Breaking News

अमित शाहनी ४८ जागा जिंकण्याचा निर्धार व्यक्त करत, उध्दव ठाकरेंचा पक्ष शरद पवारांच्या चरणी बहुमताने महाराष्ट्रात भाजपा-शिवसेनेचे सरकार निवडूण द्या

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह महाराष्ट्र दौऱ्यावर आले आहेत. कोल्हापूर येथे एका कार्यक्रमाला संबोधित करताना शाह यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर हल्लाबोल केला. २०१९ मध्ये महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली होती, पण उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरेंची पार्टी शरद पवारांच्या चरणात नेऊन ठेवली, अशी टीका अमित शाह यांनी केली.

उपस्थित कार्यकर्त्यांना संबोधित करताना अमित शाह म्हणाले, मागील ९ वर्षांपासून आम्ही सरकार चालवत आहोत. पण १२ लाख कोटींचा घोटाळा करणारी काँग्रेस पार्टी आणि शरद पवार यांच्यासह त्यांचे सहकारी आमच्यावर एक पैशाचाही आरोप करू शकले नाहीत. आम्ही प्रामाणिकपणे काम केलं. मोदींवर भ्रष्टाचाराचा आरोप लावण्याची कुणाचीही हिंमत नाही.

यावेळी बोलताना अमित शाह म्हणाले, २०१९ मध्ये आपण देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढलो होतो. निवडणुकीच्या प्रचारात नरेंद्र मोदींचा मोठा फोटो लावला होता. तर उद्धव ठाकरे यांचा लहान फोटो लावला होता. देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली निवडणूक लढत आहोत, असं तेही अनेकदा बोलले होते. मी आणि मोदींनीही अनेक ठिकाणी हेच बोललो होतो. पण निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर त्यांच्या (उद्धव ठाकरे) तोंडाला पाणी सुटलं. त्यांनी आपल्या सर्व सिद्धांतांना मूठमाती देऊन ते शरद पवारांच्या चरणाजवळ जाऊन बसले, अशी टीका केली.

मागील लोकसभा निवडणुकीत आपण ४८ पैकी ४२ जागा जिंकलो होतो. आपल्याला बहुमत मिळालं होतं. पण यावर आपली संतुष्टी झाली नाही पाहिजे. यावेळी आपल्याला बहुमत नको आहे. संपूर्ण विजय हवा आहे. ४८ पैकी ४८ जागा भारतीय जनता पक्षाला मिळायला हव्यात, असा निर्धारही अमित शाह यांनी व्यक्त केला.

यावेळी बोलताना अमित शाह यांनी राज्यातील महाविकास आघाडीवर टीका करताना म्हणाले, भाजपाच्या विरोधात लढण्यासाठी राज्यातील राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, प्रकाश आंबेडकर आणि उध्दव ठाकरे एकत्र येत आहेत. मात्र ते भाजपाला पराभूत करू शकणार नाहीत. त्यांनी विकासकामाला महत्व दिले नाही. उलट लोकांना धर्माच्या नावावर एकमेकांपासून तोडण्याचे काम करत असल्याचा आरोप केला.

याशिवाय नरेंद्र मोदी यांच्या दिव्य नेतृत्वाखाली भारत विकासाच्या दिशेने मार्गक्रमण करत असल्याचे सांगत मोदींच्या नेतृत्वाखाली देशात काशी विश्ववेश्वराचे मंदीर पुन्हा एकदा उभे केले, केदारनाथ मंदीराचे नवनिर्माण केले. याशिवाय काश्मीरच्या विशेष दर्जा देणारे ३७० कलम हटवित देशाचा अविभाज्य भाग बनविला. त्यामुळे काश्मीरमध्ये भारतीयांचा रक्तपाताच्या घटनेत कमी आल्याचा दावाही अमित शाह यांनी केला.

Check Also

नाना पटोले यांची टीका, पंतप्रधान मोदींकडून कोल्हापूरच्या सभेतही धार्मिक विष…

अयोध्येतील राम मंदिराच्या उद्घाटनाचे निमंत्रण काँग्रेसने ठोकरले हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आरोप अत्यंत हास्यास्पद व …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *