Breaking News

नागपूरमध्ये रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे भाजपातर्फे भव्य स्वागत नागरिकांनीही सहभागी होण्याचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे आवाहन

विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रासह संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासाला चालना देणाऱ्या हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी रविवार ११ डिसेंबर रोजी नागपूर शहरात येत असून भारतीय जनता पार्टीतर्फे त्यांचे उत्साहाने भव्य स्वागत करण्यात येईल. नागरिकांनीही मोदीचे स्वागत करावे, असे आवाहन भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी नागपूर येथे पत्रकार परिषदेत केले.

ते म्हणाले की, मोदीच्या हस्ते नागपूर शहरातील विविध विकासकामांची उद्घाटने होणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारमुळे नागपूर शहराला विकासकामांचा मोठा लाभ झाला आहे. नागपूर शहरात त्यांच्या स्वागतासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, आपण स्वतः तसेच भाजपाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते उत्सुक आहोत. जनतेनेही मोदीचे उत्स्फूर्त स्वागत करावे.

ते म्हणाले की, समृद्धी महामार्गाच्या उद्घाटनाचा प्रत्यक्ष कार्यक्रम नागपूर येथे होईल. याखेरीज नागपूर ते शिर्डी मार्गावर आठ ठिकाणी मोठ्या स्क्रीनवर हा कार्यक्रम स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने एकत्र येऊन पाहतील. त्या त्या ठिकाणी भाजपाचे मंत्री, खासदार आणि आमदार उपस्थित राहणार आहेत.

त्यांनी सांगितले की, नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गामुळे विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासाला आणि शेतीमालाच्या वाहतुकीला चालना मिळणार आहे. त्यामुळे या भागात उद्योगधंद्यांची वाढ होईल तसेच शेतकऱ्यांच्या मालाला चांगला भाव मिळेल. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः पुढाकार घेऊन या महामार्गाचा आराखडा करून घेतला आणि कामाला सुरुवात केली. त्यांच्यामुळे महामार्गाचे काम झाले. महामार्गाचे स्वप्न पूर्ण झाल्याबद्दल आपण संपूर्ण महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने त्यांचे आभार मानतो. महामार्गाचे काम सुरू झाले त्यावेळी एकनाथ शिंदे संबंधित खात्याचे मंत्री होते. त्यांनी या कामासाठी पूर्ण वेळ दिला. आता मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी महामार्गाच्या उरलेल्या बाबी पूर्ण करतानाच तो गोंदियापर्यंत पुढे नेण्याचे जाहीर केले आहे. आपण त्यांचेही आभार मानतो.

ते म्हणाले की, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूरचे खासदार झाल्यानंतर हे शहर सर्वोत्कृष्ट होण्यासाठी ध्यास घेतला. मेट्रो, उड्डाणपूल अशा अनेक योजना मंजूर करून घेतल्या. नितीन गडकरी यांच्या पुढाकाराने राज्यात ठिकठिकाणी महामार्गांची कामे पूर्ण होत आहे व त्यामुळे महाराष्ट्राची क्षमता वाढत आहे.

Check Also

अमित शाह यांचे अरविंद केजरीवाल यांना प्रत्युत्तर, ७५ री झाली तरी मोदीच

नरेंद्र मोदी पुन्हा देशाचे पंतप्रधान होतील आणि तिसरा कार्यकाळ पूर्ण करतील, असे केंद्रीय गृहमंत्री अमित …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *