Breaking News

भाजपाचा सवाल, उद्धव ठाकरे यांची ही नवी युती काँग्रेस-राष्ट्रवादीला मान्य आहे का? भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा सवाल

एकाबाजूला शिवसेनेतून ४० आमदारांना घेऊन बाहेर पडत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपाच्या मदतीने राज्यात सरकार स्थापन केले. त्यानंतर शिवसेनेतून अनेक माजी नगरसेवक, पदाधिकारीही शिंदे गटात सहभागी झाले. यापार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे हे एकटे पडत असल्याचे दिसत असतानाच आज संभाजी ब्रिगेड या संघटनेने शिवसेनेशी युती करत असल्याचे उध्दव ठाकरे यांची भेट घेत जाहिर केले. त्यावेळी उध्दव ठाकरे यांनी भाजपावर टीका केली. या टीकेवरून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उध्दव ठाकरे यांच्या या युतीवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीला खोचक सवाल केला.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संभाजी ब्रिगेडसोबत युती करताना नक्कीच शरद पवार आणि सोनिया गांधी यांना विश्वासात घेतले असणार. कारण या दोघांना विचारल्याशिवाय उद्धवजी काहीच करत नाहीत असा टोला चंद्रशेखर बावनकुळे यांनी उध्दव ठाकरे यांना लगावला.

२०१९ मध्ये उद्धवजी यांनी भाजपसोबत बेइमानी करून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत अभद्र युती केली. या अभद्र युतीमधून महाविकास आघाडी सरकार नावाची हिंदू विरोधी आघाडी जन्मास आली. परंतु उद्धवजी यांच्याच पक्षातील आमदारांना हे पटले नाही; म्हणून त्या आमदारांनी हिंदुत्वाच्या रक्षणासाठी त्यांची साथ सोडली आणि हे आमदार एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली स्वाभिमानाने भाजपासोबत आले असल्याचे ते म्हणाले.

आता उद्धवजी यांनी संभाजी ब्रिगेडसोबत युती केली. ही नवी युती उद्धवजी सोबत शिल्लक असलेल्या उर्वरित १५ आमदारांना मान्य राहणार आहे का? महाविकास आघाडीमधून बाहेर पडण्यासाठी उद्धवजी यांची ही धडपड तर नाही ना? उद्धवजी यांच्या या नव्या ब्रिगेडचे काँग्रेस पक्ष स्वागत करणार का? वैफल्यग्रस्त झालेले उद्धवजी उद्या कुणासोबत युती करतील याची शाश्वती आता राहिलेली नाही अशी टीकाही त्यांनी केली.

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *