जागतिक अन्न सुरक्षा दिन दरवर्षी ७ जून रोजी साजरा केला जातो. या दिनानिमित्त राज्याचा मुख्य कार्यक्रम ७ जून २०२५ रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात अन्न सुरक्षा : कृती विज्ञान (Food Safety: Science in Action) या संकल्पनेवर आधारित विविध सत्रे, माध्यमांद्वारे जनजागृती, तज्ज्ञांचे विचार, आणि राज्यातील अन्न सुरक्षा संबंधित उपक्रमांचा आढावा घेतला जाणार असल्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितले.
जागतिक अन्न सुरक्षा दिनाच्या निमित्ताने यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे होत असलेला कार्यक्रम व पंढरपूर आषाढी वारी मध्ये अन्न व औषध प्रशासनामार्फत राबविण्यात येणारे उपक्रम या निमित्ताने मंत्री नरहरी झिरवाळ यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
यावेळी बोलताना अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ म्हणाले की, यापुढे पनीर हे हॉटेलच्या प्रत्येक मेनू कार्डमध्ये लिहावे लागणार आहे. तसेच ते कोणत्या पदार्थापासून तयार करण्यात आले. त्याचा उल्लेखही करावा लागणार आहे. त्याचबरोबर राज्यातील २८८ आमदारांच्या मतदारसंघात किमान एक तरी फूड इन्सपेक्टर तरी असावा इतकी फूड इन्सपेक्टरची आवश्यकता आहे. मात्र मुंबई आणि महाराष्ट्रात फूड इन्सपेक्टरची नेमकी किती कमतरता आहे याची माहिती देण्यास नकार दिला.
पुढे बोलताना नरहरी झिरवळ म्हणाले की, आता आषाढ वारी निमित्त अन्नांमध्ये भेसळीची संपूर्ण माहिती आणि त्यासंद़र्भात असलेल्या कायद्याची माहिती देण्यात येणार आहे. जेणेकरून नागरिकांनाच अन्नांमधील भेसळ स्वतः ओळखण्यास मदत होईल असेही यावेळी सांगितले.
अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रे
पुढे बोलताना नरहरी झिरवळ म्हणाले की, जागतिक अन्न सुरक्षा दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात १८९ अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रे दिली जाणार आहेत. अन्न प्रशासन विभागात इतक्या मोठ्या प्रमाणावर नियुक्त्या प्रथमच झाल्या आहेत. अन्न व औषध प्रशासनात नव्याने रुजू होणाऱ्या अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांमुळे अन्न व औषध प्रशासन विभागाचे काम अधिक सक्षम व गतीने होणार असल्याचेही यावेळी सांगितले.
पंढरपूर आषाढी वारी मार्गावर विशेष सेवा
शेवटी बोलताना नरहरी झिरवळ म्हणाले की, पंढरपूर आषाढी वारीच्या अनुषंगाने वारी मार्गावर अन्न व औषध प्रशासनाच्या वतीने विशेष सेवा देण्यात येणार आहे. वारी मार्गावर औषधांचा पुरवठा योग्य प्रमाणात होण्यासाठी आरोग्य विभाग व औषध पुरवठादार यांचेमध्ये समन्वय ठेवण्यात येत आहे. वारी मार्गावर असणाऱ्या अन्न छत्रांमध्ये स्वच्छ व निर्भेळ अन्न मिळेल याबाबत दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच वारी मार्गावर मुक्कामाच्या ठिकाणी होणाऱ्या कीर्तनामध्ये अन्न सुरक्षा जनजागृतीसाठी कीर्तनकारांनी प्रबोधन करावे असे आवाहन त्यांना करण्यात येणार आहे. याबरोबरच आषाढी वारी मार्गावर अन्न सुरक्षा वाहन (Food Safety Van) ठेवण्यात येणार असल्याचेही यावेळी सांगितले.
Marathi e-Batmya