभ्यासक्रम राबविण्यात येतात. हे अभ्यासक्रम जिल्हा, तालुकास्तरावर तसेच ग्रामीण भागात मंडळाने मान्यता दिलेल्या १ हजार २६९ संस्थांमध्ये राबविण्यात येत आहेत. विशेषत: खेड्यापाड्यातील, गोरगरीब विद्यार्थी मंडळाच्या मान्यताप्राप्त संस्थांमध्ये प्रवेश घेऊन प्रशिक्षण पूर्ण करतात. मंडळाचे अभ्यासक्रम हे रोजगार व स्वयंरोजगारास चालना देण्याच्या दृष्टीने विशेष करुन शाळा अर्धवट सोडलेल्या विद्यार्थ्यांसाठी वरदान ठरतात, असे त्यांनी सांगितले.

Check Also

मनोज जरांगे पाटील, पंकजा मुंडे एकाच व्यासपीठावर !

आज श्री क्षेत्र नारायण गडाच्या नारळी सप्ताहाच्या निमित्ताने मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील आणि बीड …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *