Breaking News

हिजाब वादंगावर मलिक म्हणाले, “…भाजपा आणि संघ ठरविणार का?” बुरखा आणि हिजाबमध्ये फरक

मराठी ई-बातम्या टीम

कर्नाटकातील हिजाब वादंगाचे पडसाद आता महाराष्ट्रात उमटत असून त्यामुळे राजकिय वातावरण चांगलेच तापत आहे. कर्नाटकात तर ३० दिवसासाठी सर्व शैक्षणिक संस्थांच बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. तसेच देशभरातही यावर प्रतिक्रिया व्यक्त करण्यात येत आहे. यापार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी हिसाब आणि बुरखा यात फरक असल्याचे सांगत बुरखा हा पूर्ण शरीर झाकण्यासाठी आहे तर हिसाब हे केस, डोके आणि मान-गळा झाकण्यासाठी वापरला जात असल्याचे स्पष्ट केले.

परंतु, देशात कोण काय खाणार, कोण काय घालणार, हे आता भाजपा आणि संघ परिवार ठरवणार आहेत का? असा उपरोधिक सवाल उपस्थित करत हे नागरिकांच्या मुलभूत हक्कांचे उल्लंघन आहे, मुस्लिम मुली शाळा-कॉलेजात जात आहेत, शिक्षण घेत आहेत, ही अडचण भाजपा आणि संघाला आहे का? असा सवाल पुन्हा एकदा करत, बेटी पढाओ या नारेबाजीचे काय झाले असा प्रतिप्रश्नही त्यांनी भाजपाला या निमित्ताने केला.

मुस्लिम मुली शिक्षण घेऊन समाजात त्यांचं स्थान निर्माण करत आहेत, याची भाजपा आणि संघाला अडचण आहे, हा प्रश्न आहे. ओढणी ही भारतीय संस्कृती आहे. कोणालाच चेहरा लपवून शाळेत जावं वाटत नाही. हिजाबचा अर्थ केस आणि चेहरा झाकणं असा होतो, मला नाही वाटत की त्यात कोणतीही अडचणीची बाब आहे. यापूर्वी केरळ हायकोर्टाने मुली हिजाब घालू शकतात, असा आदेश दिलेला आहे. याप्रकरणी आता कर्नाटक उच्च न्यायालयात सुनावणी सूरू आहे. हा प्रकार जाणीवपूर्वक लोकांमध्ये द्वेष निर्माण करण्यासाठी केला गेल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

दरम्यान, मुंबई महापालिकेची मुदत ७ मार्चला संपणार असून महापालिकेवर प्रशासक नियुक्त करण्यात येणार आहे. मात्र मुंबई महापालिका कायद्यात प्रशासक नेमणूकीची तरतूद नसल्याने त्यात दुरूस्ती करण्यास राज्य मंत्रिमंडळाने आज झालेल्या बैठकीत मान्यता देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले. त्याचबरोबर राज्य निवडणूक आयोगानेही सध्या निवडणूक घेणे शक्य नसल्याचे कळविले असल्याने प्रशासक नेमण्याशिवाय पर्याय नसल्याचे दिसून येत आहे.

Check Also

संजय राऊत यांचा खुलासा, मुस्लिम उमेदवाराला कधीही विरोध नाही

आसाममध्ये काँग्रेस नेते मल्लिकार्जून खर्गे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधताना मुंबईच्या उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघातून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *