Breaking News

लेकी, आया-बहिणी असुरक्षित अन् निर्भया पथके फुटीर आमदारांच्या दिमतीला? सरकारचे डोके ठिकाणावर आहे काय? - प्रा. डॉ. मनीषा कायंदे

उद्धव ठाकरे सरकारने राज्यातील लेकी, आया-बहिणी यांच्या सुरक्षिततेसाठी नेमलेली निर्भया पथके सध्या गायब आहेत. महिला सुरक्षा वाऱ्यावर असून शिंदे गटाच्या फुटीर आमदारांच्या दिमतीला ही निर्भया पथके तैनात करण्यात आली आहेत. लेकी, आया-बहिणी यांची सुरक्षा काढून घेऊन ती आमदारांवर पाळत ठेवण्यासाठी वापरणाऱ्या शिंदे सरकारचा निषेध असो. या सरकारचे डोके ठिकाणावर आहे का? असा जळजळीत सवाल शिवसेना प्रवक्त्या प्रा. डॉ. मनीषा कायंदे यांनी प्रसिध्दी पत्रकातून केला आहे.

जनता सोबत असल्याचे, आमदार सोबत असल्याचे दावे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे करतात. मग आमदारांना जनतेपासून भीती वाटते म्हणून सुरक्षा हवी का? की, तुम्हाला आमदार पळून जातील, याची भीती वाटते म्हणून पाळत ठेवताय, असा टोलाही प्रा. डॉ. मनीषा कायंदे यांनी लगावला आहे.  प्रत्येक फुटीर आमदार आणि खासदारांच्या दिमतीला पाच पोलिसांची वाय प्लस दर्जाची सुरक्षा तैनात करण्यात आली आहे. आपल्या माता-भगिनींनी सुरक्षा काढून घेऊन ते स्वतः वापरत आहेत.  हे मावळे इतके घाबरट, भित्रे आहेत का? असा सवालही त्यांनी केला.

केंद्रातील तत्कालीन यूपीए सरकारने महिलांच्या सुरक्षिततेसाठी आणि महिला अत्याचाराचे गुन्हे रोखण्यासाठी निर्भया निधी तयार केला होता. उद्धव ठाकरे सरकारने राज्यात महिलांच्या दिमतीला निर्भया पथके देऊन त्यांचे जीवनमान सुरक्षित करण्याचा प्रयत्न केला. मात्र, शिंदे सरकारने फुटीर आमदारांच्या संरक्षणासाठी आणि त्यांच्यावर पाळत ठेवण्यासाठी निर्भया वाहनांचा वापर सुरू केला आहे. तुमच्यासारखेच आता तुमच्या गटात आलेले आमदार गुवाहाटी किंवा इतरत्र पळून जायची भीती वाटत आहे का, असा सवाल प्रा. डॉ. मनीषा कायंदे यांनी केला आहे.

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर विरारनजीक परवा एका १९ वर्षीय मातेच्या दहा वर्षांच्या बाळाचा बळी गेला. त्याला शिंदे सरकार जबाबदार असल्याचा आरोप प्रा. डॉ. मनीषा कायंदे यांनी केला आहे. टॅक्सीमध्ये छेडछाड रोखण्यासाठी या मातेने बाळासह धावत्या टॅक्सीतून बाहेर उडी घेतली. त्यात दुर्दैवाने बाळाचा मृत्यू झाला व महिला गंभीर जखमी झाली. पब्लिक टॅक्सीमधील संकटकाळी मदतीचे पॅनिक बटन कुठे आहे? पोलिस कंट्रोल कक्षाला केलेले कॉल उचलायला कुणी नाही. आज जर निर्भया पथक महिला सुरक्षेत तैनात असते, तर या मातेच्या बालकाचा जीव वाचू शकला असता, असेही त्यांनी म्हटले आहे.

फुटीर आमदारांच्या सुरक्षेपेक्षा शिंदे सरकारला राज्यातील माता-भगिनींची, जनतेची सुरक्षा जास्त महत्वाची वाटत नाही का? असेल तर, आमदारांची सुरक्षा व त्यांच्यावर पाळत ठेवण्यासाठी वापरली जात असलेली निर्भया वाहने तात्काळ पोलीस स्टेशनला जमा करावीत, अशी मागणीही प्रा. डॉ. मनीषा कायंदे यांनी केली.

Check Also

पंतप्रधान मोदींच्या मुंबईतील दौऱ्यात महिला काँग्रेस काळे झेंडे दाखवणार

भाजपाचा मित्र पक्ष जेडीएसचा लोकसभा उमेदवार प्रज्वल रेवन्ना याने शेकडो महिलांना ब्लॅकमेल करून त्यांच्यावर लैंगिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *