Breaking News

उध्दव ठाकरे यांचे पंतप्रधान मोदींना आव्हान, …मग खुशाल तुम्ही महामार्गाचे उद्घाटन करा पालकासारखे बोला नाहीतर पालकाची भाजी समजून बोलू नका

महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्नी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी घेतलेल्या भूमिकेनंतर मोठा वाद निर्माण झाला आहे. कर्नाटकच्या या अरेरावीवर पंतप्रधानांनी भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी यावेळी केली. पंतप्रधानांनी उद्याच्या कार्यक्रमात जरूर बोलावं. पण त्यांनी कर्नाटकव्याप्त महाराष्ट्र, कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची अरेरावी यावर बोललंच पाहिजे. आख्खा महाराष्ट्र तुमच्या कर्नाटकविषयीच्या भूमिकेची वाट बघतोय, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सांगत कर्नाटकने महाराष्ट्राचे रस्ते बंद केले असतील तर त्यावर तुम्ही बोललंच पाहिजे मग खुशाल बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गाचे उद्घाटन करा असे आव्हान दिले.

घनसांगवी येथे आयोजित मराठवाडा साहित्य संमेलनात उध्दव ठाकरे हे बोलत होते. त्यावेळी समृध्दी महामार्गाच्या उद्घाटनाला पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येणार आहेत. या निमित्ताने सध्या सुरु असलेल्या कर्नाटक-महाराष्ट्रा दरम्यानच्या सीमावादावर बोलताना त्यांनी पंतप्रधान मोदींना आव्हान दिले.

उद्या मोदी येतायत समृद्धी महामार्गाचं उद्घाटन करायला. उद्या ते राज्यपालांच्या सगळ्या वक्तव्यांवर पांघरूण घालायचा प्रयत्न करतील की छत्रपती शिवाजी महाराज कसे होते वगैरे. बाळासाहेब कसे होते वगैरे बोलून आम्हाला टोमणे मारतील. कारण त्या महामार्गाचं नाव हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आहे. त्यावर कदाचित ते बोलतील. माझी त्यांना विनंती आहे. बोला, तुमचा अधिकार आहे. पंतप्रधान म्हणून तुम्ही देशाचे पालक आहात. पालकासारखं बोला. पण महाराष्ट्र म्हणजे पालकाची भाजी आहे असं बोलू नका. कुणीही यावं आणि आमची भाजी करावी एवढे आम्ही काही मिंधे नाही आहोत. जे होते, ते मिंधे तिकडे गेले, असं म्हणत उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावरही खोचक टीका केली.

समृद्धी महामार्ग झालाच पाहिजे. पण एका मोठ्या रस्त्याचं उद्घाटन करत असताना महाराष्ट्र आणि कर्नाटकचा रस्ता कर्नाटक जर महाराष्ट्रासाठी बंद करत असेल, तर पंतप्रधान म्हणून तुम्ही त्यांना काय बोलणार आहात? आणि महाराष्ट्राला काय दिलासा देणार आहात? हे आधी बोला आणि मग शिवसेनाप्रमुखांचं नाव असलेल्या महामार्गाचं उद्घाटन करा. कारण स्वत: शिवसेनाप्रमुख सीमाप्रश्नासाठी तीन महिने तुरुंगात राहिले होते. शिवसेनेची भूमिका बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे ही आहे. आज बाळासाहेबांची शिवसेना म्हणवणाऱ्या लोकांची भूमिका काय आहे हेही स्पष्ट झालं पाहिजे असे आव्हानही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शिंदे गटाला केले.

शाळेत धडा होता देश म्हणजे माणसं ते दगड धोंडे नाहीत. ती भारतमाता. जर राज्यकर्ते चुकत असतील तर साहित्यिकांनी चूक दाखवून द्यायला हवी. राजा चुकला तर जनतेचे नुकसान होईल. हिटलरच्या वेळी पण प्रचंड विरोध झाले, छळ झाले. खरी परिस्थिती सांगितली की पुन्हा तुरूंगात जावे लागायचे. राजकारण हे वाईट नाही तरुण तरुणींनी राजकारणात या उज्जवल भवितव्यासाठी या असे आवाहनही त्यांनी केले.

सत्ता का हवी तर मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी हवी. निवडून देण्याचा जसा अधिकार आहे तसा परत बोलावण्याचा पण हवा?  खरच देशात लोकशाही आहे का?  सावरकर म्हणाले होते बंदूका हाती घ्या. मी म्हणेन लेखणी हाती घ्या. सरकार न्याययंत्रणेला आपल्या बुडाखाली घ्यायला बघताहेत. कायदामंत्री, उपराष्ट्रपती त्यावर बोलताहेत. पण आम्ही बोललो तर अवमानना, न्यायमूर्ती पण पंतप्रधान नेमणार असतील तर काय फायदा असा सवालही त्यांनी यावेळी केला.

Check Also

ऑपरेशन सूरत-२ इंदौरमध्येही भाजपाकडून असाच प्रयोग

लोकसभा निवडणूका जाहिर होताच भाजपाने ४०० पारचा नारा दिला. मात्र लोकसभा निवडणूकीच्या पहिल्या दोन टप्प्यात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *