Breaking News

अजित पवार यांना त्यांच्याच सोबत असणाऱ्या खास व्यक्तीकडून वाढदिवसाच्या अशाही शुभेच्छा समाजमाध्यमावरून अजित पवार यांच्या व्यक्तीमत्वाची दिली नवी ओळख

राज्याच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याबद्दल सातत्याने अनेक विषयावरून चर्चा होत असते. कधी त्यांच्या वक्तशीरपणाबद्दल तर कधी त्यांच्या चिमटे काढण्याच्या पध्दतीवरून तर कधी त्यांच्या कामाच्या तर कधी फटकळपणाबद्दल चर्चा होत राहते. मात्र या पलीकडचेही एक अजित पवार तुम्हा-आम्हाला माहित नसलेले एक प्रकारची ओळख त्यांच्याच सोबत सतत असणारे स्वीय सहाय्यक सुनिलकुमार मुसळे यांनी अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त समाजमाध्यमावर एक छोटेखाली पोस्ट लिहीत आगळ्या वेगळ्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अजित पवार हे आज आपला ६३ वा वाढदिवस साजरा करत आहेत. अनेक नेतेमंडळी आणि कार्यकर्त्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. अजित पवारांच्या राजकीय कारकिर्दीमधील अनेक गोष्टी अगदी जवळून पाहणारे फारच कमी आहेत.

अजित पवार यांच्यातील राजकारणी व्यक्तीमत्वापलीकडे ते कसे आहेत यासंदर्भात मुसळे यांनी आपल्या पोस्टमध्ये भाष्य केलं आहे. फेसबुकवर सात परिच्छेद असणारी लांबलचक पोस्ट मुसळे यांनी अजित पवारांसाठी लिहिलेली आहे. यामध्ये अजित पवार यांना असणारी स्वच्छतेची आवड ते त्यांचा वक्तशीरपणा अशा अनेक गोष्टींचा सविस्तर उल्लेख मुसळे यांनी केलाय. राजकीय दौऱ्यांपासून मंत्रालयापर्यंत नेहमीच अजित पवारांबरोबर असणाऱ्या मुसळे यांनी अजित पवारांच्या वक्तीमत्वाच्या अनेक पैलूंबद्दल आपल्या पोस्टमध्ये भाष्य केलं आहे. जाणून घेऊयात त्यांच्याच शब्दांमध्ये…

राज्याचे विरोधी पक्षनेते आदरणीय अजित दादा पवार यांच्या शिस्तीचे आणि वक्तशीरपणाचे अनेक किस्से महाराष्ट्रातील जनतेने ऐकले आहेत. दादांच्या राजकीय विरोधकांनी खुल्या दिलाने मांडले आहेत. तब्बल एक दशकाहून अधिक काळ दादांसोबत असल्याने मला प्रत्यक्षात ते नेहमीच अनुभवता आले.

प्रत्येक दौऱ्यात दादांच्या शिस्तीचा परिचय आल्याशिवाय राहत नाही. अजित दादा हे स्वच्छतेच्या बाबतीत फार शिस्तप्रिय आहेत. त्यांना कुठेही कचरा दिसला तर ते अधिकारी आणि कार्यकर्त्यांची कानउघडणी करत असतात. अनेक ठिकाणी दौऱ्यावर असताना अजित दादांना कार्यक्रमस्थळी कचरा आढळून आला असतांना त्यांनी स्वतः कचरा उचलत बाजूला केल्याची अनेक उदाहरणे आहेत. बरं ही प्रामाणिक तळमळ फक्त बारामती, महाराष्ट्र किंवा देशापुरता वावरताना मर्यादित नाहीये. काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी मंत्र्यांचा विदेश दौर्यावर असतांना दादांबद्दलचा एक अनुभव सांगितला होता. दुसरं कोणीतरी रस्त्यावर टाकलेले चॉकलेटचे कव्हर दादांनी स्वतः उचलून कचरापेटीत टाकले होते.

सहसा भारतीय समाजजीवनात, राजकारणात वक्तशीरपणा अभावानेच आढळतो. बहुतांश राजकारण्यांना त्याचे वावडे असल्याने वेळा न पाळणे ही राजकीय फॅशन झाल्याचे आपल्याला दिसते.

वक्तशीरपणाच्या बाबतीत जॉर्ज वॉशिंग्टन यांचे अनेक किस्से अमेरिकेत प्रसिद्ध असल्याचे माझ्या वाचनात आले.

आपल्याकडच्या राजकीय नेत्यांसोबत मनोमन तुलना करताना अजित दादांचे नाव प्रकर्षाने त्यात समाविष्ट करावे लागेल. व्यासपीठावरील वा समोरील वेळेत नाही आले म्हणून दादा वेळेची चालढकल करतांना आजतागायत दिसले नाही. कार्यक्रम, बैठक, प्रचारसभा अगदी दिलेल्या वेळीच हजर राहण्याचा पायंडा आजतागायत चुकला नाही.

आजकाल अभ्यागत कार्यकर्त्ये यांच्याकडून पाय पडून घेणेच काय पाय धुवून घेणे वगैरे राजकीय ट्रेंड देशभर शिगेला पोचलेला दिसत असतांना स्पष्टपणे पाटी लावून या सवंग गोष्टींना मनाई करत फक्त कार्यालाच सर्वोच्च प्राधान्य देण्याचा त्यांचा स्थायीभाव आहे.

हाती घेतलेले काम नियोजनानुसार यशस्वी पार पाडणे.

स्पष्टवक्तेपणा, वेळ आणि ‘दिलेला शब्द पाळणे’ या उच्च नैतिक मूल्यांचा राजकारणात ऱ्हास झपाट्याने होतांना दिसतोय. प्रसिद्धीपिपासूपणा, लोकानुनय करण्याचा, खोटं बोलून वेळ मारून नेणे आता साधारण गोष्ट झालेली दिसते. आजपर्यंतच्या स्पष्ट, पारदर्शी कार्यपद्धतीमुळे सामाजिक, राजकीय आणि प्रशासकीय पातळीवर अजित दादांचे वेगळेपण उठून दिसते.

आज आदरणीय दादांच्या वाढदिवसाच्या पुर्वसंध्येला अशा अनेक आठवणी, घटना, प्रसंग, क्षण डोळ्यांसमोर उभ्या राहिल्या. आदरणीय दादा, शतायुषी व्हा! आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा !!!

सुनीलकुमार मुसळे

हीच ती फेसबुक पोस्ट:-   

 

 

Check Also

द प्रॉब्लेम ऑफ द रूपीः भारतीय रूपयाचे संकट, ऱिझर्व्ह बँकेची स्थापना डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या संकल्पनेतील मध्यवर्ती बँक

१ एप्रिल १९३४, भारतीय मध्यवर्धी बँक अर्थात रिझर्व्ह बँकेची स्थापना करण्यात आली. त्याच्या जवळपास १० …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *