Breaking News

आणि लावणीचा ठसकेबाज सुरेल आवाज हरपला… लावणी गायिका सुलोचना चव्हाण यांनी घेतला अखेरचा श्वास

गेली ४०-५० वर्षापासून मराठी चित्रपटातील लावणी ऐकायची तर फक्त सुलोचना चव्हाण यांच्या आवाजातील अशी अनोखी ओळख बनलेल्या लावणी पार्श्वगायिका सुलोचना चव्हाण यांनी आज वयाच्या ९२ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतल्याची माहिती त्यांचा मुलगा विजय चव्हाण यांनी दिली.सुलोचना चव्हाण आता प्रत्यक्ष जरी नसल्या तरी त्यांच्या ध्वनीमुद्रित गाण्याच्या माध्यमातून आपल्या सोबत सदैव राहणार आहेत. त्यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीतील अनेकांनी त्यांना आदरांजली वाहत दु:ख व्यक्त केले.

लावणी आणि सुलोचना ताईंचे वेगळेच नाते होते. मराठी चित्रपटसृष्टीत ठसकेबाज लावणी गात त्यांनी एक वेगळीच भूरळ श्रोत्यांना घातली होती. खऱ्या अर्थाने मराठी चित्रपटसृष्टीच्या सुवर्णकाळात लावणी साठी एका वेगळ्या आवाजाचा शोध त्यावेळचे दिग्दर्शक अनंत माने, संगीतकार राम कदम आणि इतरांकडून सुरु होता. त्यावेळी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने सुलोचना चव्हाण यांची भेट झाली. त्यानंतर त्यांच्या आवाजात एक गाणं गाऊन घेण्यात आलं. आणि लावणी म्हणजे सुलोचना चव्हाण असे समीकरणच फिट झालं.

त्याकाळी शृगांरिक लावण्या गाण्याचं धाडसं लता मंगेशकर आणि आशा भोसले यांच्यासह कोणीही करत नव्हते. मात्र सुलोचना चव्हाण यांनी केलं. परंतु गाणी म्हणताना किंवा सार्वजनिक जीवनातही त्यांनी त्यांच्या डोक्यावरचा पदर कधी ढळू दिला नाही. तसेच त्यांच्या दिसणं आणि वागण्यातून त्यांचा घरंदाज पणा नेहमीच दिसून आला.

त्यांच्या पार्थिवावर संध्याकाळी मरीन लाईन्सच्या स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. तब्बल ६० वर्षांहून अधिक काळ मराठी रसिक मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या सुलोचना चव्हाण यांची प्रकृती मागील काही दिवसांपासून खालावलेली होती.

याशिवाय काही शस्त्रक्रियाही झाल्याने आणि वाढलेल्या आजारपणामुळे त्यांची प्रकृती चिंताजनक होती. अखेर आज १० डिसेंबर रोजी त्यांची प्राणज्योत मालवली.

सुलोचना चव्हाण यांचा अल्प परिचय:-

१३ मार्च १९३३ रोजी मुंबईत त्यांचा जन्म झाला. आज संध्याकाळी मरिन लाइन्स येथे अंत्यसंस्कार होणार आहे. ‘फड सांभाळ तुऱ्याला गं आला…’ ‘पाडाला पिकलाय आंबा..’ ‘मला म्हणत्यात पुण्याची मैना’ यांसारख्या एकाहून एक सरस लावण्या सुलोचना चव्हाण यांनी आपल्या खर्जातल्या आवाजाच्या जादूने ठसकेबाज केल्या. याच वर्षी त्यांचा पद्मश्री पुरस्काराने सन्मान करण्यात आला. तेव्हा व्हिलचेअरवर बसूनच त्यांनी तो स्वीकारला होता. तेव्हापासून सुलोचना यांची प्रकृती फारशी चांगली नसल्याचं दिसलं होतं. यानंतर त्या कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमातही दिसल्या नाहीत.

सुलोचना कदम असे त्यांचे माहेरचे नाव. त्यांचे शालेय शिक्षण चौथीपर्यंत झाले. त्यांनी लहानपणी मेळ्यांपासून श्रीकृष्णाची भूमिका करायला सुरुवात केली. त्यानंतर त्या उर्दू नाटकांमध्ये मजनूचीही भूमिका करायच्या. वयाच्या दहाव्या वर्षापासून त्यांनी गायला सुरुवात केली. लग्नाआधी त्यांनी सुमारे ७० चित्रपटांमध्ये पार्श्वगायन केले होते. त्यावेळी के. सुलोचना म्हणूनही त्या पार्श्वगायन क्षेत्रात होत्या.
त्यांनी आचार्य अत्रे यांच्या हीच माझी लक्ष्मी या चित्रपटासाठी पार्श्वगायन केले. हा मराठीतील त्यांचा पहिला चित्रपट. त्यानंतर सन १९५२ मध्ये त्यांनी शाम चव्हाण यांच्या कलगीतुरा या चित्रपटासाठी लावणी गायन केले. चव्हाण यांनीच सुलोचना कदम यांना लावणी गायन शिकवले. शब्दफेक, स्वरातील चढ उतार याची त्यांना जाणीव करून दिली. त्यानंतर सन १९५३ मध्ये सुलोचना कदम यांचा शाम चव्हाण यांच्याशी विवाह झाला आणि त्या सुलोचना चव्हाण झाल्या.

सुलोचना चव्हाण यांना गंगा-जमना पुरस्कार, महाराष्ट्र सरकारचे दोन जीवनगौरव पुरस्कार, पुणे महापालिकेतर्फे सन २००९ चा राम कदम पुरस्कार, सन २०११ चा महाराष्ट्र सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार अशा पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

३८ व्या वर्षी हा अभिनेता आता चढणार तिसऱ्यांदा बोहल्यावर; बिगबॉस च्या घरात लग्नाच्या बंधनात अडकलेला हा अभिनेता करणार तिसरं लग्न

बिगबॉस हिंदी या शो ने अनेकांचं भाग्य बनवलं तर अनेकांच करियर सेट करू टाकलं अशातच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *