Breaking News

हसन मुश्रीफ यांचा इशारा, बोगस डॉक्टरांवर कारवाईसाठी विशेष मोहीम

बनावट पदवी प्रमाणपत्र प्राप्त करून वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांना शोधण्यात येईल. अशा बोगस डॉक्टरांवर कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.

याबाबत सदस्य बाळासाहेब थोरात यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेत सदस्य अजय चौधरी, प्रताप सरनाईक, योगेश सागर, प्रा. वर्षा गायकवाड, राजेश टोपे, रवींद्र वायकर, अमित देशमुख यांनी भाग घेतला.

मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, वैद्यकीय अभ्यासक्रम पूर्ण करून पदवी प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना महाराष्ट्र वैद्यकीय आयोग संस्थेत नोंदणी करणे बंधनकारक आहे. राज्यात वैद्यकीय व्यवसाय करण्यासाठी ही नोंदणी आवश्यक आहे. परदेशातून वैद्यकीय प्रमाणपत्र प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना भारतीय वैद्यक विज्ञान परिषद व महाराष्ट्र वैद्यकीय आयोग या दोन्ही संस्थांमध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे. तसेच एक वर्षाची वैद्यकीय क्षेत्रात आंतर वासिता (इंटरशीप) करणेही बंधनकारक आहे.

मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, परदेशात बनावट पदवी प्रमाणपत्र घेतलेले १२३ विद्यार्थी २०२२-२३ मध्ये केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सी.बी.आय) माध्यमातून देशात शोधण्यात आले. यामध्ये राज्यातील ३ विद्यार्थी आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यात येत आहे. केंद्र सरकारने याबाबत नियमात बदल केला असून चीन, न्यूझीलंड, कॅनडा, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, ब्रिटन या देशातून वैद्यकीय पदवी प्रमाणपत्र प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना केंद्र शासनाची परीक्षा देण्याची अट नाही. मात्र, अन्य राष्ट्रातून पदवी प्रमाणपत्र प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना परीक्षा देणे आवश्यक आहे. त्यांनतर त्यांना देशात वैद्यकीय व्यवसाय करता येतो, अशी माहितीही दिली.

मंत्री हसन मुश्रीफ पुढे म्हणाले, बोगस पदवी प्रमाणपत्र घेऊन वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांना शोधून कारवाई करण्यासाठी जिल्हाधिकारी, महानगरपालिका आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती आहे. या समित्यांना सातत्याने बोगस डॉक्टर शोधून कारवाई करण्याच्या सूचना देण्यात येतील.

Check Also

ऑनलाईन गेमिंग क्षेत्रातील तरूणाईशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील अव्वल ऑनलाईन गेमिंग क्षेत्रातील गेमरशी संवाद साधला. मात्र यागेमर्सनी पंतप्रधान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *