Breaking News

उध्दव ठाकरेंचा इशारा, राज्यपाल आणि नेभळट शिंदे-फडणवीस सरकारच्या विरोधात महामोर्चा १७ डिसेंबरला जिजामाता उद्यान ते आझाद मैदान मोर्चा

मागील काही दिवसांपासून राज्याचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजाचा राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपाच्या आमदार, पदाधिकाऱ्यांकडून करण्यात येत असलेल्या अवमानाच्या आणि कर्नाटक सरकारकडून महाराष्ट्राच्या विरोधात करण्यात येत असलेल्या वक्तव्यावर एक चकार शब्दही न काढणाऱ्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे-उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात १७ डिसेंबर रोजी महामोर्चा काढण्यात येणार असल्याची घोषणा शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांनी आज केली.

आगामी हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील प्रमुख नेत्यांची बैठक आज विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या शासकिय निवासस्थानी झाली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत उध्दव ठाकरे हे बोलत होते. यावेळी त्यांच्यासोबत विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात आदी उपस्थित होते.

राज्यपाल आणि भाजपकडून सातत्याने छत्रपतींची, महाराष्ट्राची अवहेलना होत आहे. सीमा भागातील गावे कर्नाटक, तेलंगणा, गुजरात येथे जाण्याची मागणी करत आहेत. इतके सगळे होत असतानाही मुख्यमंत्री शांत बसून आहेत. राज्यपाल हटाव अशी आमची मोहीम नाही पण ज्यांनी ज्यांनी महाराष्ट्राचा अपमान केला आहे त्यांच्याविरोधात १७ डिसेंबरला जिजामाता उद्यान ते आझाद मैदान मोर्चा काढण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.
राज्यात महाविकास आघाडीचे चांगले चाललेले सरकार गद्दारी करून पाडले. त्यांनतर जे सरकार सत्तेत आले त्याचा कारभार पाहता राज्यात सरकार आहे की नाही असा प्रश्न पडल्याची टीका त्यांनी केली.

राज्यपाल कोश्यारी सातत्याने महाराष्ट्र आणि छत्रपतींची अवहेलना करणारी वक्तव्ये करत आहेत. मागे त्यांनी हिंदूमध्येच फूट पाडणारी वक्तव्ये केली. ज्या राज्यपालांनी अशी वक्तव्ये केली त्यांना निवेदन कशाला द्यायचे? महाविकास आघाडीमधील सर्व घटक पक्ष यांच्याशी चर्चा करून आता सगळ्यांची एकजूट दाखविण्याची वेळ आली आहे यावर आमचे एकमत झाले. त्यामुळे हिवाळी अधिवेशनापूर्वी १७ डिसेंबरला जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा हा विराट मोर्चा काढून महाराष्ट्राच्या शक्तीचे विराट दर्शन दाखविणार आहोत. भाजपामधील शिवप्रेमी तसेच महाराष्ट्रातील सर्व शिवप्रेमींनी या मोर्चात सामील व्हावे, असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केले.

गुजरात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातले उद्योग पळवले. काही दिवसानी कर्नाटकमध्ये निवडणूक होत आहेत. त्याची तयारी सुरु झाली आहे. सीमा भागातील गावे पळविण्याचा घाट कर्नाटकने घातला आहे. आपल्या सरकारमधील काही मंत्री कर्नाटकला जाणार होते. पण, तेथील मुख्यमंत्र्यांनी येऊ नका असा इशारा दिल्यावर या नेभळट मंत्र्यांनी आपला दौरा रद्द केला. शिवरायांचा हा महाराष्ट्र आम्ही दीनदुबळा होऊ देणार नाही. सरकारने त्या गावांची जबाबदारी घ्यावी. गद्दार सरकारने ते याबाबत काय करणार आहेत ते सांगावे नाही तर सरकार चालविण्यापासून ते बेळगावला जाईपर्यंत सर्व जबाबदारी आम्ही घेतो, असा इशाराही त्यांनी दिला.

Check Also

नाना पटोले यांची टीका, गुवाहाटीच्या गद्दारांना राहुल गांधींवर बोलण्याचा अधिकार नाही

लोकसभेच्या निवडणुकीचा दुसराच टप्पा होत असताना भारतीय जनता पक्ष व त्यांच्या मित्रपक्षांची घाबरगुंडी उडाली आहे. …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *