Breaking News

युती करायची कि नाही हे जनता ठरवेल

पंढरपूर : प्रतिनिधी

नुकत्याच झालेल्या ५ राज्यांच्या निवडणूकांमध्ये तेथील जनतेने त्यांच्या घरात झालेली घाण साफ करण्यासाठी मतदान केल. तसेच मिझोरोम आणि तेलगंणा राज्यात प्रादेशिक पक्षांनी राष्ट्रीय पक्षाला धुळ चारली. त्यामुळे राज्यातही झालेली घाण साफ करण्यासाठी जनतेने मतदान करावे असे भाजपचे नाव न घेता आवाहन करत राज्यात युती करायची कि नाही याबाबत जनताच ठरवेल असे सांगत आगामी लोकसभा निवडणूकीत एकला चलो रे संकेत शिवसेनेचे पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी दिले.

अयोध्या वारीनंतर दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पंढपूरात चंद्रभागेची पूजा करण्यासाठी आणि शिवसेनेची भूमिका अधिक स्पष्ट करण्यासाठी शिवसेनेकडून जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. या सभेला संबोधित करताना ते बोलत होते. त्यानंतर उध्दव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबियांनी शिवसैनिकांच्या उपस्थितीत चंद्रभागेची पूजा केली. तत्पूर्वी त्यांनी विठ्ठलाचे दर्शनही घेतले.

राज्यातील कर्जमाफी केल्याचे सांगितल जातय. पण एक तरी शेतकरी दाखवा त्याचे कर्जमाफ केले आहे, किंवा त्याचा ७-१२ कोरा केलाय. मी पंढरीच्या विठ्ठलाला साकड घातलय की ज्यांनी माझ्या जनतेचं वाकडं केलंय, त्यांचं वाकडं करा आणि हेच जनतेच्या चरणीही माझं साकडं आहे. पंतप्रधानांना सांगायचाय, जगभर फिरताय एकदा आमच्या दुष्काळग्रस्त महाराष्ट्रात येऊन जा. दुष्काळासाठी आलेले केंद्रीय पथक कदाचित बुलेट ट्रेनने आलं होतं, पटपट निघून गेले

ज्या कडुंलिबाने कीड मारत होतो, त्यालाच कीड लागली आहे, असं एका शेतकऱ्याने सांगितल असून राज्याला लागलेली किड काढून टाकण्याची वेळ आल्याचे स्पष्ट करत जानेवारी मध्ये संपूर्ण दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करणार असल्याचेही त्यांनी यावेळी जाहीर केले.

कांदा प्रश्न किती दिवसात सोडवताय ?

गोरगरिबांना नाडण्याचा प्रयत्न केलात तर गाठ शिवसेनेशी आहे, हे लक्षात ठेवा. राज्यातला शेतकरी हा काय मल्ल्या आणि मोदी नाही. त्यामुळे गावागावातील शिवसेनेच्या शाखा, गोरगरिबांसाठी, शेतकऱ्यांसाठी आधाराचे केंद्र बनेल असे सांगत शिवसेना निवडणुका बाजूला ठेवून गोरगरिब, शेतकऱ्यांसाठी रस्त्यावर उतरायला तयार आहे. पीकविम्याचे पैसे केव्हा देताय? कर्जमाफ झालेला शेतकरी कधी दाखवताय ते सांगा? मी सरकारला इशारा देतोय, कांदा प्रश्न किती दिवसात सोडवताय? असा सूचक इशारा देत मला जागावाटपात स्वारस्य नाही. परंतु शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळाली पाहीजे अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.

सैनिकांना पगारवाढ देण्याचा प्रस्ताव आला तर तो तुम्ही मान्य करत नाही. मात्र सैन्यासाठी लागणाऱ्या शस्त्रास्त्र खरेदीत घोटाळा करताय. विमान खरेदीत घोटाळा होतोय. राफेल विमानाच्या खरेदीतील आरोपाप्रकरणी, म्हणतात की कोर्टाने क्लीनचीट दिल्याच बिनदिक्कतपणे सांगितले जातय. मात्र शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी आमच्याकडे उपाययोजना नाही असं केंद्र सरकारच संसदेत सांगतय.

राफेल विमानाचे कंत्राट ज्या कंपनीला दिल. ती कंपनी काही दिवस आधी अस्तित्वात आली. मग अनुभव नसलेल्या कंपनीला राफेल बनवायचं कंत्राट देताय तर महिला बचत गटांना गोळ्या बनविण्याचे कंत्राट देणार का? असा खोचक सवाल त्यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता केला.

पीकविमा योनेतही मोठा घोटाळा झाल्याचा आरोप ज्येष्ठ पत्रकार पी.साईनाथ यांनी केला आहे. ३२ हजार कोटींच्या कर्जमाफीत माझ्या एकाही शेतकरी बांधवाचे कर्ज माफ होत नाही?. पीक विम्याच्या नावाखाली पैसे खाण्याकरीताच पीक विम्याच्या बोगस कंपन्या स्थापन करण्यात आल्या असून राफेल पेक्षा मोठा घोटाळा या योजनेत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

राम मंदिर दिखेगा कब ?

बाबरी पाडून घेतली, बाबरीच्या मुद्दावरून गादी बळकावलीत आणि त्यावर  कुंभकर्णासारखे लोळताय ? सोहराबुद्दीन खटल्यातील सगळे निर्दोष मुक्त झाले, मात्र बाबरी पाडणाऱ्यां विरोधातील खटले अजून सुरू आहेत. ३० वर्ष होत आली, आता तुम्ही सांगता की न्यायालयात हा मुद्दा आला आहे? हिंदू भोळा आहे, मात्र तो बावळट नाही. राम मंदिर आणि हिंदुत्वाच्या मुद्दावर संसदेत चर्चा होऊन जाऊ दे, एनडीएतील किती पक्ष विरोधात आहे आणि किती समर्थनात आहे हे कळेल. राम मंदिराबाबत नितीश कुमार आणि रामविलास पासवान यांचे मत काय आहे ? असा सवाल करत राम मंदीर बांधणार असल्याची घोषणा करणाऱ्या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी राम मंदीर कब दिखेगा हे ही जाहीर करावे अशी उपरोधिक टीका त्यांनी यावेळी केली.

काँग्रेसचं अपत्य तुम्ही का मांडीवर घेता, कशाला त्याला दूध पाजता ? असा सवाल करत देवांच्या नावाने जुमला केलात. तर तुम्हाला ठोकून काढल्याशिवाय राहणार नाही असा इशारा देत राम मंदीराचा मुद्दा सोडणार नाही, सुटू देणार नाही असे सांगत झोपलेल्या कुंभकर्णाला जाग करण्यासाठी अयोध्येत गेलो होतो. वाराणसीतही जाईन प्रसंगी देश पिंजून काढणार असल्याचे त्यांनी जाहीर केले.

महाराष्ट्रावरचं संकट टाळण्यासाठी पांडुरंग पाहिजे, दुष्काळ निवारणासाठी पांडुरंग पाहिजे तर मग मुख्यमंत्री पदाची खुर्ची सोडा, पांडुरंगच तिथे बसेल असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव न घेता त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.

शिवसेनेचे राज्य आणणार म्हणजे, आणणारच

छत्तीसगडमधल्या लोकांनी घाण पहिले साफ केली, याला म्हणतात धाडस आणि हे धाडस मला शिवरायांच्या महाराष्ट्राकडून अपेक्षित असल्याचे सांगत शिवसेनेचे राज्य आणणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *