Breaking News

शिवसेनेच्या दलित माजी आमदाराला जातीवाचक शिव्या देत मारहाण १० दिवसानंतर अॅट्रोसिटी ऍक्टखाली गुन्हा दाखल

सातारा-मुंबई: राजू झनके
राज्यात सुरू झालेली दलितांवरील अत्याचारांची मालिका थांबेनासी झाली आहे. आतापर्यत गरिब दलितांवर अत्याचार होत होते. आता चक्क शिवसेनेचे धारावीचे माजी आमदार आणि चर्मकार समाजाचे नेते बाबुराव माने यांना त्यांच्याच गावात जातीवाचक शिवीगाळ करत तीन जणांनी मारहाण केल्याची खळबळजनक घटना सातारा जिल्ह्यात घडली. मात्र या प्रकरणात तब्बल १० दिवसांनी खटाव तालुक्यातील पुसेगाव पोलीस ठाण्यात अनुसूचित जाती/ जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आल्याची धक्कादायक माहिती पुढे आली.
ही घटना २७ जूनला घडली असली तरी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास ६ जुलैपर्यंत टोलवाटोलवी केली. शिवाय, दत्ता मारुती बनकर हा अटक केलेला एक आरोपी आज जामिनावर बाहेर आला असून हनुमंत दत्ता बनकर आणि गणेश दत्ता बनकर हे दोन आरोपी मात्र अजूनही मोकाट आहेत. त्या तिघांवरही अनुसूचित जाती/जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासाहित आयपीसीच्या कलम ३२३,५०४,५०६,३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुसेगाव पोलिसांनी पीडित फिर्यादी दलित आहे आणि आरोपी हे ओबीसी आहेत, असे सांगत अट्रोसिटी ऍक्ट न लावण्याची भूमिका घेत गुन्हा दाखल करण्यात टोलवाटोलवी केली. अखेर एका वकिलाने कायद्याबाबत कान उपटल्यानंतर पोलिसांनी तब्बल नऊ दिवसांनी गुन्हा दाखल केला, अशी धक्कादायक माहिती बुद्धिस्ट- शेड्यूल्ड कास्ट मिशनचे अध्यक्ष अच्युत भोईटे आणि सरचिटणीस असलेले राज्य सरकारचे माजी उपसचिव चंद्रकांत जाधव यांनी दिली आहे.
दरम्यान, बाबुराव माने हे सध्या त्यांच्या नेर- खटाव या गावात असून मारहाणीच्या घटनेने त्यांच्यावर मोठाच मानसिक आघात केल्याचे त्यांच्याशी बोलल्यावर जाणवते.
दलित समाजातील व्यक्ती कुठल्याही स्थानावर पोहोचली तरी इतरांच्या लेखी ती कनिष्ठ दर्जाचीच असते. त्यांचा दृष्टिकोन मुळीच बदलत नसतो. त्याच मानसिकतेतून आपल्यासारख्या माजी आमदाराला मारहाण करण्याची मजल हल्लेखोरांनी मारली,असे व्यथित उदगार त्यांनी काढले आहेत.
नेमके काय घडले?
बाबुराव माने यांना करण्यात आलेल्या मारहाणीची ही घटना नेर- खटाव या गावात २७ जून रोजी दिवसाढवळ्या भर चौकात घडली. ‘हा प्रकार घडताना ५०-६० जणांची गर्दी जमली होती. त्यांच्या समक्ष गावातील दत्ता बनकर, हनुमंत दत्ता बनकर, गणेश दत्ता बनकर या तिघांनी जातीवरून शिव्या हासडत आपल्याला मारहाण केली. या प्रकाराने आपली गावात मानहानी आणि नाचक्की झाली,’ असे माने यांनी एफआयआरमध्ये म्हटले आहे.
त्या दिवशी आपल्या घरासमोरील चौकातच ही घटना भरदुपारी घडली. तुझ्या घराच्या गच्चीवरील पाईपचे पाणी आमच्या शेतात जाते, असा आरोप करत दत्ता बनकर, हनुमंत दत्ता बनकर, गणेश दत्ता बनकर हे तिघे आपल्या दिशेने चाल करून आले. त्यांचा आरोप बिनबुडाचा आहे, असे सांगत आपण सांगत असतानाच त्यांनी धक्काबुक्कीही सुरू केली.
दत्ता बनकर हा ‘या चांभारड्याला आता धडा शिकवा. कितीही मोठे झाले तरी चांभार ते चांभारच राहणार’ अशा शब्दात त्याच्या दोन्ही मुलांना चिथावत होता. कोण बाजीराव याला वाचवायला मध्ये येतो, ते पाहतो, असे दत्ता बनकर याने सांगताच हनुमंत दत्ता बनकर आणि गणेश दत्ता बनकर हे आपल्यावर तुटून पडले, असे असे बाबुराव माने यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. आपणास त्या तिघांनी केलेल्या मारहाणीचे संपत चव्हाण, धनाजी चव्हाण, दिलीप कृष्णा शिंदे हे साक्षीदार आहेत, असेही त्यांनी नमूद केले आहे.
शिवसेनेने २००२-०३ मध्ये शिवशक्ती- भीमशक्ती यांच्या एकजुटीसाठी प्रयत्न सुरू करताच त्या काळात अचानक राज्यात दलितांवर अत्याचार, बहिष्काराची लाट आली होती. त्याची पुनरावृत्ती घडते की काय अशी साधार भीती वाटू लागली आहे. शिवसेनेचे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यापासून कुठल्या प्रवृतींचा पोटशूळ उठलाय हे कळायला मार्ग नाही.

Check Also

प्रज्वल रेवन्ना याच्या परदेशी पळून जाण्याप्रकरणी परराष्ट्र मंत्रालयाचा खुलासा

परराष्ट्र मंत्रालयाने गुरुवारी सांगितले की, लैंगिक शोषणाच्या आरोपांप्रकरणी चौकशीला सामोरे जात असलेले कर्नाटकचे खासदार प्रज्वल …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *