Breaking News

अजित पवार म्हणाले, आमच्या अडीच वर्षाच्या काळात असे कधी झाले नव्हते सीमा भागातील अनेक गावे आताच का बोलायला लागली

राज्यात शिंदे-फडणवीस यांचे सरकार आले. मात्र हे सरकारच आहे की नाही अशी अवस्था झाली आहे. या सरकारच्या काळात महाराष्ट्रातील सीमावर्ती भागात असलेली गावे कधीही बोलत नव्हती. मात्र आता ती गावे कोण म्हणतं गुजरातला जातो, कोण म्हणतं तेलंगणात जातो म्हणतो, तर कोणी थेट कर्नाटकात जातो असे म्हणतंय. आमच्या अडीच वर्षाच्या काळात असं कधी घडलं नव्हत. मात्र हे सरकार आल्यापासून या गोष्टी घडत असल्याची टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर केली.

महाविकास आघाडीतील प्रमुख पक्षाच्या नेत्यांची आज बैठक पार पडली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आदी उपस्थित होते.

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, राज्याच्या सीमाभागातील गावांनी महाराष्ट्राबाहेर जाण्याची मागणी करावी, असे यापूर्वी कधीही घडले नव्हते. यामागे कोण आहे याचा शोध घेतला पाहिजे. घटनात्मक पदांवरील व्यक्तींनी महापुरुषांचा अवमान करण्याचे दूस्साहस यापूर्वी कधीही केले नव्हते. महाराष्ट्राचा मुख्यमंत्री यापूर्वी कधीही हतबल दिसला नव्हता. राज्य मंत्रिमंडळाने निर्णय घेऊनही, माध्यमांमध्ये तसे जाहीर करूनही राज्याचे दोन मंत्री मराठी भाषिक बेळगावमध्ये जाऊ शकले नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. महाराष्ट्राच्या मंत्र्यांना बेळगावमध्ये बंदी कशी होऊ शकते आणि महाराष्ट्र सरकार हे कसे सहन करते हेच समजत नाही.

महाविकास आघाडीने आयोजित केलेल्या मोर्चाआधी राज्यपालांना पदावरून हटवले तरीही हा मोर्चा निघेलच, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले. नांदेडमधील देगलूर, सांगलीतील जत, सोलापुरातील अक्कलकोट, गुजरात सीमेलगतच्या नंदुरबार जिल्ह्यातील तसेच अन्य गावांसाठी महाविकास आघाडी सरकारने अनेक विकासकामे जाहीर करून त्यासाठी निधीही उपलब्ध केला होता. त्या कामांना स्थगिती देण्याचे पाप शिंदे-फडणवीस सरकारने केले असल्याचा आरोपही अजित पवार यांनी केला. महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी तसेच राज्यातील विविध संस्था संघटनांनीही १७ डिसेंबरच्या मोर्चाला आपले समर्थन दिले असल्याची माहिती ही अजित पवार यांनी यावेळी दिली.

दरम्यान, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्यासारख्या महापुरुषांचा घटनात्मक पदांवर बसलेल्या व्यक्तींकडून सातत्याने होत असलेला अवमान, सीमाभागातील गावांकडून महाराष्ट्राबाहेर जाण्याची इतिहासात पहिल्यांदाच होत असलेली मागणी, मोठमोठे प्रकल्प राज्याबाहेर पळवल्याने होत असलेलं नुकसान, वाढती महागाई, बेरोजगारी, संकटग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्यात आलेलं अपयश, अशा अनेक आघाड्यांवर राज्यातील विद्यमान शिंदे-फडणवीस सरकार सपशेल अपयशी ठरलं असून महाराष्ट्राच्या अभिमान, स्वाभिमान, महाराष्ट्राच्या हितांचे रक्षण या सरकारकडून होऊ शकलेलं नाही. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांच्या ‘अरे’ ला ‘कारे’ म्हणण्याची धमक या सरकारमध्ये नाही. अशा नेभळट सरकार विरोधात महाविकास आघाडी आणि महाराष्ट्रप्रेमी नागरिकांच्यावतीने येत्या १७ डिसेंबरला मुंबईत जिजामाता उद्यान ते आझाद मैदानापर्यंत भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे.

तर… महाराष्ट्राची सत्ता सोडा – बाळासाहेब थोरात  
राज्यात शिंदे सरकार आल्यापासून महाराष्ट्राची सतत अवहेलना होत आहे. शिवाजी महाराज यांच्याबद्दल भाजप प्रवक्ता ते कार्यकर्ता यांनी केलेली वक्तव्ये ही मन दुखावणारी आहेत. ही अवहेलना सामान्य माणूस पाहू शकणार नाही. राज्यात राज्यपाल आणि सरकारविरोधात प्रचंड असंतोष आहे. तो असंतोष मोर्चामधून व्यक्त होणार आहे. कर्नाटक मुख्यमंत्री वेगवेगळी वक्तव्ये करतात आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री काहीच उत्तर देत नाही. सरकार डोळे झाकून गप्प आहे. या मोर्चात सर्व घटक पक्ष आमच्यासोबत येणार आहेत. हे सरकार महाराष्ट्र्राची अस्मिता जपणार नसेल तर त्यांनी सत्ता सोडावी हा इशारा आम्ही मोर्चामधून देणार आहोत असे काँग्रेस विधीमंडळ गटनेते बाळासाहेब थोरात यांनी यावेळी सांगितले.

Check Also

लोकसभा निवडणूकीच्या दोन टप्प्यात सरासरी ६६ टक्के मतदान बोगस कंपन्यांच्या नावांवर म्युच्युअल फंड विक्रीला पायबंद करण्यासाठी

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ६६.१४ टक्के आणि लोकसभा निवडणुकीच्या टप्प्यात ६६.७१ टक्के मतदान झाल्याची माहिती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *