Breaking News

उध्दव ठाकरे म्हणाले, तुमचं मत ट्रॅव्हल एजन्सीसारखं… घनसावंगी येथील साहित्य समेंलनाचे उध्दव ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन

शिवसेना(ठाकरे गट) पक्षप्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे हस्ते जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथे ४२ व्या मराठवाडा साहित्य संमेलनाचे उद्घाटन आज शनिवारी झाले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणाद्वारे केंद्रातील मोदी सरकार आणि राज्यातील शिंदे -फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली. राज्यातील सत्तांतराच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवरून उद्धव ठाकरेंनी शिंदे गटाला टोलाही लगावला.

उद्धव ठाकरे म्हणाले, “लोकशाही म्हणजे काय?” तुम्ही आम्हाला मतं देऊन निवडून देत असाल, तर तुमच्या मताची किंमत ही खोक्यांमध्ये नाही, तर भावनेमध्ये झाली पाहिजे. आता पंचायत अशी झालेली आहे की आपल्याकडे गुप्त मतदान आहे. गुप्त मतदान जरूर आहे, पण ते गुप्त म्हणजे काय? मी दिलेलं मत माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाला कळू नये, असा त्याचा अर्थ आहे. पण आता तुम्ही दिलेलं मत तुम्हाला तरी कळतंय का कुठे जाणार आहे आणि कुठून कुठून जाणार आहे? म्हणजे ट्रॅव्हल एजन्सी सारखं सुरत, गुवाहाटी, गोवा, दिल्ली कधी इकडे कधी तिकडे म्हणजे आम्हालाच माहीत नाही. मतदारांपासून मतदान हे गुप्त व्हायला लागलेलं आहे. असं कसं काय चालणार? असा खोचक सवालही केला.

याचबरोबर, ही लोकशाही आपण मानू शकत नाही. लोकशाहीचा अर्थ हा जर का अशा पद्धतीने लागणार असेल, तर मग त्याच्यापेक्षा एकदाच जाहीर करा लोकशाही संपली. जर हिंमत असेल तर जाहीर करा की या देशातली लोकशाही संपली. आम्हाला पाहिजे तेच यापुढे होईल, तुम्ही मत कोणालाही दिलं तरी आम्ही त्याच्या घरी खोका पाठवू, खोक्यात बसवून त्या माणसाला आमच्याकडे आणू तुम्ही बसा बोंबलत असंही उद्धव ठाकरेंनी यावेळी म्हटलं.

याशिवाय, मला असं राजकारण हे क्षेत्र वाईट नाही. मी विद्यार्थ्यांना सांगतो की जरूर राजकारणात या. तरूण-तरुणींनी राजकारणात आलंच पाहिजे. कारण तुम्हीच तर उद्याचं भवितव्य आहात. पण ते भविष्य आता वर्तमान जसं अंधकारमय झालेलं आहे तसं होता कामा नये. उज्ज्वल भवितव्यासाठी तुम्ही पुढे या. राजकारणी आणि साहित्यिक या दोघांनी हातात हात घालून काम केलं पाहिजे अशी भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.

अब्दुल सत्तार यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर केलेल्या टीकेचा समाचार घेताना उद्धव ठाकरे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांनी माता-भगिनींचा मान राखायला शिकवलं, पण त्यांच्याच महाराष्ट्रात एका महिलेचा अपमान करणारा मंत्री अजूनही मंत्रिमंडळात आहे. तुम्ही काय आम्हाला शिवाजी महाराज शिकवणार? जर मी त्या ठिकाणी असतो ना… आणि होतो तेव्हा एका मंत्र्याला मी काढून टाकलं होतं. नाहीतर काय अर्थ आहे? फक्त भाषणं द्यायची, छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणायचं आणि इथे महिलेचा अपमान केला, तर त्याकडे दुर्लक्ष करायचं. अजिबात नाही चालणार. त्याला आत्तापर्यंत मंत्रिमंडळातून काढून टाकायला पाहिजे होतं, असेही ते म्हणाले.

महाराजांची शिकवण जोपर्यंत आपण अंमलात आणणार नसू, तोपर्यंत ती वाचण्याचीही गरज नाही मग. असे राज्यकर्ते बघितल्यानंतर मला वाटतं की पुन्हा एकदा अमृतमहोत्सवाच्या ७५व्या वर्षात असताना थांबून मागे बघायला पाहिजे की जे स्वातंत्र्य आपण मिळवलं, ते खरंच टिकवलं आहे का? असेही ते म्हणाले.

यावेळी बोलताना उद्धव ठाकरेंनी राज्यातील शिंदे सरकारला लक्ष्य करताना म्हणाले, बरं झालं, ज्ञानेश्वर आत्ता नाहीयेत. त्यावेळी वेद बोलणारा रेडा होता. आत्ताचे रेडे वेगळे आहेत. हे वेद वगैरे बोलणार नाहीत, फक्त खोका खोका बोलतील. बाकी काही बोलणार नाहीत, अशा शब्दांत उद्धव ठाकरेंनी टीका केली.

आत्ता विचारांचं दारिद्र्य असलेले जे राज्यकर्ते विद्यापीठांसाठी भीक मागायला सांगत आहेत, ते तुम्हाला पसंत असतील, तर हे सगळं फुकट गेलं. नसतील तर ते घालवायचे कसे, त्याचा निश्चय करा असे आवाहन भाजपाच्या चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधताना केले.

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *