Breaking News

आदित्य ठाकरे यांचे बंडखोरांना खुले आव्हान, त्या प्रत्येकाला पाडणार मित्राने सांगितले काही दिवस तुमचं आडनाव ठोकरे करा

शिवसेनेचे नेते तथा राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी बंडखोर एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेलेल्या बंडखोर आमदारांना खुले आव्हान देत, बंडखोर आमदारांनी हिंमत असेल तर आज महाराष्ट्रात यावं आणि राजीनामा देऊन निवडणूक लढवावी. त्या प्रत्येक आमदाराला मी पाडणार असल्याचे आव्हान दिले. तसेच मी शपथ घेवूनच घराच्या बाहेर पडलोय. तुम्हीपण या साऱ्यांना विधानसभेत पाठविणार का? असा सवाल करत उपस्थित समुदायाला करताच समुदायानेही तितकेच जोरात नाही असे मोठ्याने सांगितले.

तसेच एका मित्राने बंडखोर आमदार महाराष्ट्रात आल्यावर तुमचं आडनाव काही दिवसांसाठी ठोकरे करा असा सल्ला दिल्याचा किस्साही सांगत ते पुढे म्हणाले की, मला काल एका मित्राचा फोन आला. तो म्हणाला की, आदित्य तुम्हाला आता लढा द्यायचा आहे. गद्दार आमदार कधी ना कधी महाराष्ट्रात येणार आहेत. मी म्हटलं बरोबर आहे. त्यावर तो म्हणाला तुमचं आडनाव काही दिवस ठोकरे करा. मी म्हटलं ठोकरे नाही, ठोकरेपेक्षाही ठाकरे हे नाव अधिक शक्तीशाली आहे.

शिवसेनेकडून सांताक्रुज येथे आयोजित शिवसेना मेळाव्यात ते बोलत होते. यावेळी स्थानिक पातळीवरील अनेक सेना नेते उपस्थित होते.

यावेळी बोलताना म्हणाले की, कधी ना कधी ‘फ्लोअर टेस्ट’ होणार आहेच. मात्र त्याआधी विमानतळावरून विधानसभेचा रस्ता कोठून जातो? कदाचित ते राज्यात सीआरपीएफ तैनात करतील, कदाचित सैन्य तैनात करतील, हेलिकॉप्टर, रणगाडे आणतील. प्रत्येक शिवसैनिक उभा राहणार आहे आणि पाहणार आहे. मी बंडखोरांना आव्हान देतो की या आणि विधानसभेत माझ्या समोर बसा. उध्दव ठाकरे यांच्या समोरही बसण्याची गरज नाही. आम्ही काहीही करणार नाही, हाताची घडी, तोंडावर बोट. तेव्हा मी डोळ्यात डोळे घालून बोलणार आहे की काय कमी केलं तुम्हाला? कोणाच्या नावावर निवडून आले आहात तुम्ही? असा सवालही त्यांनी केला.

प्रचार करताना यांचे चोचले पाहून घ्यायचे, तिकिट देताना यांची नाराजी पाहायची. जे निधी मिळाला नाही म्हणतात त्यांची संपूर्ण यादी आहे. ज्यांच्या महत्त्वकांक्षा राक्षसी आहेत त्यांची गळचेपी कुठेही होऊ शकते. प्रत्येक मतदारसंघात अमाप निधी मिळाला आहे. आम्ही निधी देतो तो उपकार करत नाही. लोकांच्या कामासाठी जनतेचा पैसा देत असतो. हा स्वतःला विकून घ्यायला आणि द्यायला पैसा नसतो असा खोचक टोलही त्यांनी लगावला.

अनेकदा प्रसंग वेगवेगळे येत असतात. कधी ईडीची फाईल असेल, कधी वेगळं कारण असेल. २-४ लोकांनी फोन करून सांगितलं की, आम्ही लाचार झालोय, आम्ही तुमचेच आहोत. काही गोष्टींचं दुःख आहे. प्रकाश सुर्वे सारखा माणूस तिथं गेला असेल यावर माझा विश्वास बसत नाही. मनाने तरी ते तिथं नसतील. तो माणूस माझ्या कार्यालयात रोज बसायचा, रस्त्याचं, फुटपाथचं, एसआरए, वनविभाग कशाचंही काम असो त्यांचं प्रत्येक काम मी केलं. फोन करून, मेसेज करून सांगायचे मी लगेच काम झालं म्हणून समजा सांगायचो. संदीपान भुमरे हे मंत्री कसे झाले माहीत आहे का? शिवसंपर्क अभियानातंर्गत मी त्यांच्या मतदारसंघात गेलो होतो. त्यावेळी तेथील जाहिर सभेत एकाने मला सांगितले भुमरे हे पाच टर्म झाले आमदार आहेत. त्यांना मंत्री करा त्यावर मी म्हणलो मी लगेच उध्दव साहेबांना सांगतो आणि त्यांना मंत्री करतो. त्यानंतर आणखी एकजण उठून उभा राहिला त्यावर मी म्हणलो की, कोणत्या खात्याचे मंत्री करा हे मी सांगू शकत नाही तो अधिकार मुख्यमंत्र्यांचा आहे. मात्र ते मंत्री होणार असे जाहिरपणे सांगितले. त्यानंतर ते माझा हात हातात घेवून रडले. आणि आता ते त्यांच्या मागे निघून गेल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

वर्षा गायकवाड यांचा आरोप, …बहुजन समाजातील मुलांना शिक्षणापासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न

शिक्षण हा प्रत्येक मुलाचा मूलभूत अधिकार असून ६ ते १४ वयोगटातील मुलांना मोफत व सक्तीचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *