Breaking News

विद्युत शुल्कातील माफीमुळे मेट्रो प्रवाशांना नेमका किती फायदा होणार?

मेट्रोला विद्युत शुल्क माफ करताना मेट्रोच्या प्रवाशांना किती फायदा होणार? तिकीट दर नेमका किती कमी होणार? असे सवाल विधान परिषदेतील कॉंगेसचे गटनेते आमदार सतेज पाटील यांनी उपस्थित केले. तसेच मुंबई, नवी मुंबई मधील मेट्रोच्या तिकीट दरातील तफावतीबद्दल खुलासा करण्याची मागणीही त्यानी केली. यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दरातील तफावतीबद्दलची सूचना नियामकांकडे मांडण्यात येईल असे सांगितले.

विधान परिषदेत मांडण्यात आलेल्या महाराष्ट्र विद्युत शुल्क सुधारणा विधेयकावरील चर्चेदरम्यान आमदार सतेज पाटील यांनी सहभाग घेतला. या शुल्क माफीचा उद्देश प्रवासी संख्येत वाढ व्हावी आणि त्यांच्यावरील तिकीट दराचा बोजा कमी व्हावा असा आहे. याचा फायदा मुंबई, पुणे, नवी मुंबई, नागपूर मेट्रोला होणार आहे. मात्र, या विद्युत शुल्क माफीमुळे मेट्रोच्या प्रवाशांना नेमका किती फायदा होणार? असा सवाल त्यानी केला. मेट्रोसाठी नॅशनल कॉमन मोबॅलीटी कार्ड आवश्यक असतानाही काही स्टेशनवर हि सुविधा अद्याप उपलब्ध नाही. तसेच मुंबई मेट्रोसाठी पहिल्या ३ किमीला १० रुपये तर ३ ते १२ किमीसाठी २० रुपये तिकीट दर असताना नवी मुंबई मेट्रोसाठी हाच दर अनुक्रमे २० रुपये व ४० रुपये आहे. मेट्रोच्या तिकीट दरातील या तफावतीबद्दल खुलासा व्हावा अशी मागणी त्यानी केली.

यावर उत्तर देताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, मेट्रोचे प्राथमिक तिकीट दर हे त्यावर किती खर्च झाला हे लक्षात घेऊन ठरवले जातात. त्या प्रकल्पाचा रनिंग खर्च निघावा अशा पद्धतीने हि रचना केली जाते. तिकीट दर निश्चितीसाठी राज्यात नियामकांची रचना केली असून १ वर्षाने दर ठरवण्यासाठी त्यांच्यासमोर प्रस्ताव जातो. त्यानी ठरवलेल्या दरानुसार त्यापुढे अंमलबजावणी केली जात. दरातील तफावतीबाबतची आमदार पाटील यांची सूचना नियामकांकडे मांडण्यात येईल, अशी ग्वाही फडणवीस यांनी यावेळी दिली.

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *