Breaking News

बाळासाहेब थोरात यांचा सवाल, हायवे समस्यांवर काही ठोस धोरण आहे का ? खराब महामार्गामुळे नाशिक-मुंबईसाठी ३ तासाऐवजी ६ तास लागतात

महामार्गावर होत असलेल्या अपघातांचे प्रकार गंभीर असून हायवेवर वाहन चालवताना शिस्त दिसत नाही तर काही महामार्गांची अवस्था अत्यंत खराब आहे. नाशिकहून मुंबईचा प्रवास हा फक्त ३ तासांचा आहे परंतु खराब महामार्गामुळे त्यास ६ तास लागतात. यातून अपघाताचे प्रसंग उद्धवतात हे लक्षात घेता राज्य सरकारचे महामार्गाच्या संदर्भात काही ठोस धोरण आहे का ? किंवा त्यासंदर्भात काही निर्णय घेणार आहे का? असा प्रश्न काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केला.

विधानसभेत आमदार विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूवरील चर्चेत भाग घेत थोरात यांनी खराब महामार्ग व त्यावरून करावा लागणारा जीवघेणा प्रवास याबद्दल प्रश्न उपस्थित केला. मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर बेशिस्त वाहतूक पहावयास मिळते, लेनसी शिस्त पाळली जात नाही. आपण सुरक्षित वाहन चालवत असलो तरी समोरचा त्याच पद्धतीने शिस्तबद्ध वाहन चालवत असेलच असे नाही. त्यामुळे अपघातांचा धोका वाढतो. यावर सरकारकडे काही ठोस धोरण असले पाहिजे. जनजागृती, प्रशिक्षण याबरोबरच रस्ते व्यवस्थेत असले पाहिजेत हेही तितकेच महत्वाचे आहे. महामार्गावरील खड्डे बुजवले पाहिजेत. नाशिक-मुंबई महामार्गाचे उदाहरण पाहता या रस्त्यांवरून वाहन चालवताना टायर फुटतात, अत्यंत निकृष्ट रस्ता आहे. त्यामुळे ३ तासांच्या प्रवासाला ६ तास लागतात. प्रवासही जीव मुठीत घेऊन करावा लागतो. या महामार्गावरचे टोल वसुल केले जातात पण रस्त्यांच्या दर्जाबद्दल, त्याच्या देखभालीकडे दुर्लक्ष केले जाते. राज्य सरकारने या प्रश्नात लक्ष घालावे व एक निश्चित धोरण आहे का ते सांगावे असे ते म्हणाले.

मुंबई गोवा महामार्गाच्या अवस्थेबद्दलही अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. महामार्गाच्या खराब स्थितीवर अनेक भागात प्रश्न आहेत त्याकडे गांभिर्याने पाहिले पाहिजे, असेही थोरात म्हणाले. या चर्चेला उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की वाहनचालकांमध्ये  जनजागृती आणि प्रशिक्षणासाठी ठोस पावले उचलण्याबाबत संबंधित विभागाला निर्देश दिले आहेत. तसेच नाशिक मुंबई प्रवासासाठी जो वेळ लागतो आहे ही बाब खरी असून त्यावर तातडीने आवश्यक त्या उपाययोजना केल्या जातील.

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *