Breaking News

सतेज पाटील यांनी काढली कांदे-भुसे-देसाई यांच्या ठाकरेंवरील “त्या” आरोपातील हवा एखाद्या व्यक्तीला संरक्षण देण्याचा निर्णय आम्ही नाही तर मुख्य सचिव घेतात

शिवसेनेत शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या विरोधात बंडाचा झेंडा फडकावित एकनाथ शिंदे यांच्या सोबत गेलेल्या ५० आमदारांमधील एक असलेले नाशिकमधील नांदगांवचे आमदार सुहास कांदे यांनी एकनाथ शिंदे यांना मारण्यासाठी सुपारी दिल्याचा आरोप केला. तसेच एकनाथ शिंदे यांना सुरक्षा मिळणे आवश्यक असतानाही त्यांना झेड प्लस सुरक्षा देवू नये यासाठी वर्षा निवासस्थानावरून फोन करण्यात आल्याचा खळबळजनक आरोप करत उध्दव ठाकरे यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले. या आरोपास दादा भुसे आणि माजी गृह राज्यमंत्री शंभुराज देसाई यांनीही दुजोरा दिला. त्यावर काँग्रेसचे आमदार तथा माजी गृह राज्यमंत्री (शहर) सतेज बंटी पाटील यांनी यासंदर्भात गौप्यस्फोट करत दोघांच्या आरोपातील हवाच काढून घेतली.

बंडखोर आमदारांकडून होणाऱ्या या आरोपांना आता तत्कालीन गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी प्रत्युत्तर देताना म्हणाले की, शंभुराजे देसाई असो वा मी, एखाद्या व्यक्तीला संरक्षण देण्याबाबतचा निर्णय आम्ही घेत नाही. मुख्य सचिवांच्या अंतर्गत ही समिती असते, संबंधित व्यक्तीला धोका आहे का? याचं विश्लेषण केलं जातं. धोका असल्यास एसआयटीकडून अहवाल दिला जातो. त्यानंतर संबंधित व्यक्तीला संरक्षण पुरवलं जातं असे स्पष्ट केले.

त्याचबरोबर यामध्ये मुख्यमंत्री अथवा गृहमंत्री कोणताही हस्तक्षेप करत नाहीत. मुख्य सचिवांच्या अंतर्गत ही समिती असल्याने धोक्याचं विश्लेषण झाल्यानंतर त्यांना योग्य वाटेल, अशा व्यक्तींना संरक्षण पुरवली जाते. त्यामुळे एकनाथ शिंदेंना संरक्षण पुरवू नका, अशी सूचना मुख्यमंत्र्यांकडून गेल्या असतील, असं मला वाटत नाही. कारण त्यावेळी एकनाथ शिंदे हे उद्धव ठाकरे यांच्यासोबत होते. त्यामुळे त्यांना सुरक्षा देऊ नका म्हणण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. याउलट ते गडचिरोलीचे पालकमंत्री असल्याने त्यांना वाढीव सुरक्षा पुरवली जाते. पोलीस खातंदेखील त्यांची विशेष काळजी घेतं. म्हणून मला या गोष्टीत काही तथ्य वाटत नसल्याचेही त्यांनी सांगत शंभूराज देसाई, दादा भुसे आणि सुहास कांदे यांच्या आरोपातील हवाच काढून घेतली.

दरम्यान सुहास कांदे यांनी आरोप करताना म्हणाले की, ज्यावेळी नक्षलवाद्यांकडून एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या, त्यावेळी दोन्ही गृहमंत्र्यांनी (राज्य आणि कॅबिनेट) त्यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा देण्याचा विचार केला होता. पण उद्धव ठाकरेंनी सकाळी साडेआठ वाजता शंभूराज देसाई यांना फोन करून एकनाथ शिंदेंना सुरक्षा देऊ नका असं सांगितलं. तसेच एक मराठी माणूस नक्षलवाद्यांविरोधात लढत असताना त्याला जीवे मारण्याची धमकी मिळत असूनही सुरक्षा का पुरवण्यात आली नाही? जे हिंदुत्वाच्या विरोधात होते त्यांना झेड प्लस सुरक्षा का देण्यात आली? असे प्रश्नही कांदे यांनी उपस्थित केला होता.

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *