Breaking News

छगन भुजबळ म्हणाले, शाई फेकल्याने कोणं मरतं का? शाई फेकणाऱ्यावर ३०७ चा गुन्हा महापुरुषांची बदनामी महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही

नुकतेच राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरु करण्यासाठी लोकांकडे भीका मागितल्याचे वक्तव्य केले. त्या वक्तव्याच्या निषेधार्थ एका कार्यकर्त्याने चंद्रकांत पाटील यांच्यावर शाईफेक केली. तर त्या कार्यकर्त्यावर ३०७ खाली गुन्हा नोंदविण्यात आला. शाई फेकल्याने कोणी मरतं का? असा खोचक सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांनी करत ३०७ म्हणजे खुनाचा प्रयत्न असा गुन्हा असल्याचेही त्यांनी सांगितले.

महापुरुषांची बदनामी महाराष्ट्र कधीही सहन करणार नाही. महापुरुषांची बदनामी करणाऱ्यांच्या विरोधात जो जो उभा राहील तो आपला आहे आणि त्यांच्या पाठीमागे उभे रहा असे आवाहनही त्यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पिंपरी चिंचवड आयोजित एक दिवसीय शिबिराला त्यांनी उपस्थिती लावली यावेळी ते बोलत होते.

उपस्थितांना मार्गदर्शन करताना छगन भुजबळ म्हणाले की या फुले शाहु आंबेडकरांच्या राज्यात वारंवार महापुरुषांचा अपमान होत आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा अपमान करून वारंवार महाराष्ट्राला अपमानित करण्याचे काम यांचे चालू आहे. राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांनी भीक मागितली असे विधान केले मात्र त्यांना ठाऊक नसेल १८६९ साली टाटा उद्योग समूहाचा वार्षिक उलाढालीचा आकडा हा २० हजार होता. तर पूना कमर्शियल इन कॉन्ट्रॅक्टींग या कंपनीचा वार्षिक उलाढालीचा आकडा होता २१ हजार रुपये आणि या कंपनीचे सर्वेसर्वा होते महात्मा ज्योतिबा फुले.महात्मा फुले स्वत: उद्योगपती होते मोठमोठी कामे ते करत असत. आणि त्यातून मिळालेल्या पैश्याने त्यांनी समाज सुधारणेचे काम केले. लोकमान्य टिळकांना एका खटल्यातून सोडवण्यासाठी रूपये १०,००० इतकी रक्कम महात्मा फुले यांनी दिली होती याची माहितीही त्यांनी दिली.

कर्मवीर भाऊराव पाटील म्हणायचे माझ्या दाढीत जेवढे केस आहेत तेवढी बहुजनांची पोर शिकविल आणि या सनातन्यांच्या छाताडावर थयाथया नाचविल कर्मवीरांनी तर शिक्षणाच्या कामासाठी स्वताच्या पत्नीचे दागिने विकले पण मुलांना शिकवीले असेही त्यांनी सांगितले.

राज्यातील प्रकल्प राज्याबाहेर जायला लागले आहेत. मागील सहा महिन्यांपासून राज्याच नकारात्मक वातावरण. .सुरुवातीच्या काळात दहीहंड्या फोडण्यात मग्न झालेल्या या सरकारने आता नवस फेडण्यासाठी दौरे सुरू केले आहे, अशा राज्यात कोणते उद्योगपती थांबतील?

केंद्र सरकारने सुरू केलेले, मेक इन इंडिया आणि मेड इन इंडिया हे सगळे प्रकल्प अयशस्वी ठरले त्यांनी आपला गाशा गुंडाळला आहे.महाराष्ट्रातून लाखो कोटी रुपयाचे प्रकल्प घेऊन महाराष्ट्राला काहीही दिले जात नाही अशी खंत माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केली.

बेळगाव – महाराष्ट्र  प्रश्नांवर हे सरकार गप्प राहते तिकडचे मुख्यमंत्री दम देतात आणि महाराष्ट्र सरकारचे मंत्री गप बसतात. पवार साहेब आणि मी बेळगाव साठी लाठ्या काठ्या खाल्या आहेत. हा महाराष्ट्र आहे हे दाखवून द्यायला हवे असे मत देखील त्यांनी यावेळी व्यक्त केले.

यावेळी बोलताना ते म्हणाले की उद्या शरदचंद्रजी पवार यांचा वाढदिवस आहे. त्यांची इच्छाशक्ती आणि कार्यकर्त्यांवरील प्रेम आपण सर्वांनी शिर्डीच्या शिबीरात पाहिले आहे. आजारी असताना देखील शिबीराला उपस्थिती लावली होती.

आगामी काळातील निवडणुकांच्या दृष्टीने आपल्याला तयार रहावं लागणार आहे.राज्यातील महापालिका किंवा जिल्हापरिषदांच्या निवडणुका कधीही घोषित होतील… पवार साहेबांना वाढदिवसाचे काही भेट द्यायची असेल तर निवडणुकींच्या माध्यमातुन त्यांना बळ द्या असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *