Breaking News

राहुल गांधींकडून मुख्यमंत्री पदाचा चेहरा चन्नीच सिध्दू आणि जाखड यांना मिळून काम करण्याचे आवाहन

मराठी ई-बातम्या टीम

पंजाबमधील विधानसभा निवडणूकीच्या निमित्ताने सध्या तरी भाजपाचे कोठेही अस्तित्व दिसत नसले तरी आम आदमी पक्षाकडून प्रचाराला चांगलीच सुरुवात केली असून पंजाबच्या मुख्यमंत्री पदासाठी भगवंतसिंग मान यांचे नाव जाहीर केले. त्यामुळे आज काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पंजाबच्या मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून पुन्हा एकदा चरणजीत सिंग चन्नी यांचेच नाव जाहीर करत नवज्योत सिंग सिध्दू आणि सुनिल जाखड यांना चन्नी सोबत मिळून काम करण्याची सूचना केली. आता दस्तुरखुद्द राहुल गांधी यांनीच मुख्यमंत्री पदासाठीचा चेहरा जाहीर केल्याने या पदावरून निर्माण झालेल्या शर्यतीला पूर्ण विराम मिळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

पंजाबमध्ये २० फेब्रुवारीला मतदान होत आहे. यापार्श्वभूमीवर पंजाबमध्ये प्रचाराची रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. राहुल गांधी यांनी लुधियानातील व्हर्च्युअल रॅलीला संबोधित केले. यावेळी त्यांनी ही घोषणा केली. काँग्रेसमध्ये अनेक हिरे आहेत. मी २००४ पासून मी राजकारणात आहे. माझ्याकडेही थोडा अनुभव आणि दूरदर्शीपणा आहे. सीएमपदासाठी काँग्रेसमधील हिऱ्यांची निवड करणं तशी कठिण टास्क आहे. काही लोक आहेत. जे आमच्या पक्षाला बदनाम करत आहेत. कोणताही नेता १५ दिवसात जन्माला येत नाही. जे टीव्हीवर दिसतात तेच नव्हे तर संघर्ष करणाराही राजकीय नेता बनतो, असे सूचक वक्तव्य त्यांनी केले.

चन्नी मुख्यमंत्री झाले. त्यांच्यामध्ये कोणताही अहंकार नाही. ते लोकांमध्ये जातात. तुम्ही कधी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लोकांमध्ये मिसळताना पाहिलंय का? रस्त्यावर कधी कुणाला मदत करताना पाहिलं काय? ते करणार नाहीत. कारण ते पंतप्रधान नाहीत तर राजा आहेत, असं सांगतानाच चरणजीत सिंग चन्नी हेच काँग्रेसचे पंजाबमधील मुख्यमंत्रीपदाचे चेहरा असेही त्यांनी यावेळी जाहीर करून टाकले.

पंजाबच्या लोकांनी सांगितलेय की, गरीब घरातील मुख्यमंत्री हवा आहे. गरीबांचं म्हणणं ऐकून घेणारा मुख्यमंत्री हवा. पंजाबला समजून घेणारा मुख्यमंत्री पाहिजे. कारण पंजाबला अशा व्यक्तीची गरज आहे. मात्र पंजाबच्या लोकांनी आणि कार्यकर्त्यांनी हे काम सोपं केलं, केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मागील काही दिवसांपासून पंजाबचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिध्दू यांनी मुख्यमंत्री पदासाठी आपण प्रमुख दावेदार असल्याचे जाहीरपणे सांगत होते. यापार्श्वभूमीवर आता राहुल गांधी यांनीच चरणजीत सिंग चन्नी यांच्या नावाची घोषणा केल्याने सिध्दू हे काँग्रेसचे मनापासून काम करणार की पुन्हा काँग्रेसच्या विरोधात काम करणार हे आगामी दिवसातच दिसून येईल.

Check Also

मुख्य निवडणूक अधिकाऱ्याची स्पष्टोक्ती, राज्यातील मतदानाच्या टक्केवारीत वाढ नाही

लोकसभा निवडणूकीसाठी २६ तारखेला दुसऱ्या टप्प्यातील मतदान पार पाडल्यानंतर केंद्रीय निवडणूक आयोगाने पहिल्या आणि दुसऱ्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *