Breaking News

अजित पवार म्हणाले, …तो अधिकार कोणालाही नाही जे करतोय ते पक्षाच्या हिताचं करतोय

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षातील बंडखोरीनंतर अजित पवारांसह ९ आमदारांना अपात्र करण्याचं पत्र विधानसभा अध्यक्षांकडे दिलं. यानंतर आता अजित पवारांनी मोठी खेळी केली आहे. शरद पवारांच्या गटाकडून करण्यात आलेल्या कारवाईला अजित पवार गटाकडून प्रत्युत्तर आलं असून यानुसार जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर एक दिवसाआधीच कारवाई झाल्याची घोषणा अजित पवारांनी केली. आज सकाळी शरद पवार यांनी कराड येथील प्रीतीसंगम येथील यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळावर जाऊन अभिवादन केले. तर अजित पवार हे संध्याकाळी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

अजित पवार म्हणाले, मी माध्यमांमध्ये पाहिलं की, नऊ आमदारांवर अपात्रतेची कारवाई करावी असं पत्र विधानसभा अध्यक्षांना पाठवण्यात आलं आहे. मी सांगू इच्छितो की, मी राष्ट्रवादीच्या आमदारांनी आणि पक्षाने निवडून दिलेला विधिमंडळ पक्षनेता आहे. त्यामुळे जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांना अपात्र करण्याच्या संदर्भात कालच विधानसभा अध्यक्षांकडे पत्र दिलं आहे.

बहुसंख्य आमदार हे आमच्याबरोबर म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह आहेत. देशपातळीवर नरेंद्र मोदींचं जे नेतृत्व आहे त्या नेतृत्वाला पाठिंबा देत आहोत. आम्ही ही भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस आम्हीच आहोत. सुनील तटकरेंची प्रांताध्यक्ष म्हणून नेमणूक केलेली आहे. आम्ही जे करतोय ते पक्षाच्या हिताचंच करतो आहोत, असं मत अजित पवारांनी व्यक्त केलं.

अजित पवार पुढे म्हणाले, काहींनी आमच्या विरोधात नोटीस वगैरे काढली आहे. मात्र, तो अधिकार कुणालाही नाही. पक्ष आणि चिन्ह आमच्याच बरोबर आहे, असा आमचा ठाम विश्वास आहे. या गोष्टी करत असताना आमच्याबरोबरच्या आमदारांचं भवितव्य कसं व्यवस्थित राहिल याची खबरदारी आम्ही घेत आहोत. कुणीही काहीही सांगितलं तरीही आमच्यावर कुठलीही कारवाई केली जाऊ शकत नाही.

केंद्र सरकार बरोबर असेल तर फायदा होतो. राज्यातील कामांसाठी केंद्र सरकारचा निधी, परवानग्या लागतात. केंद्र सरकार वेगळ्या विचारांचं आणि राज्य सरकार वेगळ्या विचारांचं असलं तर निधीच्या बाबतीत कमतरता राहते, असंही अजित पवारांनी नमूद केलं.

काही मान्यवरांची अशी वक्तव्यं आली की, आम्ही कायदेशीर मार्गाने न जाता जनतेत जाऊ. पण रात्री बारा वाजता पत्रकार परिषद घेऊन वेगळ्या घटना सांगण्यात येत आहेत. त्याला काही अर्थ नाही. आम्ही जी भूमिका घेतली आहे ती योग्य, चांगली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भल्याची आहे, असंही त्यांनी नमूद केलं.

निबंध स्पर्धेला १५ मार्च २०२३ पर्यंत मुदतवाढ

Check Also

केसरकरांच्या त्या व्हिडिओवर सुप्रिया सुळे यांचा सवाल, या मंत्र्यांना झालंय तरी काय?

रविवारी राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा शिक्षक भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारालाच भरती कधी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *