Breaking News

बंडखोरांनाच पडला “ठाकरे कुटुंबावर बोलायचे नाही आणि बोलू द्यायचे नाही” वाक्याचा विसर बंडखोरांकडून आदित्य ठाकरेंना लक्ष्य करण्यास सुरुवात

शिवसेनेतील बंडाळीनंतर सध्या राज्याच्या शिवसंवाद दौऱ्यावर निघालेल्या शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांनी बंडखोरांवर गद्दार आणि पाठीत खंजीर खुपसला आदी आरोप आणि टीका करण्यास सुरुवात केली. त्यावर मागील काही दिवसांपासून मातोश्री आणि ठाकरे कुटुंबियांवर बोलायचे नाही अशी भूमिका घेणारे बंडखोर नेत्यांनी आता आदित्य ठाकरे यांना प्रत्युत्तर देण्यास सुरुवात केली आहे. तसेच बंडखोर आमदार गटांचे प्रवक्ते दिपक केसरकर यांनी आज थेट आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधत आम्ही बोलत नाही म्हणून आमच्याकडे मुद्दे नाहीत असे समजू नका असा इशारा देत धमक्या कोणाला देताय असे आव्हानही दिले. त्यामुळे बंडखोरांनी स्वत:च ठरविलेले आता मोडीत काढत असल्याचे दिसून येत आहे.

तर दुसऱ्याबाजूला बंडखोर आमदार सुहास कांदे, शंभूराज देसाई, दादा भुसे यांनी एकनाथ शिंदे यांना मारण्यासाठी सुपारी दिली होती. शिंदे यांना सुरक्षा देण्याची आवश्यकता असतानाही उध्दव ठाकरे यांनी सुऱक्षा देऊ नये असे सांगितल्याचा खळबळजनक आरोप करत उध्दव ठाकरे यांनाच लक्ष्य केल्याचे दिसून येत आहे.

आदित्य ठाकरे यांच्याकडून करण्यात येत असलेल्या आरोप आणि टीकेच्या पार्श्वभूमीवर बंडखोर नेते रामदास कदम यांना विचारले असता ते म्हणाले की, कोणी कोणाच्या पाठीत खंजीर खुपसला याविषयी लवकरच बोलणार असल्याचा इशारा दिला.

बंडखोर आमदारांनी बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीत खंजीर खुपसला या आदित्य ठाकरे यांच्या आरोपाला प्रत्युत्तर देताना रामदास कदम म्हणाले, मला वाटतं, बाळासाहेब ठाकरेंच्या पाठीत खंजीर कुणी खुपसला? आणि बाळासाहेबांच्या विचारांशी कुणी प्रतारणा केली? यावर मी लवकरच बोलणार आहे. आदित्य ठाकरेंचं जेवढं वय नाही, तेवढी वर्षे आम्ही राजकारणात आहोत. त्यामुळे आदित्य ठाकरेंकडून राजकारण शिकण्याची आवश्यकता आम्हाला नाही असा टोलाही लगावला.

दुसरीकडे, शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे आज नाशिकमधील मनमाड दौऱ्यावर असताना शिवसेनेचे बंडखोर आमदार सुहास कांदे चांगलेच आक्रमक झाले आहेत. मनमाडच्या विकासात आदित्य ठाकरेंचं एक टक्कादेखील योगदान नाही. नांदगाव मतदारसंघात येऊन तुमच्या पर्यटन खात्याचा एक प्रकल्प दाखवा, असे आव्हान कांदे यांनी केलं आहे. कांदे यांच्या याच आव्हानाला आदित्य ठाकरे यांनी उत्तर दिले आहे. शिवसैनिकांच्या प्रश्नांचे उत्तर द्यायला मी कटीबद्ध आहे. गद्दारांची प्रश्न विचारण्याची लायकी नसते, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

Check Also

निवडणुकीदरम्यान ‘डीप फेक’ रोखण्यासाठी कारवाई करण्याचे शासनाचे आदेश

लोकसभा निवडणुकीदरम्यान डीप फेक व्हिडिओज, क्लिप्स, फोटो किंवा इतर प्रकारचा कंटेंट तयार करून तो समाजमाध्यमे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *