Breaking News

पावसामुळे एमएच- सीईटी परिक्षा न देता आलेल्यांसाठी नव्या तारखा जाहिर उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी केली घोषणा

मुंबई: प्रतिनिधी

मागील दोन दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या पावसामुळे मराठवाड्यातील अनेक विद्यार्थ्यांना सीईटीची परिक्षा देता आली नाही. त्यामुळे हवालदिल झालेल्या विद्यार्थ्यांना दिलासा देत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी सीईटी परिक्षा देता न आलेल्या विद्यार्थ्यांसाठी पुन्हा परिक्षा घेण्यात येणार असल्याची घोषणा सकाळी केली. त्यानंतर दुपारी यासंदर्भात पत्रकार परिषद घेत त्या विद्यार्थ्यांसाठी नव्या परिक्षांचा तारखा जाहिर केल्या.

उस्मानाबाद, औरंगाबाद, नांदेड, जालनासह मराठवाड्यातील अनेक विद्यार्थ्यांना सीईटी परिक्षेसाठी जाता आले नाही. त्यामुळे परिक्षा देता न आलेल्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा ९ आणि १० ऑक्टोंबरला घेण्यात येणार असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली.

विदर्भ, मराठवाडा, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात सातत्याने पाऊस पडत होता. त्यामुळे मोबाईल नेटवर्क आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटी नसल्याने हजारो विद्यार्थ्यांची सीइटी होऊ शकली नाही. तर काही विद्यार्थ्यांनी शेजारच्या जिल्ह्यातील परिक्षा केंद्रे निवडली होती. यापैकी अनेकांना आलेल्या पूरामुळे परिक्षा केंद्रावर जाता आले नाही. तर अनेकजण प्रवासातच अडकून पडले. त्याचबरोबर कोरोना, पूर परिस्थिती , घरात वाईट घटना घडली असेल तर परत परीक्षा देत येईल. तांत्रिक अडचणी असतील तरी परीक्षा पुन्हा घेण्यात येतील. विद्यार्थ्यांना डेंग्यू मलेरिया झाला असल्याने परीक्षा देता येणार नसेल तर त्याची परीक्षा परत देता येणार असल्याचे सांगत यासंदर्भात उच्च व तंत्र शिक्षण विभागाकडून उद्या नवी जाहीर सूचना काढली जाणार आहे. त्याचबरोबर हॉल तिकीट, सेंटर पहिल्या परीक्षेचे वापरता येईल असेही त्यांनी सांगितले.

औरंगाबादमध्ये पुराच्या पाण्यामुळे २१५ विद्यार्थी एव्हरेस्ट मधील CET परीक्षेला मुकले असल्याचं समोर आलं होतं. पुलावरून पाणी वाहत असल्याने औरंगबाद शहरासह परराज्यातील विद्यार्थी मुकले परीक्षेला होते. रस्ता नसल्याने बराच वेळ विद्यार्थी रस्ता सुरळीत होण्याची वाट पाहत होते. पावसामुळे नांदेड मध्ये काही विद्यार्थ्यांना एमएच सीईटी ची परीक्षा देता आली नाही. लातूर रोड येथील होरीजन स्कूल येथे एमएचटी सीईटी चे परीक्षा सेंटर होते. काल दिवसभरात दोन सत्रात जवळपास अडीचशे विद्यार्थ्यांची सीईटी परीक्षा घेण्यात येणार होती. बी.फार्मसी आणि डी. फार्मसीसाठी ही पूर्व परिक्षा होती. मात्र, काल पावसामुळे सकाळी ९ ते १२ या वेळेची परीक्षा होऊ शकली नाही. दरम्यान ९ आणि १० तारखेला होणाऱ्या सीईटी परिक्षेचा निकाल २० ऑक्टोंबर रोजी जाहिर करण्यात येणार असून हे शैक्षणिक वर्ष कधीपासून सुरु करायचे याचा निर्णय नंतर घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

भाजपा आमदार नितेश राणेंना उच्च न्यायालयाकडून धक्का आणि दिलासा २७ जानेवारी पर्यत अटक करता येणार नाही

मराठी ई-बातम्या टीम केंद्रीय मत्री नारायण राणे यांचे सुपुत्र तथा भाजपाचे आमदार नितेश राणे यांना …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *