Breaking News

उध्दव ठाकरे यांची मुख्यमंत्री शिंदेवर टीका, दिलेलं स्क्रिप्ट फक्त बोलतात.. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांप्रमाणे आक्रमक उत्तर द्यावं

गेल्या अनेक दिवसांपासून प्रलंबित असणाऱ्या समृद्धी महामार्गाच्या पहिल्या टप्प्याचं उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात आलं. यावेळी पंतप्रधानांसमवेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते. दरम्यान, मुख्यमंत्र्यांच्या भाषणावर बोलताना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी खोचक शब्दांत हल्लाबोल केला.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी यावेळी बोलताना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि आपण नगरविकास मंत्री असताना समृद्धी महामार्गाचं काम सुरू झाल्याचं सांगितलं. देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री असताना माझ्यावर विश्वास दाखवला आणि त्यांच्या संकल्पनेतून मी काम केलं. आता मी मुख्यमंत्री असताना आणि आम्ही दोघं एकत्र असताना पंतप्रधानांच्या हस्ते याचं लोकार्पण होतंय. मी आणि देवेंद्र फडणवीसांनी त्यावर कुशलपूर्वक सगळ्यांना सोबत घेऊन काम केलं.

आंबेडकर चळवळीमधील काही कार्यकर्त्यांनी आज मातोश्रीवर शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी पत्रकारांशी बोलताना उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंच्या भाषणावर त्यांचं नाव न घेता अप्रत्यक्ष टोला लगावला. यावेळी बोलताना उध्दव ठाकरे म्हणाले, काही जणांना वाटतंय की शिवसेना आता संपली आणि त्या संपलेल्या काळात तुम्ही आला आहेत. पण ज्यांना असं वाटतंय की आम्ही म्हणजेच शिवसेना होतो आणि आम्ही शिवसेना संपवली ते लोक संपलेत. फक्त ते जगजाहीर होणं बाकी आहे. मी म्हणजेच शिवसेना, मीच काहीतरी केलंय. अमुक काम मीच केलंय असं सांगतात. मी नसतो तर ते झालंच नसतं वगैरे असं काही नसतं. कुणा एका व्यक्तीवर जग चालत नसतं, असे म्हणाले.

मोदींनी आज विकासकामांचं लोकार्पण केलं. त्यात काहीजण म्हणाले की ‘हे मीच केलंय’. अरे नाही बाबा. सरकार येत-जात असतं. आजपर्यंत महाराष्ट्रात किती मुख्यंमत्री होते, यापुढेही किती होणार आहेत. पण याचा अर्थ असा नाही की ते होते तेव्हाच काम झालं, याच्याआधी झालं नाही आणि यापुढेही होणार नाही. त्यामुळे कुणी हा समज करून घेऊ नये की ते म्हणजेच सर्वकाही. असं नाहीये. तो समज काहीजणांचा झाला आहे, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंचं नाव न घेता त्यांना टोला लगावला.

निर्भया पथकातील वाहने शिंदे गटातील आमदारांच्या सुरक्षेसाठी वापरली जाणं हा अत्यंत नीच प्रकार आहे. निर्भया पथक कशासाठी नेमली गेली हे सर्वांना माहिती आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी तत्काळ मदत मिळावी, सहकार्य मिळावे, त्यांच्यावर होणारे अत्याचार रोखले जावे, त्यासाठी ही पथकं तयार करण्यात आली होती. आज त्या पथकातल्या गाड्या आमदारांच्या सुरक्षेसाठी वापरण्यात येत असेल, तर त्यांची वृत्ती काय आहे, हे आता लोकांना कळले पाहिजे, अशी टीकाही त्यांनी शिंदे सरकारवर केली.

यावेळी बोलताना त्यांनी सीमावादाच्या मुद्द्यावरूनही राज सरकारला लक्ष्य केले. एका बाजुला महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न पेटला आहे. महाराष्ट्राच्या बाजुने कुणीच बोलत नाही. कर्नाटकचे मुख्यमंत्री अतिशय मस्तीत किंवा माज आल्यासारखं बोलत आहेत. काल त्यांनी कहर केला. आपले मुख्यमंत्री मात्र त्यांना स्क्रीप्ट लिहून दिले, तेवढंच बोलत आहेत. हा विषय सर्वोच्च न्यायालयात आहे, असंच ते म्हणत आहेत. पण महाराष्ट्र जसा सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची वाट पाहत आहे, तसंच कर्नाटकनेही सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची वाट बघायला काय हरकत आहे, असेही ते म्हणाले.

Check Also

सुनिता केजरीवाल यांना अरविंद केजरीवाल यांची भेट घेण्यास मुभा

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता यांना तिहार तुरुंग प्रशासनाने त्यांना भेटण्याची परवानगी दिली …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *