Breaking News

लोकलबाबत मुख्यमंत्र्यांनी दिले हे संकेत कोरोना पाहुण्याला घालविण्यासाठी खबरदारी घ्या-मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

मुंबई : प्र्तिनिधी

गेली सात महिने कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावा रोखण्याच्या उद्देशाने सर्वसामान्य मुंबईकरांना लोकलने प्रवास करण्यास बंदी घालण्यात आली. तसेच फक्त अत्यावश्यक सेवेसह काही ठराविक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकलने प्रवास करण्यास राज्य सरकारने मुभा दिली. परंतु सर्वसामान्य प्रवाशांसाठी पुन्हा लोकल प्रवास पुन्हा खुला होणार असल्याची अपेक्षा निर्माण झाली परंतु त्याविषयी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी घोषणा न करता लोकलच्या फेऱ्या वाढल्या कि, त्याने प्रवास करण्याच्या यादीत आणखी काहीजणांचा समावेश करणार असल्याचे सांगत लवकरच लोकल रेल्वे अर्थात उपनगरीय सेवा सर्वांसाठी खुली होणार असल्याचे एकप्रकारे संकेत दिले.

राज्यातील जनतेशी सोशल मिडियातून संवाद साधताना ते बोलत होते.

सध्या लोकलला गर्दी होत आहे. त्यामुळे गर्दी कमी होण्यासाठी लोकलच्या फेऱ्या वाढविण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने रेल्वेला पाठविला आहे. त्यानुसार फेऱ्या वाढल्यानंतर प्रवास करण्यांच्या यादी आणखी काही जणांचा नव्याने समावेश करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

राज्यात कोरोनाची परिस्थिती पूर्वी जशी होती तशीच आहे. कोरोना मानक परदेशी पाहुणा काही केल्या जायला तयार नाही. तो कधी जाईल काय परंतु त्याला घालवावे लागेल. आपण खबरदारी म्हणून लॅबची संख्या वाढविली असून ३७५ लॅब आज कार्यरत आहेत. तसेच ठिकठिकाणी कोविंड सेंटर सुरु केली असून जिथे आवश्यक असेल तिथे आपण सुरु करत आहोत. या पाहुण्याला रोखण्यासाठी आपणाला सरकारने यापूर्वी जाहीर केल्याप्रमाणे त्रिसुत्रीचा अवलंब करावा लागणार आहे. तरच आपण कोरोनापासून दूर राहणार असू आणि आपल्याबरोबर आपल्या कुटुंबियाचे प्राण सुरक्षित ठेवू शकू. तसेच त्याची लक्षणे आढळून आल्यास किंवा तशी शंका आल्यास तातडीने आपण टेस्ट करून घ्या असे आवाहन करत लवकरत आलात तर लवकर बरे होवून स्वस्थ रहाल अशी सूचनाही त्यांनी यावेळी केली.

कदाचित महाराष्ट्र हे एकमेव राज्य असेल तेथे कडक कायदे न करता आपण कोरोनाबरोबर लढतोय. जनतेची इच्छा महत्वाची आहे. माझे कुटुंब माझी जबाबदारी ही एक मोहिम राबवतोय या मोहिमेच्या यशस्वीतेसाठी राज्यात आशा वर्कर आणि इतरजण यासाठी फिरत आहेत. या मोहिनेतंर्गत अहमदनगरमध्ये सुदाम गायकवाड हे प्रत्येक घरोघरी जावून माहिती घेत असताना एका घरी त्यांना एकाची ऑक्सीजन लेवल कमी असल्याचे आढळून आले. लगेच त्यांनी आग्रह करत त्यांची चाचणी करायला लावली, त्यांना अॅ़डमिट केले. भंडाऱ्यात आशा वासनिक, वाशिममधील पुष्पा यासह अनेक कोविड योध्दे आहेत. त्यांचे महाराष्ट्रावर खुप उपकार आहेत. यातील काहीजण कोरोना झाल्याने स्वत: आजारी पडले. त्यांनी स्वत:ला अॅडमिट करून घेवून बरे झाले. मात्र त्यानंतरही ते घरी बसले नाहीत. त्या पुन्हा महाराष्ट्राच्या सेवेसाठी पुन्हा कार्यरत असल्याचे त्यांनी सांगत अशा कोविड योध्द्यांचा अभिमान असल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले.

त्याचबरोबर आपण राज्यातील शेतकऱ्यांना कोणत्याही स्थितीत वाऱ्यावर सोडणार नसल्याची ग्वाही देत ते म्हणाले कि, आतापर्यत २९ लाख ५० हजार शेतकऱ्यांना पीक कर्जातून मुक्त केले असून त्यांच्या मालाला चांगला हमी भाव नव्हे तर चांगला भाव मिळाला पाहिजे यासाठी जे विकेल तेच पिकेल ही संकल्पना राबवित आहोत. निसर्ग चक्रीवादळ आणि विदर्भातील पूरग्रस्तांना कोल्हापूर-सांगलीच्या धर्तीवर नुकसान भरपाई देत आहोत. तसेच सततच्या पावसामुळेही शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. त्याचे पंचनामे करून त्यांनाही नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. तसेच शेतकऱ्यांसाठी गोदामे, कोल्ड  स्टोअरेज यासह त्यांचा माल साठवायला ज्या गोष्टी लागतात त्या गोष्टी पुरविण्यात येत असून जे जे लागेल ते उपलब्ध करून देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

त्याचबरोबर केंद्राने नुकताच कृषी धोरण मंजूर केलेय. या धोरणाच्या अनुषंगाने शेतकरी संघटनांशी सरकार चर्चा करत आहे. त्या धोरणातील जेवढं चांगलं असेल तेवढच स्विकारण्यात येणार असल्याचे सांगत जे चांगल नाही ते कदापी स्विकारणार नाही. त्या अनुषंगाने संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करत आहोत. त्यामुळे शेतकऱ्यांना भीती बाळगण्याचे कारण नाही. तसेच राज्यात पुन्हा सुरु केलेली गोष्टी मला पुन्हा बंद करायची नाही. त्यामुळे आपण हळुवार पध्दतीने पुढे जात आहोत. परंतु काहीजण हे सुरु केलय मग हे का सुरु नाही असा सवाल करत आहेत. परंतु आमच्यावर जबाबदारी असल्याने हळुवार पाऊल टाकत आहोत. तुमच्यावर जबाबदारी नसल्याने तुम्ही असे सवाल करत असल्याची उपरोधिक टीका त्यांनी विरोधकांवर करत महाराष्ट्र हे माझे कुटुंब असल्याने या कुटुंबाच्या काळजीपोटी हळुवार जात असल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा ‘शपथनामा’ जाहीर

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला आहे. या जाहीरनाम्याला ‘शपथनामा’ असे नाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *