Breaking News

लता मंगेशकर, रमेश देव यांना श्रध्दांजली वाहत राज्य मंत्रिमंडळाने घेतले हे निर्णय ठक्कर बाप्पा योजनेच्या निकषात वाढ

मराठी ई-बातम्या टीम

राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत गानसम्राज्ञी स्व. लता मंगेशकर आणि अभिनेते स्व. रमेश देव यांना आदरांजली वाहण्यात आली. त्याचबरोबर आदिवासी समाजासाठी असलेल्या ठक्कर बाप्पा योजनेतील आर्थिक निकषात वाढ करण्यासह अन्य तीन निर्णय महत्वाचे घेतले.

राज्यात स्वत:च्या जागेत विभागीय व जिल्हा माहिती कार्यालये, माहिती भवन उभारणार

राज्यात विभागीय व जिल्हा माहिती कार्यालयांच्या इमारती व माहिती भवन उभारुन माहिती जनसंपर्क महासंचालनालयाचे अधिक बळकटीकरण करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

माहिती जनसंपर्क महासंचालनालयातर्फे शासकीय योजनांची प्रसिद्धी केली जाते. या महासंचालनालयाच्या अंतर्गत आठ विभागीय माहिती कार्यालये आहेत. परंतू बहुतांश माहिती कार्यालये भाड्याच्या जागेत असून अप्रत्यक्षपणे त्याचा परिणाम कामकाजावर होत आहे. त्यामुळे अशा सर्व अधिनस्त माहिती कार्यालयासाठी स्वत:ची जागा मिळवून, कार्यालयाची इमारत बांधकाम, बळकटीकरण, पायाभूत सुविधा निर्मिती करण्यासाठी विभागीय व जिल्हा माहिती कार्यालय, माहिती भवन इमारत बांधकाम योजना राबविण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक ती शासकीय जमिन प्राप्त करुन घेण्यात येईल.

…..

ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा योजनेच्या आर्थिक निकषात वाढ

ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा योजनेच्या आर्थिक निकषात वाढ करण्याचा निर्णय निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

आदिवासी लोकसंख्या १५०० पेक्षा जास्त असलेल्या भागात ७५ लाख रुपये, १००० ते १४९९ पेक्षा जास्त असलेल्या भागात ५० लाख रुपये, ५०० ते ९९९ पेक्षा जास्त असलेल्या भागात ३५ लाख रुपये, ४९९ पेक्षा कमी आदिवासी लोकसंख्या असलेल्या २५ लाख रुपये अशा सुधारीत आर्थिक निकषांमध्ये ५ वर्षांपर्यंत कामे घेता येतील.

“ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधारणा” ही योजना सन २०२१-२२ पासून राज्यस्तरावर वर्ग करण्यात आली आहे. ही बाब विचारात घेऊन राज्यातील आदिवासी उपयोजना क्षेत्र, अतिरिक्त आदिवासी उपयोजना क्षेत्र,माडा,मिनीमाडा व आदिवासी उपयोजना बाह्य  क्षेत्राबाहेरील ५० टक्के व त्यापेक्षा जास्त अनुसुचित जमातीची  लोकसंख्या असलेल्या वस्त्या / पाडे / वाड्या / गाव/ नगर पंचायती / नगरपरिषदा /नगरपालिका /महानगरपालिका या मधील वार्ड/प्रभाग यांचा विकास करण्याबाबत सुचविण्यात येणाऱ्या कामांना सुधारीत निकष लावण्यात येतील.

 ……

भारतरत्न लता मंगेशकर, ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांना श्रद्धांजली

भारतरत्न लता मंगेशकर, ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांना मंत्रिमंडळ बैठकीत श्रद्धांजली वाहण्यात आली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे होते.

भारतरत्न लता मंगेशकर यांच्याबाबतचा शोकप्रस्ताव उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी, तर ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांच्याबाबतचा शोकप्रस्ताव उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी वाचला. यावेळी सर्वांनी स्तब्धता पाळून श्रद्धांजली वाहिली.

Check Also

पंतप्रधान मोदींच्या मुंबईतील दौऱ्यात महिला काँग्रेस काळे झेंडे दाखवणार

भाजपाचा मित्र पक्ष जेडीएसचा लोकसभा उमेदवार प्रज्वल रेवन्ना याने शेकडो महिलांना ब्लॅकमेल करून त्यांच्यावर लैंगिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *